Marathi Bible Reading | Tuesday 14th September 2021 | 24th week in ordinary Time

        सामान्य काळातील 

चोविसावे सप्ताह 

मंगळवार 

१४ सप्टेंबर २०२१

"देवाने आपल्या पुत्राला त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले" 





पवित्र क्रुसाचा विजयोत्सव

 ✝️ 
सम्राज्ञी हेलेना हिच्या परिश्रमाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या खऱ्या क्रुसाचा शोध लागल्यानंतर त्या क्रुसाचे पवित्र अवशेष संपूर्ण जगभराच्या ख्रिस्ती देवळात पाठविण्याची सोय करण्यात आली. संत जॉन ख्रिझोस्तोम म्हणतात की, बऱ्याच लोकांनी ह्या क्रुसाचे कण चिमुकल्या सोनेरी पेटिकेमध्ये घालून ते आपल्या गळ्यात मिरवू लागले. या क्रुसाचे मोठाले तुकडे पूर्वी राणी हेलेना हिचा राजमहाल असलेल्या परंतु आता पवित्र क्रुसाचे चर्च म्हणून नावाजलेल्या रोमच्या ख्रिस्तमंदिरात आणि इतर महामंदिरात पाठविण्यात आले.
पवित्र क्रुसाच्या या अवशेषांची भक्ती इतकी जबरदस्त होती की मूर्तिभंजक राजांनीदेखील लोकांच्या या भक्तीपुढे हात टेकले. इ. स. ६१४ पर्यंत ख क्रुसाचा काही भाग जेरूसलेम येथे ठेवण्यात आलेला होता. परंतु त्याच वर्षी पर्शियन लोकांनी हे शहर काबीज केले. त्यांच्या सैन्यात २६,००० यहुदी होते. ख्रिश्चनांचा हवा तसा छळ करण्याची पूर्ण परवानगी या यहुदी लोकांना देण्यात आलेली होती. त्यांनी ख्रिस्ती लोकांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी जेरूसलेमातील ९० हजार ख्रिश्चनांची कत्तल केली. असंख्य ख्रिस्त मंदिरे उध्वस्त केली आणि ख्रिस्ताचा खरा क्रूस पर्शिया येथे पळवून नेला.
तब्बल १३ वर्षांनी हेराक्लियस ह्याने पर्शियावर विजय मिळविला. याआधी पर्शियनांनी जप्त केलेल्या सर्व वस्तू जेरूसलेमला परत करण्यात आल्या. त्याचवेळी पवित्र क्रुसाचा ऊर्वरित भागसुद्धा मोठ्या विजयोत्सवाने पवित्र नगरीत आणण्यात आला. तो दिवस होता १४ सप्टेंबर इ. स. ६२७. त्या वेळेपासून ख्रिस्तसभा दरवर्षी ह्याच दिवशी पवित्र क्रुसाचा विजयोत्सव हा सोहळा साजरा करते.
स्वतः सम्राट हेराक्लियस ह्याने इ. स. ६२९ साली त्या पवित्र क्रुसापुढे गुडघे टेकून नमन केले आणि पूर्वी हेड्रियन ह्यांनी केलेल्या नियमाचे नूतनीकरण केले. या नियमानुसार यहुदी लोकांना जेरूसलेममध्ये प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली होती.

" ख्रिस्तसभा आज आपल्या सर्वांच्या विश्वासाचे, आणि विजयाचे प्रतिक असलेल्या पवित्र क्रुसाचा विजयोत्सव साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की इस्त्राएली जनतेला आग्ये सापांपासून वाचविण्यासाठी मोशेने देवाच्या आज्ञेप्रमाणे पितळेचा साप बनवून झेंड्याच्या खांबावर टांगला. त्या सापाकडे पाहणाऱ्यांना जीवनदान मिळाले. जसा सर्प उंच केला होता तसाच अखिल मानवांच्या तारणासाठी देवपुत्राला आडव्या आणि उभ्या खाबांच्या क्रुसावर उंचाविले जाईल ह्याची ती भविष्यवाणी होती.
✝️
पहिले वाचन : गणना   २१:४-९

वाचक :गणना ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"सर्पदंश झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे."

वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुध्द आणि मोशेविरुध्द असे बोलू लागले की, “तुम्ही आम्हांला इजिप्त देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही आणि पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो.” तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले, त्यांच्या दंशाने इस्राएलमधील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुध्द आणि तुझ्याविरुध्द बोलण्याचे पाप आम्ही केले आहे, तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर." तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल.” मग मोशेने पितळेचा एक साप बनवून तो त्या खांबावर टांगवला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी मनुष्याने त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे
हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ७७ :१-२,३४-३८

प्रतिसाद : प्रभूची कृत्ये कधीही विसरू नका.

१) अहो माझ्या लोकांनो, माझ्या उपदेशाकडे लक्ष द्या, 
माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. 
मी आपले तोंड उघडून दाखले सांगेन,
 प्राचीन काळच्या गूढ गोष्टींचे निवेदन करीन.

२) तो त्यांचा वध करू लागला तेव्हा ते त्याचा 
शोध करू लागले, ते देवाकडे वळून अनन्यभावे 
त्याला शरण गेले. देव आमचा दुर्ग आहे, 
परात्पर देव आम्हास मुक्त करणारा आहे. 
ह्याची आठवण त्यांना झाली.

३) त्यांनी आपल्या मुखाने त्याच्याशी कपट केले 
आणि आपल्या जिभेने त्याच्याशी लबाडी केली. 
कारण त्यांचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते, 
शिवाय त्याचा करार त्यांनी इमानाने पाळला नाही.

४) पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या 
अपराधाची क्षमा करत असतो. 
तो नाश करत नाही. 
तो आपला कोप वारंवार आवरतो, 
आपला सगळा संताप भडकू देत नाही..

दुसरे वाचन   फिलिप्पै  २:६-११ 

वाचक : पौलचे फिलिप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"त्याने स्वतःला लीन केले, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. "

ख्रिस्त येशू तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण स्वीकारले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वत: ला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले, ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.

हा प्रभूचा शब्द आहे

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, 
कारण तुझ्या पवित्र क्रुसाने जगाचे तारण केले आहे.
 आलेलुया!


शुभवर्तमान योहान    ३:१३-१७

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे."

येशू निकदेमला म्हणाला, “स्वर्गातून उतरलेला आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. "देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. 

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर मुक्तीचे दान पापी जनांना मिळावं यासाठी देवपित्याने ख्रिस्ताला पाठवलं. त्याच्या क्रुसावरील समर्पणाद्वारे हे अमोल प्रेम प्रकट झालं. क्रुसाचा विजय म्हणजे देवाचा माणसावरील प्रेमाचा विजय 'हे यावर आहे. क्रूस हे विजयाचं प्रतिक बनलं आहे. चिंतन करताना संत पॉल म्हणतो, “पहा, मला क्रुसाचा अभिमान वाटतो. कारण क्रुसाद्वारेच मला अनंत जीवनाची आशा लाभली.” यशया संदेष्टा म्हणतो, “निष्पाप माणसाच्या दुःखसहन व मरणाद्वारे आमच्या जखमा बऱ्या झाल्या.” हे प्रभू " ख्रिस्ता, माझ्या जीवनातील अंधाऱ्या प्रसंगी तुझा क्रूस माझ्या नजरेसमोर सतत राहू दे.

प्रार्थना : हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या जीवनातील संकटे, दुःखे व अडचणींचे क्रूस स्वीकारण्यास आम्हाला तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे प्रेरणा व शक्ती दे, आमेन.

✝️

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या