Marathi Bible Reading | Wednesday 6th October 2021 | 27th Week in ordinary Time |

       सामान्य  काळातील 

२७वा सप्ताह 

बुधवार 

६ ऑक्टोबर   २०२१

हे पित्या, तुझे राज्य येवो.”



संत ब्रुनो
-मठाधिकारी, वर्तनसाक्षी (१०३५-११०१)

देवासाठी आपण जे युद्ध लढतो त्या युद्धातही जी मनःशांती असते, ती जगात कुठेही मिळत नाही.-संत ब्रुनो 

 ✝️ 

योना संदेष्ट्याने देवाची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सतत देवाची प्रार्थना केली. निनवे शहराचा नाश होऊ नये म्हणून निनवेकरांसाठी तो मध्यस्थ बनला. परमेश्वराची कृपा अनुभवित असताना त्याला धन्यवाद देत योनाने म्हटले, 'हे परमेश्वरा, तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दया संपन्न देव आहे'.पापांबद्धल पश्चाताप आणि मध्यस्थीची प्रार्थना ह्यामुळे निनवेत देवाचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले, ह्याचा वृतांत पहिल्या वाचनात आहे.

 प्रभू येशूने आपल्या शिष्यांना शिकविलेली प्रार्थना म्हणजे, धन्यवाद, पश्चाताप, मध्यस्थी व विनंती ह्यांचा मिलाप असलेली महान प्रार्थना आहे. प्रभूच्या ह्या प्रार्थनेतील प्रत्येक बाक्यावर चिंतन करता येते. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रार्थनेला आपण किती प्राधान्य देतो? सहसा माणसे प्रार्थना टाळण्यासाठी तीन सबबी पूढे करीत असतात. पहिली सबब 'मला वेळ नाही'. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्यांचे आभार मानण्यासाठी थोडा वेळ काढणे गरजेचे आहे. दुसरी सबब, 'देवाला सर्व ठावूक आहे, मला प्रार्थनेची गरज नाही'. देवाला जरी आपल्या गरजा ठावूक असल्या तरी त्याकडे दररोज प्रार्थना, विनंती करणे गरजेचे आहे. तिसरी सबब असते, 'मी माझे सर्व प्रश्न सोडविण्यास समर्थ आहे'. आपले प्रश्न व समस्या देवाच्या हातात सोपविल्यावर त्या सहज सुटू शकतात. आपले संपूर्ण जीवन देवाच्या दयेवर आणि कृपेवर अवलंबून असते. प्रभू येशू स्वत: देवपुत्र होता तरी त्याने सर्वदा आपल्या पित्याकडे विनवणी व आळवणी केली.

आपल्या जीवनात, कुटुंबात व समाजात देवाचे राज्य यावे, व आपण नेहमी देवाचे अस्तित्व अनुभवावे म्हणून प्रभूची प्रार्थना चिंतन पूर्वक करु या.

✝️

पहिले वाचन : योना ४:१-११
वाचक : योनाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन

“एरंडाच्या झाडामुळे तू रागावला आहेस. मी निनवे ह्या मोठ्या शहराची पर्वा करू नये का ?"

योनाला फार वाईट वाटले आणि त्याला राग आला. तो परमेश्वराला विनंती करू लागला. “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शिश येथे पळून जाण्याची घाई केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, दयाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप वाटून घेणारा असा देव आहेस. तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरणे बरे वाटते." तेव्हा परमेश्वर म्हणाला, "तुला राग येणे हे योग्य आहे का ?" मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला, येथे त्याने एक मंडप घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला.
परमेश्वर देवाने एरंडाचा एक वेल उगविला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी आणि त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे केले. या एरंडाच्या वेलीमुळे योनाला फार आनंद झाला. पण दुसरा दिवस उजाडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला, तो त्या एरंडाच्या वेलीला लागला तेव्हा ती सुकून गेली. मग सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहविला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले, त्याने तो मूर्च्छित झाला आणि आपल्याला मृत्यू येवो अशी विनवणी करून तो म्हणाला : मला जगण्यापेक्षा मरण बरे वाटते. तेव्हा देव योनाला म्हणाला, “एरंडाच्या वेलीमुळे तू रागवावेस हे बरे का ?" त्यावर म्हणाला, “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले." परमेश्वर म्हणाला, “या एरंडाच्या वेलीमुळे तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस, ही एका रात्रीत वर आली आणि एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस. तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे आणि पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्याची मी पर्वा करू नये का?"
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८६:३-६,९-१० 

प्रतिसाद :प्रभो, तू दयावंत आणि कृपाळू देव आहेस.

१) हे प्रभो, माझ्यावर कृपा कर, 
कारण मी दिवसभर तुझा धावा करतो. 
हे प्रभो, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर, 
मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो.

२) हे प्रभो, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस, 
आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर 
तू विपुलदया करणारा आहेस.
हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, 
माझ्या विनवणीच्या वाणीकडे लक्ष दे.

३) प्रभो, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्र येऊन 
तुझ्या पाया पडतील, तुझ्या नामाचा महिमा गातील, 
कारण तू थोर आणि अद्भुत कृत्ये करणारा आहेस, 
केवळ देव आहेस. तूच



जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
  हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक  ११:१-४ 

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"प्रभो, आम्हांला प्रार्थना करायला शिकवा."

येशू एका ठिकाणी प्रार्थना करत होता, ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, "प्रभो, जसे योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा." तो त्यांना म्हणाला, "तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा:
 'हे पित्या,
तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. 
आमची रोजची भाकर रोज आम्हांला दे 
आणि आम्हांला आमच्या पापांची क्षमा कर, 
कारण आम्हीही आपल्या प्रत्येक अपराध्याला क्षमा करतो
 आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस."

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आमच्या स्वर्गीय बापा या प्रार्थनेत प्रभूयेशूने वापरलेला शब्द म्हणजे 'आब्बा किंवा पिता' असा आहे. ह्या शब्दाद्वारे प्रभूयेशूचे आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर असलेले अतूट प्रेमाचे नाते दर्शविते. 'आमच्या स्वर्गीय बापा' ह्या प्रार्थनेमध्ये दोन भाग आहेत, पहिल्या भागात परमेश्वराची स्तुती व गौरव केली जात आहे व दुसऱ्या भागात आपल्या जीवनातील दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या अब्बा पित्याला अर्पणकरण्यात येत आहेत. ह्या प्रार्थनेद्वारे प्रभूयेशू आपल्याला शिकवत आहे की, परमेश्वराची भक्ती व आराधना केल्यास तो आपल्या ज्याकाही भौतिक व आध्यात्मिक गरजा आहेत त्या पूर्ण करतो. तसेच तो आपल्याला पापांपासून व वाईटापासून आपले संरक्षण करतो. येशूच्या ह्या प्रार्थनेद्वारे आपण असा विश्वास ठेवू शकतो की जी व्यक्ती खऱ्या अंतकरणाने परमेश्वराची स्तुती व भक्ती करते, परमेश्वर अशा विश्वासू लोकांची प्रार्थना ऐकतो व त्यांचे सर्व वाईटांपासून रक्षण करतो. प्रभूयेशू आपल्या शिष्यांना सांगत आहे की, परमेश्वर पिता हा औंदार्याचे प्रतिक आहे. कारण तो प्रेमळ पिता आहे व आपल्या सर्व गरजा तो पूर्ण करतो. माझ्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये मी परमेश्वराची स्तुती व प्रशंसा करतो का ?

प्रार्थना :-हे स्वर्गीय पित्या, तुजवर सर्वस्वी अवलंबून राहण्यास व तुजबरोबर संवाद साधण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा आम्हाला दे, आमेन.
✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या