सामान्य काळातील
२७वा सप्ताह
गुरुवार
७ ऑक्टोबर २०२१
“हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.”
जपमाळेची पवित्र मरिया
✝️
संत अल्फान्सोस लिगरी ह्यांनी पवित्र जपमाळेचे महत्त्व पुढील शब्दांत व्यक्त केले आहे. “पवित्र जपमाळेच्या भक्तीने संपूर्ण जगात खूप विलक्षण बदल घडवून आणलेला आहे. अनेक आत्मे पापांपासून मुक्त झालेले आहेत, काहींनी पवित्र जीवनाला वाहून घेतले तर पुष्कळांना चांगले शांतीने मरण आले.” पवित्र जपमाळेची प्रार्थना खूप भक्तीभावाने म्हटली गेली पाहिजे. संत युलालिया हिला आपल्या देवमातेने एकदा सांगितले की, घाईघाईने १५ रहस्ये म्हणण्यापेक्षा ५ रहस्ये अगदी सावकाश आणि भक्तीभावाने प्रार्थिल्याने मला आनंद होईल.
१३ मे व १३ जून १९१७ साली फातिमा येथे मुलांना दिलेल्या (फ्रान्सिस्को, जसिंटा व लुसी) दर्शनाच्या वेळी पवित्र मरिया त्यांना म्हणाली, “पवित्र जपमाळेची प्रार्थना भक्तीभावाने म्हणा आणि संपूर्ण जगासाठी शांतीचे वरदान मागा. प्रत्येक रहस्यानंतर म्हणा, हे माझ्या येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे संरक्षण कर. सर्व लोकांना स्वर्गाकडे ने, विशेषकरून ज्यांना तुझ्या दयेची अधिक जरूरी आहे.”
पवित्र जपमाळेच्या प्रार्थनेचा सण इ. स. १५७१ पासून पोप पायस ५ वे ह्यांनी साजरा करण्यास सुरुवात केली. लिपान्टो येथील युद्धात तुर्कावर मिळविलेल्या विजयानिमित्ते देवाचे व पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी त्यांनी हा सण साजरा केला.
पवित्र मरियेने रोझरी प्रार्थनेची भक्ती प्रथम संत डॉमणिक ह्यांना प्रकट केली असे किमान १३ वेगवेगळ्या पोपमहाशयांनी आपापल्या परिपत्रकामधून स्पष्ट केले आहे. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांचे शिक्षक एक डॉमणिकन धर्मगुरू होते. त्यांचे नाव रेजिनाल्ड गारिरो लारांगे. तारणाऱ्याची माता ह्या पुस्तकात त्यांनी म्हटले आहे: “संध्याकाळ झाली की संत डॉमणिक खेडेगावात जात, लोकांना श्रद्धेचे एक एक रहस्य शिकवीत. प्रत्येक रहस्यानंतर 'आमच्या स्वर्गीय बापा आणि नमो कृपापूर्ण मरिये' ह्या प्रार्थना म्हणत." अशा प्रकारे श्रद्धा, भक्ती आणि धर्मशिक्षण ह्यांची सुंदर गुंफण त्यांनी घातलेली होती.
पोप पॉल सहावे म्हणत, रोझरीच्या प्रत्येक रहस्यावर थोडावेळ चिंतन करावे. असे चिंतन न केलेली प्रार्थना पोपटपंची आणि यांत्रिक बनेल. चिंतनमननाविना रोझरी म्हणजे आत्म्याविना शरीर होय!
पोप पायस पाचवे ह्यांनी सुरू केलेला सण १७१६ पर्यंत संपूर्ण जागतिक ख्रिस्तसभेत पसरला. कारण ह्याच प्रार्थनेच्या बळावर युजीन या राजपुत्राने तुर्कांवर हंगेरी येथे आणखी एक विजय संपादन केला होता. पोप लिओ तेरावे ह्यांनी ऑक्टोबर हा महिना रोझरीचा महिना म्हणून जाहीर केला.
पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी आपल्या परमगुरुपदाच्या रौप्यमहोत्सवानिमित्ते१६ ऑक्टोबर २००२ रोजी रोझरीच्या प्रार्थनेमध्ये प्रकाशाची पाच रहस्ये समाविष्ट केली आणि ऑक्टोबर २००२ ते ऑक्टोबर २००३ हे रोझरी वर्ष म्हणून जाहीर केले. ते स्वत: नित्यनेमाने रोझरीची प्रार्थना करीतात.
चिंतन : दररोज जी व्यक्ती भक्तीभावाने जपमाळेची प्रार्थना करते ती देवापासून दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी आनंदाने माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहून देईन! -संत लुईस मोंटफॉर्ड
✝️
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये १:१२-१४
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ते सर्वजण येशूची आई मरिया हिच्यासह प्रार्थना करण्यात तत्पर असत."
येशूला स्वर्गात घेतल्यानंतर प्रेषित येरुशलेमजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून येरुशलेमला परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रेया, फिलीप, थॉमस, बार्थोलोम्यू, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत आणि याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते. हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एकचित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र लूक :१: ४६-५५
प्रतिसाद :जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरितां महत्कृत्यें केली आहेत; आणि 'त्याचें नांव पवित्र आहे,
१)'माझा जीव प्रभूला' थोर मानितो,
आणि 'देव जो माझा तारणारा' त्याच्या मुळे
माझा आत्मा 'उल्हासला आहे; '
२)कारण 'त्यानें' आपल्या 'दासीच्या
दैन्यावस्थेचें अवलोकन केले आहे.'
पाहा, आतांपासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;
कारण जो समर्थ आहे, त्याने माझ्याकरितां
महत्कृत्यें केली आहेत;
आणि 'त्याचें नांव पवित्र आहे,
३) आणि जे 'त्याचें भय धरितात,
त्यांच्यावरत्याची दया पिढ्यान्पिढया आहे.'
त्याने आपल्या 'बाहूनें' पराक्रम केला आहे;
जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेनें
'गविष्ठ आहेत त्यांची त्यानें दाणादाण केली आहे.'
४) 'त्यानें अधिपतींस' राजासनांवरून
'ओढून काढिले आहे' व 'दीनांस उंच केले आहे.',
'त्यानें भुकेलेल्यांस उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे,'
व 'धनवानांस रिकामें लावून दिले आहे.'
५) 'आपल्या पूर्वजांस' त्याने सांगितलें '
त्याप्रमाणे अब्राहाम' व त्याचें
'संतान ह्यांच्यावरील दया' सर्वकाळ स्मरून ,
त्यानें आपला सेवक इस्राएल
ह्याला साहाय्य केले आहे.'
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठायी आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
शुभवर्तमान लूक १:२६-३८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल."
देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठवले. ती दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.” ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.'
मरियेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल ? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.
पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरिया म्हणाली, "पाहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: रोझरी मातेच्या सणाची स्थापना पोप संत पायस पाचवे ह्यांनी १५७३मध्ये केली. लेपांनटो येथे ख्रिस्ती आणि तुर्की सैन्यामध्ये झालेल्या युद्धात ख्रिस्तीयांचा मोठा विजय झाला होता. हा विजय मरियेची रोझरीची प्रार्थना केल्यामुळे व माता मरियेच्या मध्यस्थीमुळे झाला आहे असा विश्वास ख्रिस्तीयांचा होता. ख्रिस्तीयांचा युद्धातील विजय हा रोझरीची माता मरिया हिच्या कृपेमुळे झाला आहे आणि तिचे आभार मानण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो. रोझरीच्या प्रार्थनेचा एक मोठा इतिहास आहे. सुरूवातीला १५० स्तोत्रांचे अनुकरण करून १५० वेळा आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना म्हटली जात असे. त्याचबरोबर १५० नमो कृपा पूर्ण मरिया ही प्रार्थना करण्याची ही प्रथा सुरू झाली. सोळाव्या शतकात रोझरीचे जे वर्तमान स्वरूप आहे ते विकसित करण्यात आले. विशेष म्हणजे १५ रहस्ये पाच आनंदाची, पाचदुःखाची व पाच गौरवाची रहस्यांचा रोझरीत समावेश करण्यात आला. सन २००२ मध्ये संत पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी ह्या रोझरीत प्रकाशाची पाच आणखी रहस्ये जोडली. रोझरीच्या प्रार्थनेद्वारे आपण येशूच्या संपूर्ण जीवनावर मनन चिंतन करतो. अशाप्रकारे माता मरियेची भक्ती करून आपण येशूच्या सानिध्यात येत असतो. आपण नियमित रोझरीची प्रार्थना करतो का ?
प्रार्थना :-हे पवित्र आणि निष्कलंक मरिया माते, आम्हासाठी प्रभू पाशी विनंती कर, आमेन.
✝️
0 टिप्पण्या