सामान्य काळातील
२६वा रविवार
२६ सप्टेंबर २०२१
✝️
“जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनूकूल आहे.”
देवाचे कार्य देव त्याच्या योजनेप्रमाणे करीत असतो.
परमेश्वर सर्वांनाच त्याची महानता व सामर्थ्य अनुभवण्यास बोलावित असतो. विशेषरितीने प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेल्या सर्वांना पवित्र आत्मा मिळाला आहे. त्यामुळे बाप्तिस्म्याद्वारे प्रत्येकजण संदेष्टा, याजक आणि प्रेषित बनला आहे. सर्वांना प्रभूची साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. म्हणूनच आपल्या परिसरात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सेवाकार्य करीतअसलेल्यांस विरोध न करता त्यांच्यासाठी प्रार्थना करावी.
देवाने पवित्र आत्म्याची विविध कृपादाने देऊन आपल्याला त्याचे तारणकार्य करण्यासाठी पाचारण केलेले आहे. आपल्यामध्ये असलेला न्युनगंड आणि अपात्रता प्रभूला समर्पित करू या. प्रोत्साहनात्मक प्रबोधन व प्रशिक्षण घेऊन प्रभूच्या मळ्यात सेवाकार्य करण्यासाठी पुढाकार घेऊ या. प्रभू सर्वदा आपल्याबरोबर आहे.
✝️
पहिले वाचन : गणना ११ :२५-२९
वाचक :गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय ? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते तर किती बरे झाले असते!"
परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असलेला आत्मा घेऊन त्याने त्या सत्तर वडिलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले, पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.
त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते, त्यातील एकाचे नाव एलदाद आणि दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते, ते छावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की, एलदाद आणि मेदाद हे छावणीतच संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनचा मुलगा यहोशवा जो तरुणापणापासून मोशेचा सेवक होता तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी, त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस का? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेवला असता तर किती बरे झाले असते!
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १९ : ८,१०,१२-१४
प्रतिसाद : परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात.
१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे.
ते मनाचे पुनरुज्जीवन करते.
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे,
तो भोळ्यांना समंजस करतो.
२) परमेश्वराचे भय शुद्ध आहे,
ते सर्वकाळ टिकणारे आहे.
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत,
ते सर्वथैव न्याय्य आहेत.
३) शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो,
ते पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते.
स्वतःच्या चुका कोणाला दिसतात ?
गुप्त दोषांपासून मला मुक्त कर.
४) धिटाईने केलेल्या पापांपासून
आपल्या सेवकाला आवर
त्यांची सत्ता माझ्यावर न चालो.
म्हणजे मी पूर्ण होईन आणि
महापापांपासून अलिप्त राहीन.
दुसरे वाचन याकोबचे पत्र ५: १-६
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
“तुमचे धन नासले आहे. "
अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे आणि तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने आणि तुमचे रुपे ह्यांवर गंज चढला आहे, तो गंज तुम्हांविरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्नीप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठविले आहे. पाहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला, वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीतिमानाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला, तो तुम्हांस विरोध करत नाही.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क ९:३८-४३,४५,४७-४८
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुझा हात तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक.'
योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणाएकाला आम्ही आपल्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता.” म्हणा “त्याला मनाई करू नका, कारण जो माझ्या नावाने महत्कृत्ये करून लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे म्हणून जो कोणी तुम्हांला पेलाभर पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही, हे मी तुम्हांला खचित सांगतो. विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानातील एकाला जो कोणी पापाला प्रवृत्त करील, त्याच्या गळ्यात मोठी जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकून द्यावे हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक, दोन हात असून नरकात म्हणजे न विझणाऱ्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापाला प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक, दोन पाय असून नरकात टाकले जावे ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. दोन डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एकडोळ्या होऊन देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आणि आळस हे षड्रिपू (सहा विकार) माणसाचे विकार. त्यापैकी मत्सर ह्या विकारामुळे आपली केवढी हानी होत असते त्याविषयी आजची वाचने आपल्याला जाणीव करून देतात.
१) मत्सर हा दुर्गुण सर्वांचीच प्रगती रोखून धरतोः आजच्या पहिल्या वाचनात एक तरुण पुरुष मोशेकडे येऊन सांगतो की, सत्तर वडील जनांपैकी एल्दाद व मेदाद हे दोघेजण तंबूमध्ये लोकांना देवाचा संदेश देत आहेत. ती बातमी आणणाऱ्या माणसाला वाटले होते की मोशेला त्यांचा मत्सर वाटेल तो रागावेल. परंतु मोशे मोठ्या मनाचा होता. देवाचा संदेश सांगणे ही काही आपलं एकट्याचीच मक्तेदारी आहे असे त्याने मानले नाही उलट देवाचे सर्वच लोक असं संदेश देऊ लागले असते तर किती बरे झाले असते असा उदात्त विचार त्याने मांडला.
२) मत्सर हा दुर्गण इतरांचे अहित चिंतितोः जे दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे का नाही असा विचार करून मत्सरी माणूस थांबत नाही तर जे माझ्याकडे नाही ते दुसऱ्याकडे तरी असता कामा नये असा दुर्विचार करते व त्यानुसार इतरांचे अहित साधण्याचा प्रयत्न करतो. त्याही पलीकडे जाऊन जे माझे आहे ते इतरांना मिळता कामा नये असेही या व्यक्तीला वाटत असते. आजच्या दुसऱ्या वाचनात गरिबांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या श्रीमंतांना संत जेम्स धारेवर धरतो.
३) मत्सर हा दुर्गण इतरांच्या मार्गात अडथळा उत्पन्न करतोः प्रभू येशूचा अनुयायी नसलेला एक मनुष्य येशूच्या नावाने भुते काढीत होता. प्रेषितांना त्याचा हेवा वाटला कारण त्यांना तसा अधिकार मिळालेला असतानाही एका फेफरेकरी मुलामधून त्यांनी भूत काढून टाकले नव्हते. त्यामुळे आता ते त्या माणसाला मना करून त्याच्या कार्यात अडथळा आणू पाहात होते. येशूची भूमिका मात्र अधिक व्यापक व उदात्त आहे. जो मला अनुकूल आहे तो मला प्रतिकूल नाही. इतरांच्या कार्यात अडथळा आणण्याने आपला कोणताही फायदा होत नाही.
आत्मपरीक्षणः मत्सरामुळे माझे व इतरांचे कोणकोणते नुकसान झालेले आहे, होत आहे ? मोशे व येशू ह्यांच्या वागण्यातून मत्सरावर मात करण्यास मला कोणती प्रेरणा मिळते.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या मळ्यात कार्य करण्यास प्रेरणा, सामर्थ्य व कृपा दे, आमेन,
✝️

0 टिप्पण्या