Marathi Bible Reading | Friday 1st October 2021 | 26th Week in ordinary Time

        सामान्य  काळातील 

२६वा सप्ताह 

शुक्रवार 

१ ऑक्टोबर २०२१


जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गराज्यात स्वर्गात मोठा होय.”


  ✝️ 


बाळ येशूची संत तेरेझा
- कुमारिका (१८७३-१८९७)

फ्रान्समधील आलेंकॉन येथल्या एका अत्यंत धार्मिक कुटुंबात मारी फ्रेंक्वाईस तेरेजा मार्टिन हिचा जन्म झाला. कुटुंबातील नऊ भांवडांमध्ये तेरेजाचा क्रमांक अगदी शेवटचा होता. तिच्या आई वडिलांना एकेकाळी व्रतस्थ जीवनाचे आकर्षण वाटले होते. त्यामुळे तिची आई कॉन्व्हेंटमध्ये व वडील सेमिनरीमध्ये गुरूविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेले होते. परंतु देवाची इच्छा व योजना निराळी होती. ते दोघेही माघारी परतले व देवानेच त्यांना एकत्र आणले. त्यांच्या परस्पर संबंधांतून जन्माला आलेल्या नऊ अपत्यांपैकी देवाने पाच मुलींना आपल्या मळ्यात कार्य करण्यासाठी बोलावले.

वयाच्या ९ व्या वर्षांपासून तेरेजा हिने आपल्या इतर बहिणींच्या पावलावर पाऊल ठेवून लिसो येथे असलेल्या कार्मेलाईट कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश करण्याची अदम्य इच्छा मनाशी बाळगली होती. पण तिचे वय केवळ १५ वर्षांचे असल्यामुळे स्थानिक महागुरूंनी तिला प्रवेश नाकारला, तरी त्यामुळे निराश न होता ती थेट पोप लिओ तेरावे ह्यांच्या भेटीसाठी रोम येथे गेली. त्यांच्या शिफारशीवरून वयाच्या केवळ १६ व्या वर्षी मदरनी तिला आपल्या कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश दिला.

त्यानंतर सिस्टर तेरेजा हिची पावित्र्यामध्ये व नम्रतेमध्ये भराभर वाढ होत गेली. येशू बाळाविषयी तिला विशेष भक्ती वाटत असे. तिचे स्वत:चे जीवनही बालकाप्रमाणे निरागस होते. त्यामुळे तिला 'बाळ येशूचे चिमुकले फूल' ही पदवी देण्यात आली व अवघ्या २२ वर्षांच्या वयात तिला नॉव्हिसमिस्ट्रेस म्हणून नेमण्यात आले. नि:स्वार्थी सेवावृत्ती, देवावरील नितांत प्रेम व भक्ती, अढळ श्रद्धा, बालसदृश मनोवृत्ती अशा एक ना अनेक सदगुणांनी ती विनटलेली होती. ती म्हणत असे, देव इतका थोर आणि कनवाळू आहे की, तुम्ही जे काही त्याच्याकडे मागाल ते तो तुम्हाला पुरवील. देवाकडे जितक्या उदार अंतःकरणाने तुम्ही मागाल तितक्या उदार अंत:करणाने तो तुम्हाला देईल. शेवटी तो देत असलेले जीवन स्वीकारण्यासाठी मनाची ओंजळही तितकीच मोठी असणे आवश्यक आहे ना!

खरे मोठेपण मोठमोठ्या गोष्टी करण्यात नसून छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मनाने करण्यात आहे हे तिने आपल्या जीवनाद्वारे दाखवून दिले व साध्याभोळ्या लोकांसमोर एक आगळावेगळा आदर्श उभा केला. “एका आत्म्याची कहाणी" या आत्मचरित्रात्मक लिखाणात तिने ही सत्ये नमूद केलेली आहेत. कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करू नये, कुरकूर करू नये, आपण सहन करीत असलेले दुःख मुकाट्याने सोसावे, जे आपल्याशी तुसडेपणाने वागतात त्यांना विशेष प्रेम दाखवावे, हसत खेळत सर्वांशी मिळून मिसळून वागावे हे तिच्या जीवनातील काही महत्त्वाचे मूलमंत्र होते.

कॉन्व्हेंटमधील तिच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत ती इतक्या सहजपणे जीवन जगली की तिच्याविषयी काही सिस्टरांचा तिच्याविषयी गैरसमजच अधिक झाला. आपल्या धर्मगुरूंना व मिशनऱ्यांना प्रार्थनेच्या व त्यागाच्या माध्यमातून सतत प्रेरणा व वळ दयावे हा तिच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग होता. ती म्हणे, आता मला केवळ एकच गोष्ट करावयाची आहे. येशूवर प्रेम करणे आणि त्याच्यासाठी आत्मे जिंकणे अशासाठी की त्या आत्म्यांनी सदासर्वदा येशूवर प्रेम करावे.

दि. ३० सप्टेंबर १८९७ रोजी वयाच्या २४ व्या वर्षी मरण पावलेल्या ह्या चिमुकल्या फुलाला पोप पायस ११ वे ह्यांनी १९२५ साली संतपदाच्या हारात गुंफले. ती रशियाची आश्रयदाती व संत फ्रान्सिस झेवियर ह्यांच्यासह मिशनऱ्यांचा आदर्श मानली गेलेली आहे.
चिंतन : प्रेम ही माझ्या पाचारणाच्या दाराला लावलेली बिजागर आहे.
- बाळ येशूची संत तेरेजा

ख्रिस्तसभा आज विनम्र, बालसदृश्य मनोवृत्ती व प्रीतिने ओतप्रोत  भरलेली बाळ येशूची संत तेरेजा हिचा सन्मान करीत आहे. देवावरील निखळ  प्रेम व बाळ येशूविषयी महान भक्ती ह्यामुळे संत तेरेजाचे जीवन प्रार्थनामय बनले. मिशन विभागात कार्यकरणाऱ्या सर्व धर्मगुरुंना आणि मिशनऱ्यांना त्यांचे  सेवाकार्य करण्यास प्रेरणा व बळ मिळावे म्हणून संत तेरेजाने आपले संपूर्ण  जीवन प्रार्थना व त्याग करण्यात घालविले. संत तेरेजाचा आदर्श समोर ठेवून, नम्र, प्रेमळ आणि प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी आपण मध्यस्थी करु या. 

✝️
पहिले वाचन :यशया   ६६:१०-१४

वाचक : यशया ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन

“यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्हासा, तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा, म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल आणि तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल.” कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, नदीप्रमाणे शांती आणि पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिच्याकडे वाहवितो. तुम्ही स्तनपान कराल, तुम्हास कडेवर वागवतील, मांडीवर खेळवतील. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन, यरुशलेमेत तुमचे सांत्वन करीन. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील, परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल.”

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.




प्रतिसाद स्तोत्र  १३१:१-३

प्रतिसाद : हे देवा माझ्या आत्म्याला शांती लाभो 

 १)हे "रमेश्वरा, माझे मन गविष्ठ  नाही, 
माझीं दृष्टि उन्मत्त नाहीं आणि मोठमोठ्या 
व मला असाध्य अ अशा गोष्टींत मी पडत नाहीं.

२) खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेविला आहे;
दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असतें
तसा माझा जीव, 
दूध तुटलेल्या बाळका सारखा माझ्या ठायीं आहे.

३) हे इस्राएला, आतांपासून सर्वकाळ तूं 
परमेश्वराची आशा धर.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
 आलेलुया!


शुभवर्तमान  मत्तय १८:१-४ 

वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गराज्यात सर्वात मोठा कोण ?” तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, "मी तुम्हास खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गराज्यात तुमचा प्रवेश कदापि होणार नाही. म्हणून जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गराज्यात स्वर्गात मोठा होय.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आजचे शुभवर्तमानाला हे सामुदायिक जीवनावरील प्रवचन किंवा 'community discourse' असे म्हटले जाते. ख्रिस्ती समुदायात शिष्यांचे जीवन कसे असले पाहिजे हे प्रभूयेशू प्रवचनाद्वारे सांगत देत आहे. ख्रिस्तीयांचे जीवन हे फक्त ख्रिस्ताबरोबर असलेले वैयक्तिक जीवन नव्हे तर इतरांबरोबर असलेले सामाजिक जीवन सुद्धा महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यात आलेले आहे. शिष्यांचा पहिला प्रश्न असा आहे की, 'स्वर्ग राज्यांत गौरव कुणाला प्राप्त होणार आहे किंवा स्वर्गात सर्वात मोठा कोण आहे ? प्रभू येशू प्रतिकात्मक अशी कृती करतो. एका बाळासारखे होण्यासाठी येशू सर्वांस आव्हान करीत आहे. पहिल्या शतकातील यहूदी समाजामध्ये बाळकांना दुय्यम दर्जा प्राप्त होता. त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. किंबहुना व्यक्तीपेक्षा ते एक मालमत्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी शिष्यांनी एका बाळकासारखे नम्र झाले पाहिजे असे येशू ष्यांना सांगतो. याचा अर्थ असा आहे की, बाळकांमध्ये जे गुणधर्म आहेत ते आत्मसात करणे. बाळाप्रमाणे निरागस जीवन जगणे, नम्र होणे आणि परमेश्वरावर सदैव अवलंबून राहिले पाहिजे. स्व-महत्व व आत्मनिर्भरतेची बतावणी सोडून देणे आणि स्वर्गीय पित्यावर विसंबून राहाणे असा आहे. एका बाळकाप्रमाणे मी सुद्धा नम्र व निरागस व्यक्ती आहे काय ?

प्रार्थना : प्रभू येशू, आमच्याठायी नम्र हृदय निर्माण कर. निःस्वार्थीपणे तुझी सेवा करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन..

✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या