Marathi Bible Reading | Monday 27th September 2021 | 26th Week in ordinary Time

    सामान्य  काळातील 

२६वा सप्ताह 

सोमवार 

२७ सप्टेंबर २०२१


  ✝️  


 संत विन्सेंट डी पॉल
वर्तनसाक्षी (१५८१-१६६०)

गास्कीनो (फ्रान्स) येथल्या एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेला विन्सेंट वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी धर्मगुरू झाला. ५ वर्षांनीच त्यांना तुर्कस्थानच्या लोकांनी पकडून नेले आणि दोन वर्षे ट्यूनिस येथे गुलामगिरीत जखडून ठेवले. तेथे असताना त्यांनी आपल्या घरमालकाला ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली व त्याला ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. दोन वर्षांनी या घरमालकासह त्याला या गुलामगिरीतून बाहेर येण्याची संधी मिळाली व ते उजळ माथ्याने ख्रिस्तराज्याची सुवार्ता पसरू लागले..
इ. स. १६१९ साली राजा लुईस तेरावा ह्याने त्यांना आपल्या राजदरबारात 'जनरल आल्मोनर' म्हणून नियुक्त केले. राजाच्या तुरुंगात एकाहून एक भयंकर असे गुन्हेगार डांबून ठेवण्यात आलेले होते. त्यांच्याशी हितगूज साधून फा. विन्सेंट ह्यांनी त्यांचे मनपरिवर्तन केले. भांडखोर गुलामांना सौजन्याने कसे वागावे ते शिकविले. शहरातील इस्पितळांना शरीराने व आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याच्या बळावर त्याने नवीन जीवन मिळवून दिले. त्यामुळे रूग्ण फक्त शारीरिकच नव्हे तर आत्मिक आजारांतूनही बरे होऊन जात. येताना ते मूर्तिपूजक म्हणून येत. जाताना किंवा मरताना ते ख्रिस्ताच्या नावाचा जयजयकार करीत.
इ.स. १६२६ साली 'काँग्रीगेशन ऑफ प्रिस्ट्स ऑफ द मिशन्स' या संस्थेची स्थापना झाली. त्याद्वारे फा. विन्सेंट व एक धर्मप्रांतीय धर्मगुरू ह्यांनी सामुदायिक जीवन जगून गरीब राष्ट्रांतील लोकांच्या तारणासाठी आयुष्य वेचण्याचे व्रत घेतले.  पुढे एका बिशपांच्या विनंतीवरून त्यांनी सेमिनरीतील बंधूंना प्रशिक्षण देण्याचे प्रेषितकार्य हाती घेतले. त्यात त्यांना इतके प्रचंड यश मिळाले की, पुढे फ्रेंच राज्यक्रांतीला तोंड फुटले, तेव्हा फ्रान्समधील एक तृतीयांश सेमिनरींचा कारभार फा. विन्सेंटच्या संस्थेच्या हाती होता.
पॅरीसमधील सेंट लाझारे हे 'प्रिस्ट्स ऑफ द मिशन्स'चे मुख्य केंद्र होते. तेथे फा. विन्सेंट ह्यांनी धर्मगुरू आणि प्रापंचिक ह्यांच्यासाठी तपसाधना वा रिट्रीट्स आयोजित करण्यास सुरुवात केली व त्याद्वारे जनमानसात आध्यात्मिकतेचे बीज पेरले. ही आध्यात्मिकतेची चळवळ सुरू असताना त्यांनी पॅरीस येथे गोरगरिबांची सेवाचाकरी करणे चालूच ठेवले.

सरदार घराण्यातील स्त्रियांमध्ये त्यांनी परोपकार बुद्धी जागृत केली. त्यांतून 'लेडीज ऑफ चॅरिटी' ही संस्था उदयास आली. या संस्थेने शहरातील असंख्य इस्पितळांचे नूतनीकरण केले. ह्या इस्पितळांव्यतिरिक्त फा. विन्सेंट ह्यांनी उपेक्षितांसाठी आश्रम, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मतिमंदांची शाळा आणि कुष्टधामे ह्यांची स्थापना केली. ह्या सर्व सेवाभावी संस्थामध्ये 'डॉटर्स ऑफ चॅरिटी' ह्या व्रतस्थांच्या भगिनी सेवाकार्य करीत.

वरील सर्व कार्य करण्यासाठी फा. विन्सेंट डी पॉल ह्यांना संत लुईजा डी मारिलेक ह्यांचा खूप आधार लाभला. तरुण उपेक्षित स्त्रियांना पॅरीसमधील कॉन्व्हेंटमध्ये आसरा देण्यात आला. फा. विन्सेंट म्हणत, 'जे गोरगरिबांवर प्रेम करतात ते मरणाला सामोरे जाताना कधीच भयभीत होत नाहीत.'

ट्यूनिस, अल्जिएर्स आणि बिझेर्टा येथल्या ३०,००० ख्रिस्ती गुलामांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी फा. विन्सेंट ह्यांनी आपले धर्मगुरू व धर्मबंधू पाठवून दिले. त्यांनी आपल्या धार्मिक कर्तव्यांव्यतिरिक्त गुलामांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क ठेवण्यासाठी 'निरोप्या' म्हणून कार्य केले. फा. विन्सेंट डी पॉल ह्यांनी आपल्या आयुष्यभरात सहा दशलक्ष डॉलर्स इतकी देणगी जमा केली होती. ती त्यांनी १,२०० गुलामांना मुक्त करण्यासाठी खंडणीदाखल दिली.

प्रार्थना, चिंतन आणि विरक्तवृत्तीची साधना हे फा. विन्सेंट डी पॉल ह्यांच्या अथक परिश्रमामागचे प्रेरणास्थान होते. स्वत:पेक्षा अधिक प्रमाणात त्यांचा देवावर आणि देवाच्या दानशूरतेवर भरवसा होता. त्यांच्या नम्रतेमुळेच देवाने त्यांना खऱ्या अर्थाने उंचावलेले होते.फा. विन्सेंट डी पॉल २७ सप्टेंबर १६६० रोजी मरण पावले आणि १७३७ साली पोप क्लेमेंट बारावे ह्यांनी त्यांना संतपद देऊन सन्मानित केले. त्यांच्या नावाने गोरगरिबांच्या कल्याणासाठी 'संत विन्सेंट डी पॉल सोसायटी' ही सेवाभावी संस्था जगभर १४३ हून अधिक देशांमध्ये कार्य करीत आहे.

चिंतन : बंधुप्रेमातून उगम पावणाऱ्या परोपकाराला अडथळा ठरणाऱ्या मत्सरीवृत्ती पासून सावध रहा. - संत विन्सेंट डी पॉल. 

प्रभू येशूने दिलेली नम्रतेची शिकवणूक आपण आपल्या आचरणात कशाप्रकारे आणू शकतो, यावर आपण आज चिंतन करु या. प्रभू येशू स्वतः देव असून आपल्या सर्वांच्या तारणासाठी नम्र होऊन मानव झाला. आपल्यातील अहंकार, मी पणा, मोठेपणा आणि जे काही आपल्याला देवापासून दूर घेऊन जाऊ शकते त्याचा त्याग करु या. नम्रतेचे जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा मागू या.

✝️
पहिले वाचन : जखऱ्या  ८ :१-८

वाचक :जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
“मी आपल्या लोकांना पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून सोडवून आणीन. "

सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सियोनसंबंधाने मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे, तिच्याकरिता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्त झालो आहे. परमेश्वर असे म्हणतो, मी सियोनला परत आलो आहे. मी येरुशलेमला वस्ती करणार. येरुशलेमला संत्यनगर म्हणतील आणि सेनाधीश परमेश्वराच्या पर्वताला पवित्र गिरी म्हणतील. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, म्हातारे आणि म्हाताऱ्या, येरुशलेमच्या रस्त्यात आपल्या वृद्धापकाळामुळे हातात काठी घेऊन बसतील. नगराच्या रस्त्यात खेळ खेळणाऱ्या मुलामुलींची गर्दी होईल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत या अवशिष्ट राष्ट्रांना ही गोष्ट अचंब्याची वाटते म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आपल्या लोकांना पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून सोडवून आणीन आणि ते येरुशलेमामध्ये वस्ती करतील. सत्याने आणि धर्माने ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १०२:१६-२१,२९,२२-२३

प्रतिसाद :  परमेश्वर सियोन पुन्हा उभारील.

१) राष्ट्रे परमेश्वराच्या नावाला, पृथ्वीवरील सर्व राजे 
तुझ्या ऐश्वर्याला भीतील, 
कारण परमेश्वर सियोन पुन्हा उभारील, 
तो आपल्या गौरवाने प्रकट होईल. 
तो निराश्रितांच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो, 
त्यांची प्रार्थना त्याने तुच्छ मानली नाही.

२) पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल, 
पुढे उत्पन्न होणारी प्रजा परमेश्वराचे स्तवन करील, 
कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानावरून खाली पाहिले. 
त्याने आकाशातून पृथ्वीकडे पाहून बंदिवानांचे उसासे ऐकले, 
ज्यांचे मरण ठरले होते त्यांना सोडवले 

३) तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, 
त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल, 
ह्यासाठी की त्यांनी सियोनेत परमेश्वराच्या 
नामाची घोषणा करावी आणि येरुशलेमेत त्याची स्तुती गावी. 
परमेश्वराची उपासना करायला लोक 
आणि राज्ये एकत्र होतील तेव्हा असे होईल.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, बोल तुझा दास ऐकत आहे, 
सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत.
 आलेलुया!


शुभवर्तमान  लूक ९:४६-५० 

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  

"तुम्हा सर्वामध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे."

आपणामध्ये मोठा कोण ह्याविषयी शिष्यांमध्ये आपसांत वाद सुरू झाला. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बाळकाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले, मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी ह्या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो, कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे." योहानने म्हटले, "गुरुजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हांला अनुसरत नाही." येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका, कारण जो तुम्हांला प्रतिकूल नाही तो तुम्हांला अनुकूल आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: दुसऱ्या व्हॅटिकन विश्वपरिषदेची परिपत्रके प्रसिद्ध झाल्यावर "सर्व धर्म स्नेह आदरभाव" या शिकवणुकीला खूप महत्त्व देण्यात आले आहे. ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्याच्याठायी मानवतेची मुक्ती आहे. हे सत्य आम्ही मान्य करतो. त्याचबरोबर इतर धर्मियांची शिकवणूक देखील त्यांना अंतीम सत्याकडे घेऊन जाईल हे देखील ख्रिस्तसभा स्वीकारीत आहे. "स्वर्गात परमेश्वराला गौरव व पृथ्वीवर सज्जनांना शांती" या नाताळ गीतामध्ये सज्जन म्हणजे सर्व मानवांप्रति सद्भावना बाळगून जे बंधुप्रीतीने व न्यायाने वागतील त्यांना ख्रिस्ताच्या मुक्तीयोजनेत सहभाग मिळेल. आमच्या अवतीभोवती वावरणाऱ्या व बंधुप्रेमाने व न्यायाने वागणाऱ्या सर्व बांधवाप्रति स्नेहभाव बाळगू या.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वांबरोबर नम्रतेने वागावे व तुझी आज्ञा पाळावी म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.
✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या