Marathi Bible Reading | Thursday 30th September 2021 | 26th Week in ordinary Time

       सामान्य  काळातील 

२६वा सप्ताह 

गुरुवार 

३० सप्टेंबर २०२१

“त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.”


  ✝️  

संत जेरोम  -
वर्तनसाक्षी,धर्मपंडित (३४१-४२०)

सोफ्रोनियस युजेबियस हैरोनिमस असे लांबलचक नाव असलेला जेरोम दल्मातिया (युगोस्लाव्हिया) प्रांतात जन्माला आला. त्याने रोम शहरात अभ्यास केल्यानंतर वृत्तीने ज्ञानपिपासू असलेला हा अभ्यासू बुद्धीमान माणूस ज्ञानाच्या शोधार्थ बरीच वर्षे दूरदूरचा प्रवास करीत राहिला. फा, जेरोम ह्यांची अभ्यासूवृत्ती, विविध भाषांवरील प्रभुत्व बायबलचे ज्ञान आणि चिकाटी ह्यामुळे तब्बल १८ वर्षांनी इ.स. ४०४ साली हे बायबल भाषांतराचे कार्य त्यांनी तडीस नेले. त्या आवृत्तीला 'व्हल्गेट' (म्हणजे दैनंदिन वापरासाठी बायबलची आवृत्ती) असे नाव देण्यात आले. पुढे ११०० वर्षांनी ट्रेंट इथे भरलेल्या विश्वपरिषदेमध्ये 'जेरोमकृत भाषांतरीत बायबल हे ख्रिस्तसभेचे अधिकृत भाषांतर आहे' अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला.
नितांत श्रद्धा आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता ह्यांचा सुंदर मिलाफ त्यांच्याठायी घडून आलेला होता. मोठ्या खंबीरपणे बायबलवर सडेतोडपणे बोलणारे संत जेरोम रात्रीच्या रात्री प्रार्थनेमध्ये एकांतवासात घालवीत. पुष्कळ उपासतापास करीत. शेवटपर्यंत त्यांनी आपल्या शरीराला अनंत आत्मक्लेश दिले.३० सप्टेंबर ४२० रोजी आपल्या परिश्रमाचे प्रतिफळ मिळविण्यासाठी स्वर्गीय निजधामी गेलेला हा महापुरुष ग्रंथपालांचा आश्रयदाता संत मानला जातो.
त्यांच्या मते 'पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला प्रार्थना कराविशी वाटली पाहिजे आणि प्रार्थना करीत असताना पवित्र शास्त्रातील वचनांचा आधार आपल्याला घ्यावासा वाटला पाहिजे. 'पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान होय.'

चिंतन : सतत काहीतरी करीत रहा, मग परमेश्वर येवो वा सैतान येवो, तुमचे हात पुष्कळशा चांगल्या गोष्टींनी भरलेले आहेत असे त्याला दिसले पाहिजे.-संत जेरोम ■■

बायबल वाचन, मनन-चिंतन, प्रार्थना व उपासनाविधीतील आपला सहभाग ह्याद्वारे आपण प्रभूची सामर्थ्यशाली कृपा अनुभवून देवाचे राज्य सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत होऊ या. 

✝️
पहिले वाचन :नहेम्या  ८:१-४अ.५-६.७ब-१२

वाचक :नहेम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन ८:१-४अ.५-६.७ब-१२

“एजाने नियमशास्त्राचा ग्रंथ उघडून लोकांना आशीर्वाद दिला आणि सर्व लोकांनी 'आमेन, आमेन', असे म्हटले."

सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले आणि एज्रा शास्त्री याला म्हणाले, परमेश्वराने इस्राएल लोकांना दिलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्रीपुरूषांपुढे आणि ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वापुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशी समोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे आणि ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला. एज्जाने उभा राहून तो ग्रंथ उघडला, तेव्हा एज्रा सर्वांना दिसला, कारण तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर ह्याला धन्यवाद दिला आणि सर्व लोकांनी आपले हात वर करून 'आमेन, आमेन,' असे म्हटले आणि आपली डोकी लपवून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वराला प्रणाम केला. लेवीसुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकांना समजावून सांगत होते आणि लोक आपल्या स्थानी उभे होते. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ, स्पष्टीकरणासह वाचून दाखवला, वाचले तेवढे लोकांना चांगले समजले.

मग नहेम्या प्रांताधिपती, एज्रा याजक, शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, "हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका, रडू नका." कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यांना सांगितले, “जा, मिष्टात्राचे • जेवण करा, गोडगोड पेय घ्या आणि ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय, " "शांत राहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे, दुःख करू    नका,” असे म्हणून लेव्यांनी लोकांना शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यासाठी, एकमेकांना ताटे वाढून पाठवण्यासाठी आणि मोठा उत्सव करण्यासाठी निघून गेले, कारण जी वचने वाचून दाखवली होती ती त्यांना समजली होती.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.




प्रतिसाद स्तोत्र  १९:८-११

प्रतिसाद :   परमेश्वराचे नियम सरळ आहेत

१) परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, 
ते मनाचे पुनरुज्जीवन करते, 
परमेश्वराचा बोध विश्वसनीय आहे, 
तो भोळ्यांना समंजस करतो.

२) परमेश्वराचे नियम सरळ आहेत, 
ते हृदयाला आनंदित करतात, 
परमेश्वराची आज्ञा चोख आहे, 
ती नेत्रांना प्रकाश देते.

३) परमेश्वराचे भय शुद्ध आहे, 
ते सर्वकाळ टिकणारे आहे. 
परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत.
 ते सर्वथैव न्याय्य आहेत.

४) ते सोन्यापेक्षा, बावनकशी सोन्याच्या
 राशीपेक्षा इष्ट आहेत, 
ते मधापेक्षा, मोहोळातून पाझरणाऱ्या
 मधापेक्षा गोड आहेत.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!


शुभवर्तमान  लूक १०:१-१२ 

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“तुमची शांती त्याच्यावर राहील."


प्रभूने आणखी बहात्तरजणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे, पाहा, पैशाची थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, ह्या घरात शांती असो, असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हांकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत रहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हांला वाढतील ते खा, त्यात जे आजारी असतील त्यांना बरे करा आणि त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही गावात गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर तेथील रस्त्यावर बाहेर जाऊन असे म्हणाः आमच्या पायांस लागलेली तुमच्या गावची धूळ देखील तुमची तुम्हांस झाडून टाकतो,” तथापि हे लक्षात ठेवा की, "देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हांला सांगतो, त्या गावापेक्षा सदोमला त्या दिवशी सोपे जाईल.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: एज्रा संदेष्ट्याने उंच ठिकाणी उभे राहून, धर्मग्रंथ उघडला व देवाचे वचन, सर्वांना समजावून सांगितले. त्या श्रद्धावान लोकांच्या हृदयास | देवाच्या वचनांनी स्पर्श केला. “हा दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्या प्रीत्यर्थ पवित्र आहे. तर शोक करू नका, रडू नका, हर्ष करा. मिष्टान्नाचे जेवण करा व सर्वांना सहभागी करा.” शुभवर्तमानात प्रभू येशू शिष्यांना गावोगावी पाठवित आहे. “देवाचे राज्य जवळ आहे. देवाची शांती तुम्हाला लाभत आहे.” हा संदेश पसरविण्यासाठी अनेक विश्वासूंनी पुढे यावे असे आव्हान येशू करीत आहे. आम्हालादेखील तो देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी बोलावत आहे.

प्रार्थना :हे प्रभू येशू, आमच्या वाणीद्वारे व कृतीद्वारे तुझी सुवार्ता सर्वांपर्यंत  पोहोचविण्यास आम्हाला शक्ती व कृपा दे, आमेन.
✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या