सामान्य काळातील
२६वा सप्ताह
बुधवार
२९ सप्टेंबर २०२१
"त्याचे प्रभूत्व अक्षय, अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे."
✝️
संत मायकल, संत ग्राब्रिएल व संत राफाएल सण
ख्रिस्तसभा आज संत मायकल, संत ग्राब्रिएल व संत राफाएल ह्या महादूतांचा सोहळा साजरा करीत आहे. दूत म्हणजेच संदेशवाहक व देवदूत म्हणजे देवाचा संदेश वाहक, देवदूत हे सर्वदा देवाच्या सान्निध्यात देवाच्या गौरव करीत उभे असतात. देवदूत हे स्वर्गीय दिव्य व्यक्ती असून त्यांना पवित्र असे निर्माण केलेले आहे, असा बायबलमध्ये उल्लेख आहे (उत्पत्ती १:३१). देवदूतांना देह नसला तरी अनेकदा ते सदेह प्रकट झाल्याची नोंद बायबलमध्ये आहे. आजच्या पहिल्या वाचनात दानीएल संदेष्ट्याला झालेल्या दृष्टांतात त्याने देवदूतांचे वर्णन केले असून ते परमेश्वराला गौरव करीत असतात. कारण 'परमेश्वराचे प्रभूत्व अक्षय, अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांना देवदूत साहाय्य करून त्यांचे रक्षण करीत असतात. तीनही महादूतांच्या नावात वैशिष्ट्य आहे. मायकल म्हणजे देवासमान, सैतानी प्रवृत्तीवर विजय मिळविणारा असा आहे. संत मायकल हा पवित्र ख्रिस्तसभेचा आश्रयदाता व परमगुरूंचा संरक्षक संत आहे. गाब्रियल म्हणजे देवाचे सामर्थ्य. गाब्रियल देवदूताने स्वप्नात दानीएलला दर्शन दिले. योहान बाप्तीस्ताच्या जन्माची पूर्वसूचना देणारा आणि विशेषता धन्य कुमारी मरियेला देवाच्या पुत्रजन्माचा संदेश दिला. गाब्रियला दूताने ख्रिस्तजन्माची सुर्वाता मेंढपाळांना सांगितली. तसेच संत योसेफला इजिप्त देशात जाण्याचा संदेश दिला. राफायल या नावाचा अर्थ देवाचे आरोग्य प्रदान असा आहे. तोबितला राफायल दूताने दृष्टीदान दिले. संत राफयल देवदूत सर्व प्रवाशांचा आणि बालकांचा आश्रयदाता आहे.
आपल्या प्रत्येकाला सुद्धा एक संरक्षक दूत देवाने दिला आहे. संत बर्नड म्हणतात, आपण कितीहि निराश असलो, अडचणीत संकटात व दुःखात असलो तरी संरक्षक देवदूत आपल्या बरोबर असतो.' त्या मैत्रीपूर्वक देवदूतांशी आपण संवाद साधू या.
✝️
पहिले वाचन :दानीएल ७ : ९-१०. १३-१४
वाचक :दानीएलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“हजारो देवदूत त्याची सेवा करत होते."
मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला. त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवास वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायसभा भरली, पुस्तके उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले इतक्यात पाहा, आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्र आणि सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
पर्यायी पहिले वाचन
वाचक : प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन १२:७-१२
"मायकल आणि त्याचे दूत अजगराबरोबर लढले."
स्वर्गात युध्द सुरू झाले, मायकल आणि त्याचे दूत अजगराबरोबर युध्द करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर आणि त्याचे दूत लढले, तरी त्याचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्याचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल आणि सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला आणि त्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली : “आता आमच्या देवाने सिध्द केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे आणि आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरण्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही. म्हणून सर्वांनो आणि त्यात राहणाऱ्यांनो, उल्हास करा."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३८:१-५
प्रतिसाद : प्रभो, देवदूतांसमक्ष मी तुझी स्तोत्रे गाईन
१) प्रभो, मी अगदी मनापासून तुझे उपकारस्मरण करीन,
देवदूतांसमक्ष तुझी स्तोत्रे गाईन.
तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझीउपासना करीन.
२) तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे
मी तुझ्या नामाचे उपकारस्मरण करीन.
कारण तू आपल्या संपूर्ण नामापेक्षा
आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.
मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला,
तू तू मला हिम्मत दिलीस तेव्हा मला सामर्थ्य प्राप्त झाले.
३) हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे
तुझे उपकारस्मरण करतील,
कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत.
ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील :
“परमेश्वराचा महिमा किती थोर आहे !'
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्याच्या सर्व सेवक-सैन्यांनो,
प्रभूला धन्यवाद द्या.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १:४७-५१
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"देवदूतांना चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल."
नथनेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही !” नथनेल त्याला म्हणाला, “आपणाला माझी ओळख कोठली ?” येशूने त्याला उत्तर दिले, "फिलीपने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले.” नथनेल त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलचे राजे आहा.” येशू त्याला म्हणाला, "मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू श्रध्दा ठेवतोस काय ? ह्याच्यापेक्षा मोठया गोष्टी पाहशील." आणखी तो त्याला म्हणाला, "मी तुम्हांला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: प्रभू येशू चांगल्या गुणांची पारख करीत आहे. नाथानेल हा माणूस येशूला पहिल्यांदाचभेटला. परंतु या भेटीपूर्वीच त्याला प्रभू येशूने ओळखले होते. तो खराखुरा इस्राएली माणूस आहे. सत्याने चालणारा आहे. गर्विष्ठ नाही, कपटी नाही. येशूने नुसते त्याला ओळखले नाही तर पारखले आहे. तो प्रेषित होण्यास लायक आहे हे येशूने मनात जाणले होते. आपल्या मनातल्या सर्व सद्भावना ह्या देवाने दिलेल्या आहेत. त्यानुसार वागून येशूचे अनुयायी होऊन जीवन जगणे हे आम्हालाही आमंत्रण आहे. हे प्रभू येशू, नाथानेलप्रमाणे तुझ्याठायी मुक्तीदात्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. तसेच आज महादूत संत मायकल, गॅब्रिएल व राफाएल ह्यांचा सण साजरा होत आहे. त्यांच्याद्वारे आम्हाला तुझे संरक्षण लाभावे, तुझी सुवार्ता समजावी व आम्हांला चांगले आरोग्य मिळावे अशी कृपा कर.
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, देवदूतांसमान सर्वदा तुझी स्तुती गाण्यास व तुला धन्यवाद देवून गौरव करणयास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या