सामान्य काळातील
२६वा सप्ताह
शनिवार
२ ऑक्टोबर २०२१
कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. "
✝️
रक्षक दूतांचा सण
देवाने प्रथम देवदूतांची निर्मिती केली असे पवित्र ख्रिस्तसभा आपल्याला शिकविते. देवाने माणसाला दिलेल्या नैसर्गिक देणगीपेक्षा महान अशी आध्यात्मिक वरदाने त्याने देवदूतांना दिलेली आहेत.
संत अगस्तीन म्हणतात, "देवदूत आपल्यासारख्या पतित यात्रेकरूवर लक्ष ठेवतात आणि देवाच्या आज्ञेनुसार आपल्या सहाय्याला धावून येतात. आपण कुठेही असलो तरी ते सतत आपल्याबरोबर असतात.”
बायबल पंडित संत जेरोम ह्यांनी म्हटले आहे, “मानवी आत्म्याची प्रतिष्ठा देवाच्या नजरेत इतकी महान आहे की, प्रत्येक आत्म्याचे रक्षण करण्यासाठी देवाने आपणा प्रत्येकाला एक रक्षक दूत दिलेला आहे."
संत वर्नर्ड ह्यांनी तर ख्रिस्ती लोकांना आव्हान केलेले आहे, "देवदूतांना आपले मित्र माना. त्यांच्याशी मैत्री करा. आपण कितीही दुर्बळ असो, कितीही दुःखी असो, आपल्यावर कितीही संकटे आलेली असोत, आपण भिऊन जाण्याचे अजिबात कारण नाही, कारण आपले रक्षण करण्यासाठी देवाने त्याचे दिव्यदूत नेमलेले आहेत."
आपले रक्षकदूत सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून धोक्यापासून आपल्या शरीराचे आणि आत्म्याचे रक्षण करतात. मोहासमयी सैतानाच्या शक्तीपासून ते आपला बचाव करतात. विशेषत: मरणाच्या वेळी ते आपल्याला आधार देतात. आपल्या प्रेषितकार्यात ते आपल्या मनात पवित्र विचार निर्माण करतात. आध्यात्मिक जीवनातील प्रार्थना देवाच्या स्वर्गराज्यात घेऊन जातात.
अनेक संतांना रक्षक दूतांचे दर्शन झालेले आहे. रोम शहरात फ्रान्सिस्का नावाची संत राहात होती. ती म्हणते, “रक्षक दूताठायी वैभव आणि माधुर्य यांचा संगम झालेला मला आढळला. त्याच्या नजरेत चमक होती आणि (नितळ) शुद्धता ओतप्रोत भरलेली होती. त्याच्या नजरेत माणसाच्या आत्म्यात देवाविषयी भक्ती प्रज्वलित करण्याची शक्ती होती."
चिंतन: "आपल्या रक्षक दूतांचा आदर ठेवा. त्यांनी दिलेल्या संरक्षणाबद्दल त्यांचे आभार माना. त्यांच्यावर आपली भिस्त ठेवा, त्यांच्यावर मनापासून प्रेम. सर्व प्रकारच्या समस्यांच्या, धोक्याच्या आणि मोहाच्या वेळी त्याच्याकडे संरक्षणाची याचना करा." संत बर्नर्ड.
प्रार्थना हे माझ्या रक्षक दूता, देवाने मला तुझ्या स्वाधीन केले आहे. माझे रक्षण कर, मला प्रकाश दाखव आणि सुमार्गाने चालवून मला स्वर्गाकडे ने. आमेन.
बायबल वाचन: स्तोत्र ९१:१०-१२
तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील.
पहिले वाचन :निर्गम २३:२०-२३
वाचक :निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले वचन
"माझा दूत तुझ्यापुढे चालतो."
प्रभू म्हणतो, "पाहा, वाटेने तुला सांभाळण्याकरिता आणि मी तयार केलेल्या स्थानात तुला पोहोचविण्याकरिता मी एक दूत तुझ्यापुढे पाठवत आहे. त्याच्यासमोर सावधगिरीने राहा आणि त्याचे म्हणणे ऐक, त्याची अवज्ञा करू नकोस, कारण तो तुमचा अपराध क्षमा करणार नाही, कारण त्याच्याठायी माझे नाव आहे.
“तथापि तू त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील आणि मी सांगतो ते सगळे करशील तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोध्यांचा विरोधी होईन.
"जेव्हा माझा दूत तुझ्यापुढे चालून अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांकडे तुला नेईल तेव्हा मी त्यांचा संहार करीन.'
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९१:१-६,१०-११
प्रतिसाद : तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
१) जो परात्पराच्या आश्रयी वसतो,
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
तो परमेश्वराला म्हणतो,
“तू माझा आश्रय, माझा दुर्ग,तू माझा देव,
तुझ्यावर मी भाव ठेवतो.
२) कारण तो पारध्याच्या पाशातून,
घातक मरीपासून तुझा बचाव करील.
तो तुझ्यावर पाखर घालील,
त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल.
३) रात्रीच्या समयीचे भय,
दिवसा सुटणारा बाण,
काळोखात फिरणारी मरी,
भर दुपारी नाश करणारी पटकी,
ह्यांची तुला भीती वाटणार नाही.
४) कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही,
कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही.
कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची
तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्याच्या सर्व सेवकसैन्यांनो,
प्रभूला धन्यवाद द्या
शुभवर्तमान मत्तय १८:१- ५,१०
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. "
शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, "स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण ?” तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, "मी तुम्हांला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय.“जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो."सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका,कारण मी तुम्हाला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात. "
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: यहूदी समाजमध्ये अशी संकल्पना होती की परमेश्वराने पृथ्वीवर असलेल्या सर्व राष्ट्रांचे मार्गदर्शन व संरक्षण करण्यासाठी देवदूतांची निवड केलेली आहे. इस्रायलच्या वतीने देवाकडे मध्यस्थी करण्यासाठी व इस्रायलचे मार्गदर्शक व संरक्षक म्हणून सुद्धा देवदूताकडे एक विशेष कार्य सोपविण्यात आलेले होते. ह्याच संकल्पनेची पुनरावृत्ती प्रभू येशू आपल्या शुभवर्तमानात करीत आहे. जे समाजात लीन व दीन आहेत त्यांचे संरक्षण करण्यासाठी एका देवदूताची निवड करण्यात आलेली आहे. प्रभू आज स्पष्ट सांगत आहे, समाजात जे गरजवंत व गरीब आहेत त्यांच्याकडे देव कधीही दुर्लक्ष करीत नाही. त्यांचे संरक्षण हे देवदूत करीत असतात. आजच्या आधुनिक युगात स्वर्गातील देवदूतांबद्दल अनेकांच्या मनात एक प्रश्नचिन्ह उदभवत असते. त्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होत असते. देवदूतांचे अस्तित्व हा आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा भाग आहे हे सर्वांना शिकवित आहे. म्हणून आज ख्रिस्तसभा रक्षक दूताचा सण साजरा करीत आहे. युवा श्रद्धाग्रंथ प्र. क्र. ५५ देवदूतांना मदतीसाठी हाक मारू शकतो आणि ‘आपण देवदूतांना मदतीसाठी हाक मारू शकतो आणि त्यांनी स्वर्गीय परमेश्वराकडे आपल्यासाठी मध्यस्थी करावी ही मागणी करू शकतो.' प्रत्येक माणसाला रक्षण मिळते आणि प्रत्येकाने आपल्यासाठी व इतरांसाठी रक्षक दूताकडे मध्यस्थी करावी. विश्वासाने देवदूत ख्रिस्तीमाणसाच्या दृष्टीत पडू शकतात व त्यास सहाय्य करणारे दूत म्हणून दिसू लागतात. माझा रक्षक दूतावर विश्वास आहे का ?
प्रार्थना : हे माझ्या संरक्षकदूता, सर्व प्रकारच्या संकटांपासून, अनिष्टापासून आणि जागतिक मोहापासून माझे संरक्षण कर. मला देवाच्या सानिध्यात
पोहोचव, आमेन.
✝️
0 टिप्पण्या