Marathi Bible Reading | Tuesday 28th September 2021 | 26th Week in ordinary Time

     सामान्य  काळातील 

२६वा सप्ताह 

मंगळवार 

२८ सप्टेंबर २०२१




  ✝️  


  संत वेन्सेस्लॉस
राजा, रक्तसाक्षी (९०७-९२९)

बोहेमिया (झेकोस्लाव्हाकिया) येथे लुडमिला नावाची एक साध्वी स्त्री राहात होती. तिच्यामध्ये अतिपवित्र साक्रामेंताविषयी नितांत आदर व भक्तिभाव होता. तिने आपला नातू वेन्सेस्लॉस ह्या राजपुत्रामध्ये खऱ्या ख्रिस्ती धर्माविषयी आवड व तळमळ उत्पन्न केली. परंतु त्याचे ख्रिस्ती वडील मरण पावल्यानंतर त्याच्या आईने पुन्हा एकदा मूर्तिपूजेला प्रोत्साहन द्यावयास सुरुवात केली. तिने प्रथम जर्मन मिशनऱ्यांना आपल्या राज्याबाहेर हाकलून दिले. तरुण राजपुत्र वेन्सेस्लॉस ह्याच्या हातून राजसत्ता हिसकावून घेतली आणि लुडमिला हिचा गळा दाबून खून केला.

अशा क्रूर स्त्रीच्या राज्यकारभाराला लोकांकडून कडवा विरोध झाला. त्यांनी राजपुत्र वेन्सेस्लॉस ह्याला पाठिंबा देऊन त्याच्या आईच्या हातून राजसत्ता हस्तगत केली. राज्यपदावर येताच राजा वेन्सेस्लॉस ह्यांनी जर्मन धर्मगुरूंना पुन्हा आपल्या राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी बोलाविले. त्यांना भरपूर प्रोत्साहन दिले व बोहेमियाचा धार्मिक, नैतिक आणि सांस्कृतिक दर्जा उंचावला. त्याला हृदयाची कोमलता, धैर्य व उत्साह ह्यांची अनमोल अशी देणगी देवाकडून मिळालेली होती.

सम्राट ओटो पहिला ह्यांच्याकडून त्याला 'बोहेमियाचा राजा' हे पद मिळाले होते. परंतु बऱ्याचशा सरदारांनी त्याच्या राजकीय धोरणांना विरोध केला व त्याचा फायदा त्याच्या आईने उठविला. तिने वेन्सेस्लॉसला सिंहासनावरून बाजूला सारून त्याच्या जागी आपला दुसरा मुलगा बोलेस्लाव ह्याला बसविले.

दररोज अतिपवित्र साक्रामेंतासमोर गुडघे टेकून प्रार्थना करणे ही वेन्सेस्लॉस ह्याची सवय सर्वांना परिचित होती. एकदा तो असाच आल्तबुन्झलाव चर्चमधून प्रार्थना करून बाहेर पडत असताना त्याच्या भावाने त्याला चर्चच्या उंबरठ्यावरच ठार मारले.

संत वेन्सेस्लॉस हा बोहेमियाचा आश्रयदाता संत मानला जातो.

✝️
पहिले वाचन : जखऱ्या  ८ :२०-२३

वाचक :जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन

“पुष्कळ लोक येरुशलेमाला परमेश्वराच्या चरणी येतील."

सेनाधीश परमेश्वर म्हणतो: “राष्ट्र आणि अनेक नगरांचे रहिवासी येतील अशी वेळ येईल, एका नगराचे रहिवासी दुसऱ्या नगरात जाऊन म्हणतील, आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू आणि सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू, मीही जातो. पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे येरुशलेमात सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास आणि परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसांत सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी दहा जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हांबरोबर येतो, कारण देव तुम्हांबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे."

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ८७:१-७

प्रतिसाद :  परमेश्वर आम्हाबरोबर आहे.

१) परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतावर आहे 
याकोबच्या सर्व वसतिस्थानांहून सियोनची द्वारे 
त्याला अधिक प्रिय आहेत. 
हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगितल्या जातात.

२) राहाब आणि बाबेल मला ओळखतात 
असे मी जाहीर करीन. 
पाहा, पलेशेथ, सोर आणि कुश म्हणतात, 
ह्याचा जन्म तेथलाच. सियोनविषयी म्हणतील की, 
हा आणि तो तिच्यातच जन्मले होते.

३) परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील. 
लोकांची नावनिशी करताना ह्यांचा जन्म तेथलाच, 
असे परमेश्वर लिहील, 
गायन आणि नृत्य करणारे म्हणतीलः 
माझे सर्व उगम तुझ्याच ठायी आहेत.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला
आनंदीत करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात.
 आलेलुया!


शुभवर्तमान  लूक ९:५१-५६ 

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"येशूचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता. "

येशूला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने येरुशलेमला जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी शोमरोन्यांच्या एका गावात गेले, पण त्यांनी स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब आणि योहान म्हणाले, “प्रभो, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय ?” त्याने वळून त्यांना धमकावले. मग ते दुसऱ्या गावात गेले.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: जुन्या करारात असा प्रसंग लिहिलेला आहे की, आब्राहाम परमेश्वरासमोर उभा राहून मध्यस्थी करीत आहे. सदोम व गोमोरा या नगरीतले लोक नीतिभ्रष्ट झाले होते. देवाच्या शब्दाचा सतत अनादर करीत होते. त्यांचा समूळ नाश करण्याचे देवाने ठरविले तेव्हा आब्राहाम मध्यस्थी करताना विनवणीच्या शब्दात प्रार्थना करीत आहे. "हे परमेश्वरा, या नगरात काही लोक सदाचारी असतील. त्यांचा तू नाश करू नकोस.” हिंसा व विध्वंस करून बदला घेणे हे परमेश्वराला कधीही मान्य नाही. ख्रिस्त व त्याच्या शिष्यांचे स्वागत न करणाऱ्या शोमरोनी लोकांना शिक्षा व्हावी, त्यांचा संपूर्ण विनाश व्हावा ही मागणी प्रभू ख्रिस्ताने स्वीकारली नाही. ख्रिस्त शिष्यांनी सहनशील राहावे. अहिंसेच्या मार्गाने शत्रूंना जिंकून घ्यावे. “हे प्रभू ख्रिस्ता, सर्व बांधवाप्रति सहनशीलतेने वागण्याची कृपा आम्हाला दे.”

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करण्यास व तुझी परस्पर प्रीतिची आज्ञा पाळण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या