Marathi Bible Reading | 27th Sunday in ordinary Time | 3rd October 2021

    सामान्य  काळातील 

२७वा रविवार 

३ ऑटोबेर  २०२१



  ✝️ 

“देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. "


मानव म्हणजे देवाची सर्वोत्कृष्ठ उत्पत्ति आहे. आपण सर्वजण देवाची प्रतिमा आहोत. पुरुष आणि स्त्री एकमेकांसाठी अनुरुप असे देवाने निर्माण  केलेले आहेत. देव जो प्रीति आहे त्या प्रीतिचे स्त्री पुरुष म्हणजे प्रतिरूप आहेत. म्हणूनच देवाने स्त्री पुरुषांना पवित्र ऐक्यात ठेवलेले आहे. स्त्री पुरुषाला बहुगुणित वफलद्रूप होण्याचा आशीर्वाद परमेश्वराने दिला आहे.

आजच्या शुभवर्तमानात परुशांनी प्रभू येशूची परीक्षा पाहण्यासाठी  सुटपत्राचा विषय काढला. मात्र विवाह बंधनात एक देह झालेल्याना देवानेच जोडलेले आहे, असे पवित्रशास्त्राचा संदर्भ देऊन स्पष्ट केले. स्त्री-पुरुषाने शरीराने व मनाने एकरूप होऊन देवाची फलद्रूप होण्याची योजना पूर्णत्वास न्यायची आहे. देवाने योजलेली मानवाच्या हिताची योजना कोणीही तोडू शकत नाही. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे, "देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये." ख्रिस्तसभेतील कौटुंबिक सौख्याच्या व देवाच्या योजनेच्या पवित्र विवाह  संस्कारावर आज आपण चिंतन करीत आहोत. विवाह संस्कार ईश्वर निर्मित आहे. पती-पत्नीमधील प्रेम, एकनिष्ठता, सौख्याचे नाते परमेश्वराच्या आशीर्वादाने दृढ झालेले असते, म्हणूनच ख्रिस्तसभा पती-पत्नीच्या  घटस्फोटाला मान्यता देत नाही.

सध्याच्या परिस्थितीत भोगवाद, स्वार्थीपणा व दैवी योजनेविषयीअज्ञान ह्यामुळे अनेक पती-पत्नींचे वैवाहिक जीवन मोडकळीस आल्याचे  आपण पाहतो. देवाची पवित्र कुटुंबाची योजना सर्व पती-पत्नींना समजावी आणि खरी आदर्श ख्रिस्ती कुटुंबे फुलावित व बहरावीत म्हणून आज प्रार्थना करू
या.
 
✝️
पहिले वाचन : उत्पती  २ :१८-२४

वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन

“ती दोघे एकदेह होतील."

परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी मी अनुरूप सहकारी निर्माण करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशू आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडविल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले, तेव्हा आदामने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामने सर्व ग्रामपशू, आकाशातील पक्षी आणि सर्व वनपशू, यांना नावे दिली, पण आदामला कोणी अनुरूप सहकारी मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची सर्व जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला,

“आता ही मात्र माझ्या हाडातले हाड आणि मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. या कारणासाठी पुरूष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, ती दोघे एकदेह होतील."

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १२८ : १-६

प्रतिसाद :  आमच्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर आम्हांला आशीर्वादित करो.

१) जे परमेश्वराचे भय बाळगतात, 
जे त्याच्याच मार्गानी चालतात ते धन्य! 
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील. 
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.

२) तुझ्या माजघरात तुझी पत्नी सफळ
 द्राक्षवेलीसारखी होईल, 
तुझ्या मेजासभोवती तुझी मुले 
जैतुनाच्या रोपांसारखी होतील.

३) पाहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या माणसाला 
असा आशीर्वाद मिळेल. 
परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देवो, 
आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस 
येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.
 तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. 
इस्राएलला शांती असो.


दुसरे वाचन  इब्री  २: ९-११
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

“पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत."

देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित कमी दर्जाचे केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकूटमंडित केलेला असा आपण पाहतो. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःखसहनाच्याद्वारे परिपूर्ण करावे हे उचित होते. कारण तो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायला त्याला लाज वाटत नाही.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे,
तू आम्हांला सत्यात समर्पित कर

 आलेलुया!


शुभवर्तमान मार्क  १०:२-१६ 

वाचक : मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये."

काही परुशी तेथे आले आणि येशूची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की, पुरुषाने आपल्या पत्नीला सूटपत्र देणे सशास्त्र आहे काय ? उत्तरादाखल तो त्यांना म्हणाला, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे ?” ते म्हणाले, सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे. येशू त्यांना म्हणाला, "तुमच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या प्रांरभापासून देवाने त्यांना स्त्रीपुरुष असे उत्पन्न केले. ह्या कारणामुळे पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये."
नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, "जो कोणी आपल्या पत्नीला टाकतो आणि दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो आणि जर तिने आपल्या नवऱ्याला सोडले आणि दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते."
मग त्याने बाळकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटाविले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले आणि तो त्यांना म्हणाला, “बाळकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हांला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही." मग त्याने त्यांना कवटाळून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.


प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: ख्रिस्ती धर्मामध्ये विवाह हा केवळ एक कायदेशीर करार नसून ते एक पवित्र साक्रामेंत आहे असे मानले जाते. पोप सहावे पॉल ह्यांच्यामते लग्न साक्रामेंताच्यावेळी पती-पत्नीच्या प्रेमामध्ये परमेश्वराचे प्रेम येऊन मिसळत असते. आजच्या वाचनांमध्ये विवाह साक्रामेंताची प्रतिष्ठा अधोरेखित करण्यात आलेली आहे. 
१) विवाह साक्रामेंताचा उगम : आजच्या पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे खुद्द परमेश्वराच्या योजनेनुसार विवाह साक्रामेंताचा उगम झालेला आहे. मनुष्य एकटा असावा हे बरे नाही म्हणून परमेश्वर त्याच्यासाठी अनुरूप सहकारी निर्माण करतो. त्यांच्या निर्मितीत त्यांचे ऐक्य दडलेले आहे. 
२) वैवाहिक नात्याची अभेद्यता : वैवाहिक जीवनाचे बंधन इतके पवित्र असते की केवळ गंभीर कारण असल्याशिवाय जे देवाने जोडले आहे ते माणूस तोडू शकत नाही. मात्र असे असूनही मोशेने सूटपत्र देण्याची सवलत का दिली असा प्रश्न परूशी येशूला विचारतात. येशू त्याची दोन कारणे देतोः अंतःकरणाचा कठीणपणा आणि एकमेकांशी केलेली प्रतारणा किंवाअविश्वासूपणा. जर अंतःकरण कठीण असले तर पती-पत्नी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत आणि एकमेकांशी एकनिष्ठेने जर ते वागले नाहीत तर त्यांच्या हातून व्यभिचाराचे पाप घडते आणि मग परस्परांवर विश्वास ठेवणे अवघड होऊन बसते. या दोन्ही परिस्थितीत मनुष्य दुसऱ्याचा विचार न करता केवळ स्वतःच्या स्वार्थीपणाने वागत राहतो. लग्न म्हणजे दोन अपूर्ण जीव एकमेकांना पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर एकत्र जीवन जगण्याचे वचन देतात. ह्या तत्त्वालाच तडा जातो. 
३) वैवाहिक जीवनाचे पावित्र्य : वैवाहिक जीवनाची शुद्धता व पावित्र्य राखण्यासाठी इब्री लोकांस पत्रामध्ये दोन गोष्टी आवश्यक असल्याचे सांगण्यात आलेले आहे : निःस्वार्थीपणा आणि दुःख सहन करण्याची तयारी. त्यासाठी लेखक ख्रिस्तसभेचा पती असलेल्या प्रभू येशूचा आदर्श आपल्यासमोर ठेवतो.

आत्मपरीक्षण : आपल्या समाजात विवाहाची सद्यस्थिती कशी आहे असे आपल्याला वाटते ? वैवाहिक जीवनातील कोणकोणती आव्हाने आज आपल्याला अस्वस्थ करतात ?

प्रार्थना :- हे, प्रभू परमेश्वरा, तुझी दैवी कौटुंबिक योजना जाणण्यास व पती- पत्नीचे नाते अबाधित ठेवण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन.

✝️

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या