Marathi Bible Reading | Monday 13th September 2021 | 24th week in ordinary Time

       सामान्य काळातील 

चोविसावे सप्ताह 

१३ सप्टेंबर २०२१

आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही, " 



संत जॉन क्रिझोस्तोम

महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल आणि धर्मपंडित (३४९-४०७)
 ✝️ 

 सर्वांचे तारण व्हावे आणि सर्वांनी सत्त्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे  संत पौल  मार्गदर्शन करताना म्हणतो की, प्रभू येशू जो एकमेव  तारणारा व देवाचा मध्यस्थ असा विश्वास बाळगून त्याच्याद्वारे सर्वदा आपण सर्वांसाठी प्रार्थना व विनंती करावी, तसेच प्रभूच्या, सुवार्तेचे सर्वांनी साक्षीदार बनावे.

प्रभू येशूने प्रशंसा केली असे विश्वासाचे चांगले उदाहरण आपल्या समोर ठेवण्यात आले आहे. शुभवर्तमानातील हा  शताधिपती विश्वासु, प्रेमळ आणि शिस्तबद्ध पद्धतीने वागणारा अधिकारी होता.  त्याच्या चाकराविषयी त्याला कळवळा होता म्हणूनच त्याने यहुद्दांच्या वडिल मंडळीस निरोप देऊन पाठविले होते. आजारी झालेल्या आपल्या चाकरासाठी तो प्रभू येशू जवळ बरे करण्यासाठी विनंती करण्यास त्याने यहुदयाच्या वडील  मंडळीस निरोप देऊन पाठविले होते. प्रभू येशूने त्याची विनंती मान्य करुन प्रभू त्याच्या घरी जावयास तयार झाला असताना शताधिपतीने पुन्हा निरोप पाठवून  त्याची अपात्रता स्वीकारीत म्हटले, 'आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही, तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल' प्रभू येशूने त्याचा मजबूत विश्वास पाहून म्हटले, 'एवढा विश्वास मला इस्त्राएलात आढळला नाही. '
 प्रभूवरील आपला विश्वास मजबूतआहे का ? प्रभूला आज आपण सर्वस्वी शरण जाऊ या. 
✝️
पहिले वाचन : १ तिमथीला  २:१-८

वाचक :पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

 "सर्व मनुष्यांचे तारण व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे, त्याच्याकडे सर्वासाठी प्रार्थना करावी. "

सर्व प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, मध्यस्थी आणि उपकारस्तुती करावी. राजांकरिता आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता सुरू करावी, कारण पूर्ण सुभक्तीने आणि गंभीरपणाने आपण शांतीचे आणि स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले आणि स्वीकारायला योग्य आहे. देवाची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे. एकच देव आहे आणि देव आणि मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वासाठी मुक्तीचे मोल म्हणून रक्ताचे दान दिले ह्याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे. ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा प्रेषित आणि (मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही) विश्वास आणि सत्य ह्यांसंबधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग आणि विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  २८ :२,७-९

प्रतिसाद : परमेश्वर सर्वकाळ धन्यवादित असो.

१) मी तुझा धावा करतो,
तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करतो, 
तेव्हा माझी दीनवाणी ऐक. 

२) परमेश्वर माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहे, 
त्याच्यावर मी श्रद्धा ठेवली आणि त्याचे मला
साहाय्य मिळाले. यास्तव माझे हृदय उल्हासते 
आणि मी गीत गाऊन त्याचे स्तवन करतो.

३) परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, 
तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. 
तू आपल्या लोकांना तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे. 
त्यांचा प्रतिपाळ कर, त्यांना सदोदित वाहून ने.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक   ७:१-१०

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“एवढा विश्वास मला इस्त्राएलमध्येही आढळला नाही.”

येशूने कफर्णहूममध्ये प्रवेश केला तेव्हा कोणा एका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणाला टेकला होता. त्याने येशूविषयी ऐकून यहुद्यांच्या वडीलमंडळीस त्याच्याकडे पाठवले आणि विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. त्यांनी येशूकडे येऊन आग्रहाने विनंती केली आणि सांगितले, आपण त्याच्यासाठी हे करावे अशा योग्यतेचा तो आहे, कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरिता सभास्थान बांधून दिले आहे. तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला, मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्राला पाठवून त्याला म्हटले, "प्रभो, श्रम घेऊ नका, कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही, ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही. तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत. मी एकाला 'जा' म्हटले तो जातो, दुसऱ्याला 'ये' म्हटले म्हणजे तो येतो आणि आपल्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.” ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्यामागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलमध्ये आढळला नाही. नंतर ज्यांना पाठवले होते ते घरी परत आल्यावर त्यांना तो दास बरा झालेला आढळला.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: मरण पंथी असलेला नोकर प्रभू येशूच्या एका शब्दाने बरा होतो. त्या शब्दामध्ये सामर्थ्य होते. हे सामर्थ्य करुणेत भरलं होतं. रोमन सुभेदाराने हे ख्रिस्ताचे सामर्थ्य ओळखलं होतं. पवित्र ख्रिस्तशरीर साक्रामेंतात माझ्या हृदयात येणाऱ्या प्रभू येशूच्या सहवासात माझं संपूर्ण आयुष्य बदलण्याचे सामर्थ्य भरलं आहे. तिमथी या आपल्या शिष्याला संत पॉल सांगत आहे की, त्याने सुभक्तीने व संपूर्ण मनाने ख्रिस्तापाशी विनंती करावी. ख्रिस्ताची ओळख नसलेल्या शासकीय अधिकाऱ्यांसाठी मध्यस्थी करावी. सर्वांनी न्यायाने व सुबुद्धीने वागावे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, आम्ही अपात्र असताना दाखील तू आम्हाला अनेक दानांनी  भरतोस, इतरांच्या गरजा भागविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या