सामान्य काळातील
२७वा सप्ताह
सोमवार
४ ऑकटोबर २०२१
✝️
असिसीचे संत फ्रान्सिस
- वर्तनसाक्षी (११८२-१२२६)
इटली येथील असिसी गावात एका कपड्यांच्या व्यापाऱ्याच्या घरी फ्रान्सिस्कोचा इ. स. ११८२ साली जन्म झाला. फ्रान्सिस्कोच्या जीवनाची पहिली वीस वर्षे ख्याली खुशाली, चैनबाजी आणि ऐषारामामध्ये गेली. फ्रान्सिस्को अतिशय देखणा तरुण होता. शेजारी असलेल्या पेरुजिया देशाबरोबर झालेल्या युद्धात फ्रान्सिस्को युद्धकैदी म्हणून पकडला गेला. एक वर्ष त्याला तुरुंगात डांबण्यात आले. तुरुंगातून परतल्यानंतर तो बरेच महिने तापाने फणफणत होता. आपण ज्या प्रकारचे जीवन जगत आहोत ते किती अर्थहीन आहे ह्याची जाणीव त्याला ह्या आजारपणात झाली.
आतापर्यंत जे जीवन त्याने वाया घालविले होते त्याच्या बदली आता तो अधिक पवित्र जीवन जगू लागला. गरिबांची विशेषत: महारोग्यांची सेवा करणे, एकांतात प्रार्थना करणे. चिंतन-मनन आणि प्रायश्चित्त करणे अशा गोष्टी तो करू लागला. तो म्हणत असे "गोरगरिबांची सेवा हीच ख्रिस्ताची सेवा होय.”
एके दिवशी संत डेमियन चर्चमध्ये प्रार्थना करताना क्रुसावरील येशूने त्याला आज्ञा केली “खचत चाललेलं माझं घर दुरूस्त कर." ख्रिस्ताचे हे शब्द शब्दश: घेऊन फ्रान्सिस्को चर्चची डागडुजी करण्यासाठी आवश्यक असलेले दगड जमा करू लागला. त्यासाठी दारोदारी हिंडून भीक मागू लागला. ज्या मुलाविषयी आपल्या खूप मोठ्या आशा अपेक्षा आहेत, तोच आपला मुलगा अशा प्रकारचे लाजिरवाणे जिणे जगत असलेला पाहून त्याचे वडील संतापले आणि त्यांनी सर्वासमक्ष त्याला घराबाहेर हाकलून दिले.
फ्रान्सिसने आपल्या घरादारावर, धन-संपत्तीवर आनंदाने पाणी सोडले आणि तो संन्यासी होऊन गरिबातले गरीब जीवन जगू लागला. ह्यावेळी त्याचे वय अवघे २७ वर्षांचे होते. तो स्वत: ख्रिस्तशिष्य म्हणून जिकडे तिकडे देवराज्याची घोषणा करू लागला. भावाभावांमध्ये प्रेमाचे नाते जोडले जावे, शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये शांतीचे वातावरण नांदावे म्हणून तो लोकांना उपदेश करीत फिरू लागला. हे सर्व तो इतक्या तळमळीने आणि साधेपणाने करीत असे की प्रारंभी जे लोक त्याचा तिरस्कार करीत होते ते आता आश्चर्याने थक्क झाले.
हळूहळू त्याच्याभोवती समविचारी लोक जमा होऊ लागले. शहरातील महत्त्वाची पदे व जबाबदाऱ्या सांभाळणारे त्याचे अनुयायी बनले. त्यांनी आपले होते नव्हते ते विकून टाकले आणि त्यांची मालमत्ता गोरगरिबांना वाटून टाकली.जेव्हा अशा लोकांची संख्या बारावर गेली तेव्हा फ्रान्सिस्को त्यावेळचे पोप इनोसेंट तिसरे ह्यांच्याकडे रोम येथे गेले आणि आपणाला अशाप्रकारे देवराज्याची सुवार्ता पसरविण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्याने पोपमहाशयांना केली. धर्मगुरुपदाविषयी त्याला खूप आदर होता. परंतु तरीही नम्रतेपोटी त्याने डिकन (उपधर्मगुरू) राहून कार्य करण्याचे ठरविले. अशा प्रकारे तृतीय श्रेणीतील धर्मबंधूंच्या संस्थेचा (Third Order Lay Apostolate ) पाया रचिला गेला.
फ्रान्सिसने स्थापन केलेल्या संस्थेचा प्रचार इतका झपाट्याने झाला की १२१९ साली असिसी येथे भरलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेला ५,००० अनुयायी (Friars) एकत्र आले होते. त्यांच्या प्रवचनांचा लोकांवर खूप प्रभाव होताना दिसत होता. स्थानिक भाषा, दररोजच्या जीवनातील उदाहरणे, प्रेमाने ओतप्रोत भरलेली रसाळ व नैतिक जीवनावरील प्रवचने अनेकांना आकर्षून घेऊ लागली.
सदा प्रसन्न परंतु तितकाच नम्र असलेल्या संत फ्रान्सिसने आपल्या प्रेषितीय प्रवासात इटली, दक्षिण फ्रान्स आणि स्पेन येथे बरेच वाद मिटविले. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे असंख्य पापी लोक देवाकडे आले. सोबत सर्वसमावेशक सहानुभूती तर होतीच. ज्यांना धर्मगुरू न होता देवाचं कार्य करायचं होतं त्यांच्यासाठी फ्रान्सिसने १२२१ साली 'तृतीय श्रेणी' ची स्थापना केली. ह्या श्रेणीतील सभासद निरासक्त, वचनबद्ध आणि राजकारणापासून अलिप्त राहात असत.
फ्रान्सिसचे पावित्र्य तर आता इतके पराकोटीला पोहोचलेले होते की इ. स. १२२६ साली त्याच्या शरीरावर येशूचे पाच पवित्र घाय (जखमा) दिसू लागले. त्यावेळी त्याचे वय अवघे ४४ वर्षे होते. शेवटी ४ ऑक्टो. १२२६ साली फ्रान्सिस मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन वर्षांत त्याला संतपद देण्यात आले. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय संत म्हणून त्याची ख्याती आहे.संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचे निसर्गावर नितांत प्रेम होते. त्यांचे सूर्यस्तोत्र खूप प्रसिद्ध आहे. इ.स. १२१२ साली त्यांनी येशू जन्माची महती वर्णन करणारा गाईचा गोठा तयार केला. त्यामध्ये सर्व जिवंत पात्रे त्याने सादर केली. तेव्हापासून गाईचे गोठे नाताळला तयार करण्यात येतात. हे प्रभो, मला तुझ्या शांतीचा दूत बनव' ही त्यांची प्रार्थना जगप्रसिद्ध आहे.
चिंतन : दारिद्र्य हा स्वर्गाकडे जाणारा मार्ग आहे आणि परिपूर्णतेचे मूळ आहे. - संत फ्रान्सिस असिसीकर ■■
शेजारी कोण?” शेजारी माणसाविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी प्रभू येशूने अत्यंत प्रभावी अशा चांगल्या शोमरोनीचा दाखला सांगितला. जो माणूस गरजवंतांना आणि संकटात व अडचणीत असलेल्यांना सर्वतोपरी सहाय्य करतो व त्यांची काळजी वाहतो तो खरा शेजारी होय. आपण कुणाचेही चांगले शेजारी बनू शकतो. समोरचा माणूस अत्यंत बिकट परिस्थितीत असताना त्याचे नाव, गाव, जात, पात ह्याविषयी जाणून न घेता त्याला मदत करायची. तो अनोळखी किंवा ओळखीचा पण असू शकतो.
ख्रिस्ती पाचारण आव्हानात्मक आहे मात्र अशक्य नाही. आपल्या पूर्वजांनी अनेक कसोट्या पार करुन शेकडो वर्षापासून आपली ख्रिस्ती श्रद्धा जोपासली. ख्रिस्तसभा आज संत फ्रान्सिस आसिसीचा सन्मान करीत आहेत. सर्वस्वी गरिबांसाठी सेवाकार्य करणाऱ्या संत फ्रान्सिस चे जीवन अत्यंत साधे, नम्र व पवित्र होते. त्याने असंख्य लोकांना ख्रिस्ताकडे आणले. त्याचा आदर्श ठेवून आपण प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी प्रेरणा घेऊ या.
✝️
पहिले वाचन : योना १:१-१७, २:१०
वाचक : योनाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“योना देवाच्या दृष्टीसमोरून पळाला.'
अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठव, कारण त्यांचा दुष्टपणा माझ्यासमोर आला आहे." पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिश येथे पळून जायला निघाला. तो याफो येथे गेला, तेथे त्याला तार्शिशला जाणारे जहाज आढळले, त्याने त्याचे प्रवासभाडे दिले आणि परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिसला निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला.
तेव्हा परमेश्वराने समुद्रात भयंकर वारा सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या बेतात आले. खलाशी घाबरले आणि आपआपल्या दैवताचा धावा करू लागले, मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा कप्तान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास ? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.
त्यांनी एकमेकांना म्हटले, चला, आपण चिठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणांवर ओढवले हे आपल्याला कळेल. त्यांनी चिठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठी • निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हांवर आले सांग. तुझा धंदा काय ? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यांना म्हणाला, "मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र आणि कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे." तोपरमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते. तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली, ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस?
नंतर ते त्याला विचारू लागले “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे ?" समुद्र तर अधिकाअधिक खवळत होता. तो त्यांना म्हणाला, "मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हांवर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे." जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ही मारमारून थकली, पण त्यांना ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, "हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की या माणसामुळे आम्हांला मारू नकोस आण निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हांवर लावू नकोस, कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करतोस." मग त्यांनी 'तू' योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळावयाचा थांबला. त्या माणसांना तर परमेश्वराचे फार भय वाटले, त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला आणि नवसही केले.
परमेश्वराने योनाला गिळण्यासाठी एका प्रचंड माशाची योजना केली होती, योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री होता. त्यानंतर परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनाला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र योना २:२-४,७
प्रतिसाद : हे परमेश्वरा, मृत्यूपासून तू मला वाचव.
१) मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला,
तेव्हा त्याने माझे ऐकले.
अधोलोकांच्या उदरातून मी आरोळी केली,
तेव्हा तू माझा शब्द ऐकलास.
२) तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस,
प्रवाहाने मला व्यापले.
तुझ्या सर्व लाटा आणि कल्लोळ माझ्यावरून गेले.
३) मी म्हणालो, तुझ्या दृष्टीसमोरून तू मला दूर केले आहेस.
तुझ्या पवित्र मंदिराकडे मी दृष्टी लावू शकेन का?
४) मी अगदी हताश झालो तेव्हा
मी आपले चित्त पुन्हा देवाकडे लावले
आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात
तुझ्याजवळ पोहोचली.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १०:२५-३७
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १०:२५-३७
“माझा शेजारी कोण ?"
कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, “गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे ? तुझ्या वाचनात काय आले आहे?" त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर." त्याने त्याला म्हटले, "ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे जगशील."
परंतु स्वतःला नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?” येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य येरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला, त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. थोड्या वेळाने एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, पडलेला माणूस होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला, त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवूनउतारशाळेत आणले आणि त्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला ?" तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: सार्वकालिक जीवन म्हणजे काय ? या संदर्भात युवा श्रद्धाग्रंथामध्ये असे लिहिले आहे की, सार्वकालिक जीवन बाप्तिस्म्यापासून सुरू होते आणि मरणापर्यंत जाते, परंतु त्याला शेवट नाही. (प्रश्न क्र. १५६). पुढे असे म्हटले आहे की, परमेश्वर सार्वकालिक आहे कारण तो प्रेम आहे. प्रेम सार्वकालिक आहे. कारण ते दैवी आहे. जर आपण प्रेमात असलो तर आपण देवाच्या अनंतकालीन सहवासात असतो. ह्याचा अर्थ असा आहे की, सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी माझे जीवन ख्रिस्ताच्या जीवनासारखे प्रेममय बनले पाहिजे. आपल्या अंगी असलेले प्रेम इतरांची सेवा करून आपण व्यक्त करू शकतो. प्रत्येक गरजू व्यक्ती हा आपला शेजारी आहे अशी महत्वाची शिकवण आजच्या शुभवर्तमानातून प्रभू येशू आज आपल्याला देत आहे. गोरगरिबांची सेवाकरून परमेश्वराचा सहवास प्राप्त होईल व सार्वकालिक जीवन ही परमेश्वराची अमूल्य भेट आपणास लाभेल. आपले सदाचरण व सेवाभावी प्रवृत्तीद्वारे परमेश्वर नक्कीच आपल्याला सार्वकालिक जीवनाची भेट देईल असा विश्वास ठेवूया. सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी मी सत्कृत्ये करीत आहे का ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझ्या शांतीचा दूत बनवू तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला प्रेरणा व धैर्य दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या