Marathi Bible Reading | Sunday 12th September 2021 | 24th Sunday in ordinary Time

      सामान्य काळातील 

चोविसावे रविवार 

१२ सप्टेंबर २०२१

जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा.'” 
 “आपण ख्रिस्त आहा.”

 ✝️ 

 तारणाऱ्या प्रभू येशूविषयी भाकित करताना यशया संदेष्टा म्हणत आहे. की देवाचा सेवक दुःख सहन करून देवाच्या आज्ञेचे पालन करणारा असेल. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आत्मत्यागाचा संदेश देऊन आपल्या भावी दुःखसहन आणि मरणाचा उलगडा शिष्यांसमोर करीत आहे, 
देवपित्याची आज्ञा पाळून आत्मत्याग व  क्रुसवरील मरण स्वीकारूनच प्रभू येशूने आपल्या सर्वांना तारण प्राप्ति मिळवून दिली आहे. ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक माणसाला प्रभू येशू आज   म्हणत आहे, " जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग  करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे.” प्रत्येक  ख्रिस्ती माणसासमोर प्रभू येशूने ठेवलेले हे मोठे आव्हान आहे. तीन महत्वाच्याआपला वधस्तंभ उचलून घ्यावा आणि प्रभू येशूला अनुसरावे. खरे पाहता  आपल्या सर्वांच्या तारणासाठी देवाने त्यांचा एकुलता पुत्र पाठविला प्रभू येशू  ख्रिस्ताने आपल्या सर्वांच्या पापांचा क्रुस वाहिला आणि आत्मत्याग करून प्राण  समर्पित केला. देवाचा आपल्या सर्वावरील महान प्रीतिचा तो कळस आहे.  आपले जर देवावर प्रेम आहे तर आपण त्याची आज्ञा पाळून गोष्टींची पूर्तता करण्यास प्रभू येशू आपल्याला सांगत आहे. आत्मत्याग करावा,
संत याकोब आज सांगत आहे की क्रियेवाचून  आपला विश्वास व्यर्थ आहे. 

✝️
पहिले वाचन : यशया  ५०:५-:९

वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"मी मारणाऱ्यांपुढे माझी पाठ केली. "

प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी मारणाऱ्यांपुढे पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले, उपमर्द आणि छिःथू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही, मी आपले तोंड गारगोटीसारखे केले, माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरविणारा जवळ आहे. माझ्याबरोबर वाद कोण करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे. पाहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी का ठरवणार?
हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ११६ :१-९

प्रतिसाद : जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.

१) परमेश्वराचे स्तवन करा.
मी परमेश्वरावर प्रेम करतो 
कारण तो माझी विनवणी ऐकतो.
त्याने आपला कान माझ्याकडे लावला आहे, 
म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन.

२) मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले,
मला अधोलोकांच्या यातना झाल्या, 
मला उपद्रव आणि क्लेश झाले, 
तेव्हा मी परमेश्वराच्या नामाचा धावा करून म्हणालो, 
हे परमेश्वरा, तुला मी विनवतो की, मला मुक्त कर.

३) परमेश्वर कृपाळू आणि न्यायी आहे, 
आमचा देव कनवाळू आहे. 
परमेश्वर भोळ्या माणसांचे रक्षण करतो. 
मी दीनावस्थेत होतो तेव्हा त्याने माझा उद्धार केला.

४) तू माझा जीव मरणापासून, 
माझे डोळे अश्रूंपासून, 
माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षिले आहेत. 
जिवंतांच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेन.

दुसरे वाचन याकोब २:१४-१८

वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन

“विश्वासाबरोबर जर कृती नाही तर तो विश्वास निर्जीव आहे."

माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो कृती करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारायला समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे आणि तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो, “सुखाने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा," पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृती नाही तर तो विश्वास निरर्थक आहे. 
कोणी म्हणेल, तुझ्याठायी विश्वास आहे आणि माझ्याठायी कृती आहेत, कृतीवाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या कृतींनी तुला दाखवीन.

हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
 आलेलुया!


शुभवर्तमान मार्क   ८:२७-३५

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी हे अटळ आहे."

येशू आणि त्याचे शिष्य फिलिप्पीमधील कैसरियाच्या आसपास असलेल्या खेड्यापाड्यांत जायला निघाले, तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात ?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “स्नानसंस्कार करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक संदेष्ट्यांतील एक असे म्हणतात.” तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” पेत्र त्याला उत्तर देऊन म्हणाला, “आपण ख्रिस्त आहा.” तेव्हा माझ्याविषयी कोणाला सांगू नका अशी त्याने ताकीद दिली.

तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलजन, मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, हे अटळ आहे. ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन ते नाकारू लागला. तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो पेत्रला स्पष्ट म्हणाला, "सैताना, माझ्यापुढून चालता हो, कारण तुझा दृष्टिकोन परमेश्वराचा नव्हे तर मनुष्याचा आहे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: स्वर्गाच्या राज्यात आपल्याला जर महत्त्वाची भूमिका बजावयाची असेल तर तेवढीच मोठी किंमत मोजायला आपण तयार असायला हवे आणि ती किंमत आहेः दुःखसहन. आजच्या वाचनात दुःखसहनाचे तीन पैलू उलगडून दाखविण्यात आलेले आहेत. 
१) मनापासून स्वीकारलेले दुःख हे तारणदायी दुःख बनतेः यशयाच्या पुस्तकात अध्याय ४२, ४९, ५० आणि ५२-५३ असे देवाच्या सेवकाचे दुःखभोग चार भागात वर्णन करण्यात आलेले आहेत. हा सेवक आपला छळ करणाऱ्यांना कुठलाही प्रतिकार करीत नाही तर मुकाट्याने आपले दुःख भोगतो. त्यातूनच इतरांना प्रेरणा मिळते व त्यांचा बचाव होतो. ख्रिस्ती श्रद्धेनुसार हे दु:खभोग ख्रिस्ताच्या दुःखसहनाची पूर्व कल्पना देणारे आहेत. 
२) दुःखाकडे दुर्लक्ष केले तर सर्वांचे नुकसान होतेः आजच्या दुसऱ्या वाचनात संत जेम्स आपल्या वाचकांनी गोरगरिबांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला देतो. नाइलाजास्तव आपल्या बांधवांवर लादण्यात आलेले दुःख हलके करण्याकडे आपण जर दुर्लक्ष केले तर त्यात सर्वांचेच नुकसान दडलेले आहे. आपली श्रद्धा इतरांचे दुःख हलके करण्याच्या कामी यायला हवी. 
३) दुःख टाळण्याचा प्रयत्न केला तर तो एक अडथळा बनतोः येशू हा मसिहा (ख्रिस्त) असल्याची कबुली पेत्राने दिली खरी परंतु त्यासाठी आपल्याला खूप मोठे दुःख सहन करावे लागेल असे जेव्हा येशूने त्याला सांगितले तेव्हा तो येशूचा निषेध करू लागला. अशावेळी खुद्द पेत्र हाच आपल्या मार्गातील अडथळा आहे असे येशूने ठणकावून सांगितले. ह्याचा अर्थ मुळात दुःख हलके किंवा जड असे काही नसते. येशूचा दृष्टिकोन दैवी होता. तो उघडपणे आपल्यावर येणाऱ्या दुःख संकंटाविषयी बोलत होता. पेत्राचा दृष्टिकोन मानवी होता. त्याला हे दुःख फार जड वाटले म्हणून तो ते टाळण्याचा सल्ला येशूला देत होता. मानवाचे तारण ही बाब एवढी महत्त्वाची होती की त्यासाठी येशू आपल्या प्राणाची किंमत मोजायला तयार होता.

आत्मपरीक्षणः मानवी जीवनातील दुःखाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे? आपण ह्या जगातील दुःख कमी करतो की आपल्या वागणुकीने व विचारसरणीने ते वाढवीत आहोत ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व तुझे खरे अनुयायी बनण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.
✝️

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या