सामान्य  काळातील 

२७वा सप्ताह 

मंगळवार 

५ ऑक्टोबर   २०२१

"मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही."




संत फॉस्टिना कोवाल्स्का

जन्म दि. २५ ऑगस्ट १९०५--- मृत्यू  दि. ५ ऑक्टोबर १९३ 

  ✝️ 

दैवी दयेच्या प्रेषिता व देवाच्या सेविका, संत फॉस्टिना कोवाल्स्का या “द सिस्टर्स ऑफ अवर मर्सी या संघाच्या सिस्टर” होत्या. त्यांचा जन्म दि. २५ ऑगस्ट १९०५ रोजी झाला. दि. ५ ऑक्टोबर १९३८ रोजी त्या ख्रिस्तवासी झाल्या. त्या अत्यंत धार्मिक व भक्तिमान होत्या. प्रत्यक्ष ख्रिस्ताने त्यांना सन १९३१ ते १९३८ या काळापर्यंत वारंवार दर्शन देऊन पापक्षमेसाठी दैवी दयेचे महत्त्व, सामर्थ्य आणि दैवी दयेच्या आवश्यकतेविषयी सांगितले. “पाप्यांना व महापाप्यांना देवाच्या दयेसाठी आग्रहाने याचना करण्यास अजूनही संधी आहे म्हणून त्यांना देवाच्या दयेकडे वळविण्याचे आदेश ख्रिस्ताने सिस्टर फॉस्टिानांना दिले.

सिस्टर फॉस्टिनांना पवित्रतेबद्दल व धर्म कार्याबद्दल 'आदरणीय' म्हणून ७ मार्च १९९२ साली घोषित केले गेले. रोममध्ये पोप जॉन पॉल यांनी १८ एप्रिल १९९३ साली त्यांना 'धन्य म्हणून मान्यता दिली '. सन २००० च्या पास्कासणानंतरच्या रविवारी त्यांना ‘संत' म्हणून घोषित करण्यात आले. ख्रिस्ताने दिलेला आदेश सिस्टर फॉस्टिनांनी आपल्या डायरीत नमूद केलेला आहे. या आदेशाच्या आणि संदेशाच्या त्या जिवंत साक्षीदार झालेल्या आहेत.परमगुरूस्वामींनी दि. १५ एप्रिल १९७८ रोजी दैवी दयेच्या या भक्तिला मान्यता दिली आहे.

येशूने दैवी दयेविषयक दिलेले विशेष संदेश.

१. अत्यंत निष्ठेने माझ्या दयेकडे वळल्याशिवाय मानवजातीला शांती मिळणार नाही.

२. माझ्या दयाळू हृदयापाशी आल्याशिवाय मानव जातीला शांती व समाधान मिळणार नाही.

३. तसेच जो आत्मा माझ्या दयेची याचना करील तो मला अपार आनंद देईल. माझ्याकडे दयेची व सहानुभूतिची याचना करणाऱ्या आत्म्यावर, तो कितीही महापापी असला तरी मी त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक कृपा करीन. त्याला शिक्षा करणार नाही.

येशू म्हणाला, अखिल जगाला माझ्या दयेची जाणीव व्हावी अशी माझी फार इच्छा आहे. माझ्या दयेवर अवलंबून राहणाऱ्यांवर मी अपार दया करतो. मी साक्षात दया व प्रेम आहे. माझी ही दया अक्षय सागर आहे.. कोणत्याही पाप्याने माझ्यापाशी यावयास भिऊ नये. पापी माणसाचा माझ्यावरील अविश्वास माझे हृदय घायाळ करतो.” जे धर्मगुरू माझ्या दयेचा प्रसार करून तिची स्तुती करतील; त्यांचे शब्द, अभिषिक्त करीन व ते सांगतील त्या हृदयांना स्पर्श करीन.

✝️

पहिले वाचन : योना ३:१-१०
वाचक : योनाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन

"निनवेतील लोक आपल्या कुमार्गापासून वळले,

तेव्हा देवाला अनुताप झाला.' परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झाले की, "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी तुला सांगेन तो संदेश त्याला जाहीर कर." तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवे येथे गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते, ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत. योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता घोषणा करीत गेला की, चाळीश दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीला मिळेल! तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपवास घोषित केला आणि श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणपाट नेसले.

निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला आणि आपल्या अंगातला झगा काढून गोणपाट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला आणि सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, “कोणाही माणसाने, पशूने, गुराढोरांनी आणि शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये अगर पाणी पिऊ नये. मनुष्याने आणि पशूने गोणपाट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या अत्याचारापासून मागे फिरावे. कोणी सांगावे? देव कदाचित वळेल आणि त्याला अनुताप होईल आणि तो आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही."देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत ते पाहिले, तेव्हा त्याच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी त्याला अनुताप झाला आणि त्याने त्यांच्यावर अरिष्ट आणले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १३०:१-४,७-८ 

प्रतिसाद : प्रभो, तू आमचा अधर्म लक्षात आणशील तर तुझ्यापुढे कोण वाचेल ?

१) हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे 
प्रभो, माझी वाणी ऐक, माझ्या विनवणीच्या 
शब्दांकडे तुझे कान लागोत.

२) प्रभो, तू आमचा अधर्म लक्षात आणशील,
तर प्रभो, तुझ्यापुढे कोण वाचेल ?
तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.

३) कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे,
त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे, 
तो इस्राएलला त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 तुझे नियम मला समजावून दे,
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक    १०:३८-४२

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १०:३८-४२

“मार्थाने येशूचे आपल्या घरी स्वागत केले, मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे."

येशू एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन त्यांना म्हणाली, "प्रभो, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा." प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: मार्था, मरिया आणि त्यांचा भाऊ लाजरस त्यांच्यावर येशूचे निस्सीम असे प्रेम होते. हे आजच्या शुभवर्तमानातून आपणास शिकायला मिळते. लाजरस जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याच्या कबरेबाहेर उभा राहून प्रभूयेशू अश्रू गाळून आपल्या मरण पावलेल्या मित्रासाठी दुःख व्यक्त करतो. यावरून येशूची या कुटुंबाबरोबर जवळीकता होती, असे दिसून येते. यहूद्यांच्या चालीरितीप्रमाणे आपल्या गुरूच्या पायापाशी बसून त्याची शिकवण ऐकणे हे फक्त एका पुरुषाचे कार्य होते. घरातील स्त्रिया फक्त स्वयंपाक घरात भोजन बनविण्याचे कार्य करीत असत. म्हणून मरिया प्रभूच्या पायाशी बसून त्याचे शब्द ऐकून एका पुरुषाप्रमाणे वागत होती आणि एक स्त्री म्हणून भोजन बनविण्याची जबाबदारी फक्त मार्थावर राहीली होती हे पाहून मार्था अस्वस्थ होते आणि ती येशूकडे तक्रार करीत आहे. परंतु येशू मार्थाची निंदा करीत नाही तर तिचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करतो. येशू तिला समजावून सांगत आहे की, घरच्या कामाची चिंता न करता तिने त्याच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रभूच्या शब्दावर मनन-चिंतन करून आपल्याला कृपाशक्ती प्राप्त होत असते व जीवनाच्या सर्व विचलनापासून आपण मुक्त होऊ शकतो. बायबलचे नियमित वाचन करून मी परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेतो का ?

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझी वाणी ऐकण्यास व तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमच्या कुटुंबात तु ये आणि वस्ती कर, आमेन.
✝️