सामान्य काळातील
२७वा सप्ताह
शुक्रवार
८ ऑक्टोबर २०२१
जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे."

संत सर्जिअस आणि बाक्खस
- रक्तसाक्षी (इ. स. ३०३)
✝️
तारणाच्या इतिहासात आपण पाहतो की बहकलेले व वानमार्गाला लागलेल्यांचा नाश होऊ नये म्हणून देवाने अनेक संदेष्ट्यांद्वारे पश्चातापाचा संदेश दिला. सर्वनाशाचा दिवस जवळ आल्याचा संदेश देऊन योएल संदेष्टा त्यांना देवाच्या मंदिरात सर्मपणे सादर करण्याचे आवाहन करीत आहे.
प्रभू येशू ख्रिस्त देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी आला होता. त्याच्या दैवी सामर्थ्याचे व चमत्कारांचे मर्म न जाणल्यामुळे लोकांनी त्याच्यावर आरोप लावून चिन्हांची मागणी केली. देवाचे कार्य आणि सैतानाचे कार्य विरोधात्मक आहे. प्रभू येशू देवपुत्र होता. आणि त्याच्या विरोधात चिन्ह मागणाऱ्यांना प्रभू स्पष्ट करीत आहे की, 'जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे'. प्रभू येशूचे कार्य शांती, समेट, दया व प्रेम वृद्धिगंत करणारे आहे, मात्र सैतानाच्या कार्यात नेहमी अशांतता, वाद, फुटिरता आणि वाद निर्माण होत असतात.
आपण प्रभू येशूवरील आपला विश्वास आज पडताळून पाहू या. त्याच्या दैवी सामर्थ्याविषयी कोणतीच शंका न बाळगता त्याला अनुकूल असे जीवन जगण्यासाठी कृपा मागू या. विशेषतः पश्चातापी अंतःकरणाने शरण जाऊन प्रभूला आपले सर्वस्व समर्पित करु या.
✝️
पहिले वाचन :योएल १:१३-१५;२:१-२
वाचक : योएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे."
याजकहो, गोणपाट घालून शोक करा. सेवा करणाऱ्यांनो, विलाप करा. माझ्या देवाचे सेवकांनो, या गोणपाटावर पडून रात्र घालवा. कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण आणिपेयार्पण येण्याचे बंद झाले आहे. उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा. तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलांना आणि देशात राहणाऱ्या सर्वांना जमवा. आणि परमेश्वराला आरोळी मारा.
त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशसमय असा तो येत आहे.
सियोनेत कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबती वाजवा. देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण परमेश्वराचा दिवस येत आहे. तो येऊन ठेपला आहे.
अंधाराचा आणि औदासिन्याचा दिवस! मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. केवढे विशाल व बलवान सैन्य हे! रात्रीने झाकावे तसे या सैन्याने पर्वत झाकून टाकले आहेत! हे लोक केवढे महान! केवढे समर्थ आहेत!
त्यांच्यासारखे लोक पूर्वी कधी कोणी पाहिले नव्हते आणि जगाच्या पुढील सर्व पिढ्यामध्ये असे लोक पुन्हा कधीही पाहायला मिळणार नाहीत!
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९: २-३,६,१६,८-९
प्रतिसाद : परमेश्वर जगाचा यथार्थ न्याय करील.
१) मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन,
तुझ्या सर्व अद्भुत कृतीचे वर्णन करीन.
मला तुझ्या ठायी हर्ष आणि उल्हास होईल,
हे परात्परा, मी तुझ्या नामाचे स्तवन गाईन.
२) तू राष्ट्रांना धमकाविले आहेस,
दुर्जनांचा तू नाश केला आहेस,
तू त्यांचे नाव सदासर्वकाळासाठी पुसून टाकले आहेस.
राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत,
त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत.
३) परमेश्वर तर सर्वकाळ राजासनारूढ आहे.
त्याने न्याय करण्याकरिता आपले आसन स्थापले आहे.
तोच जगाचा यथार्थ न्याय करील,
तो लोकांना खरा न्याय देईल.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे. म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
शुभवर्तमान लूक ११:१५-२६
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे. "
काहीजण म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या सहाय्याने हा भुते काढतो आणि दुसरे काहीजण त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागू लागले." परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले कोणतेही राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते. सैतानांतही फूट पडली तर त्यांचे राज्य कसे टिकेल ? कारण मी बालजबूलच्या सहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या सहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय्य करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भुते काढत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे. सशस्त्र आणि बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते, परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो आणि त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळतो.
मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो निर्जल स्थळांमधून विश्रांतीचा शोध करत हिंडतो आणि ती न मिळाली म्हणजे म्हणतो, ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन आणि तो आल्यावर ते झाडलेले आणि सुशोभित केलेले त्याला आढळते. नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे सात आत्मे बरोबर घेतो आणि ते आत घुसून तेथे राहतात, मग त्या मनुष्याची ती शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: प्रभू येशू एका बहिऱ्या व्यक्तीला बरे करतो व त्याला सैतानाच्या बंधनातून मुक्त करतो. येशूने एक सत्कृत्य केलेले आहे आणि एका व्यक्तीला नवीन जीवन प्रदान केले आहे.तरीसुद्धा लोकसमुदायातील काही यहूदी येशूला दोषी ठरवितात. येशूच्या अवतीभौवती असलेल्या अनेक लोकांनी येशूमध्ये भूतांपासून मुक्ती देण्याचे सामर्थ्य आहे हे स्वीकारलेले होते. परंतु काहींच्या मनात असा प्रश्न आहे, कुणाच्या सामर्थ्याने येशू हा लोकांना भुते व अशुद्ध आत्म्यांपासून मुक्त करतो. त्यांना असे वाटते की, येशू भुतांचा अधिपती की जो बालजबूल आहे त्याच्या सहाय्याने भूते काढतो. येशूने लोकासमक्ष एका मुक्या बहिऱ्या व्यक्तीला अशुद्ध आत्म्यापासून मुक्त करताना पाहिलेले आहे तरीसुद्धा लोक समुदायातील काही अविश्वासी लोक येशूकडे आणखीन एक चिन्ह दाखवण्याचे हट्ट धरतात. आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभूयेशू आपल्याला हाच संदेश देत आहे की, त्याच्या सत्कृत्याद्वारे परमेश्वराच्या राज्यांची सुरूवात झालेली आहे आणि तो खरा देवपुत्र आहे व त्याचे सर्व वाईट, पाप व सैतानाला शह देण्याचे सामर्थ्य आहे. तो खरोखरच जगाचा तारणारा आहे. प्रभूयेशू माझ्या जीवनाचा तारणारा आहे का ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझ्या सामर्थ्यावरील आमचा विश्वास बळकट कर, तुला अनुकरण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या