Marathi Bible Reading | Saturday 9th October 2021 | 27th Week in ordinary Time |

          सामान्य  काळातील 

२७वा सप्ताह 

शनिवार 

९ ऑक्टोबर   २०२१

"जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य  


संत जॉन लिओनार्ड

-रक्तसाक्षी (१५४१-१६०९)

 ✝️ 

इटलीतील तुस्कानी शहरात जन्मलेला जॉन अगदी बालपणापासून चिंतनशील आणि प्रार्थनामय जीवन जगत होता. त्यासाठी त्याला एकांतवासाची आवड होती. लुक्का ह्या ठिकाणी एका औषधाच्या दुकानात शिकाऊ कामगार म्हणून काम करीत असतानाच त्याने धर्मगुरुपदाचा अभ्यास पूर्ण केला. गुरुदीक्षेआधीच त्याने मानवी आत्म्याचे तारण व्हावे म्हणून बरेच परिश्रम घेतले. वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना गुरुदीक्षा देण्यात आली.गुरुदीक्षेनंतर फा. जॉन ह्याने मोठ्या जोमाने व उत्साहाने आपले कार्य सुरू केले. इस्पितळे, तुरुंग, आणि जिथे जिथे शक्य झाले तिथे तिथे तो देवाची सुवार्ता सांगत फिरत असे. धर्मशिक्षण देणे, लोकांना प्रायश्चित्त संस्कार देणे, ह्या सर्व गोष्टी तो मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीभावाने करीत असे. मदर ऑफ गॉड धर्मगुरूंच्या संस्थेचा तो संस्थापक मानला जातो.

सुरुवातीला ही संस्था फक्त निवडक प्रापंचिकांची होती. संत जॉनच्या पावित्र्याकडे हे लोक आकर्षिले गेले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली राहणे, त्याला हवे ते सहाय्य देणे आणि विशेषत: पाप्यांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी कार्य करणे ही कामे हे लोक करत होते. त्याचे समकालीन संत फिलीप नेरी, आणि संत जोसेफ कालासान्झ ह्या तिघांची मैत्री अतूट होती.

मिशनकार्य करणाऱ्या धर्मगुरूंच्या (तत्त्वज्ञान व ईशज्ञान) प्रशिक्षणासाठी रोममध्ये रोमन कॉलेज ऑफ प्रोपोगान्डा फिडे (श्रद्धा प्रसार) नावाची मोठी संस्था आहे, ह्या संस्थेच्या स्थापनेमध्ये संत जॉनचा सिंहाचा वाटा आहे, संत जॉनचे कार्य इतके महान होते की पोप लिओ तेरावे ह्यांनी त्याचे नाव रोमनरक्तसाक्ष्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश दिले आणि त्याच्या सन्मानार्थ मिस्साबली अर्पण करण्याची आणि दैनंदिन प्रार्थना म्हणण्याची आज्ञा आपल्या धर्मगुरूंना दिली. अशा प्रकारचा सन्मान फक्त संतपदाला पोहोचलेल्या पोपमहाशयांसाठीच राखून ठेवण्यात आलेला आहे.

योएल संदेष्टा देवाचे वचन सांगताना म्हणत आहे की, 'देव कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध व दयासागर आहे.' परमेश्वराचे वचन ऐकून तो पाळणाऱ्या सर्वांवर तो अपार कृपा व दया करीत असतो. 

ख्रिस्ती श्रध्देचा पाया परमेश्वराच्या वचनांवर उभारलेला आहे. आपले अस्तित्व, आपले जीवन आणि आपल्या जीवनातील सर्व घडामोडींवर परमेश्वराचे अधिराज्य आहे. परमेश्वराच्या इच्छेवाचून कोणतीच घटना आपल्या जीवनात घडत नाही. म्हणूनच परमेश्वराचा शब्द, त्याचे वचन आपल्या जीवनात  अग्रस्थानी असायला हवे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सार्वकालिक जीवन देणारी वचने दिली आहेत. पवित्र बायबलमध्ये जीवनाच्या वचनांचा अमुल्य  साठा आहे. पवित्र मिस्साबलिदान प्रसंगी प्रभू शब्द विधीच्यावेळी ह्या वचनांची मेजवानी आपल्याला मिळत असते. आपण वचने ऐकतो पण किती प्रमाणात ग्रहण करून त्याप्रमाणे आचरण करतो ह्यावर आज चिंतन करु या.

✝️

पहिले वाचन :योएल  ३:१२-२१
वाचक : योएल या पुस्तकातून घेतलेले वाचन 

 "विळा चालवा, पीक तयार आहे."

परमेश्वर म्हणतो: राष्ट्र उठावणी करून यहोशाफाटच्या खोऱ्यात येवोत, तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे. विळा चालवा, पीक तयार आहे. या, चला, उतरा, द्राक्षाचा घाणा भरला आहे. कुंडे भरून वाहत आहेत, कारण लोकांचा दुष्टपणा फार आहे. लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोऱ्यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोऱ्यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे.सूर्य आणि चंद्र काळे पडले आहेत, तारे निस्तेज झाले आहेत. परमेश्वर सियोनातून गर्जना करतो, येरुशलेममधून आपला शब्द ऐकवतो, आकाश आणि पृथ्वी थरथर कापत आहेत. तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे. सियोनवर, माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हांस कळेल. तेव्हा येरुशलेम पवित्र स्थळ होईल, यापुढे परके त्यातून येणार जाणार नाहीत. त्या काळी असे होईल की पर्वतावरून नवा द्राक्षरस पाझरेल, टेकड्यावरून दूध स्त्रवेल. आणि यहुदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील, परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल तो शिल्टिमच्या खोऱ्याला पाणी पुरवील.
इजिप्त देश उजाड होईल आणि अदोम वैराण होईल, कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त पाडून यहुदाच्या वंशजांवर अत्याचार केला. यहुदा तर सर्वकाळ लोकांचे वसतिस्थान होईल आणि येरुशलेम पिढ्यान्पिढ्या समृद्ध राहील. त्याच्या रक्ताचा मी सूड घेईन, अपराध्यांना मी दोषमुक्त ठरवणार नाही, कारण परमेश्वर सियोनेत निवास करतो.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९७: १-२,५-६,११-१२

प्रतिसाद : अहो नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा.

१) परमेश्वर राज्य करतो, पृथ्वी उल्हास करो, 
द्वीपसमूह हर्ष करो.ढग आणि अंधार त्याच्यासभोवती आहेत, 
नीती आणि न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत.

२) परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या 
प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले. 
आकाशाने त्याची नीती प्रकट केली, 
सर्व लोकांनी त्याचे गौरव पाहिले.

३) नीतिमानांसाठी प्रकाश आणि जे सरळ अंत:करणाचे आहेत 
त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे. 
अहो नीतिमान जनहो, परमेश्वराच्या ठायी हर्ष करा,
 त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञतापूर्वक स्तवन करा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक  ११:२७-२८

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 "ज्या उदराने तुझा भार वाहिला ते धन्य. पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात ते अधिक धन्य होत. " 

येशू ह्या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणीएक स्त्री त्याला मोठ्या आवाजात म्हणाली, “ज्या उदराने तुझा भार वाहिला आणि ज्या स्तनातून तू स्तनपान केलेस ती धन्य." परंतु तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य होत.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: येशूचे चांगले कार्य पाहून लोक समुदायातील एक स्त्री त्याला आशीर्वाद देत आहे. त्या आशीर्वादाद्वारे ती स्त्री येशूला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, तो धन्य आहे व तो त्याच्या आईसाठी एक अमुल्य भेट आहे. परंतु येशूचे उत्तर ऐकून आपल्याला प्रश्न पडला असेल की, येशू आपली आई मरिया हिचा अनादर करीत आहे का ? परंतु बारकाईने आपण येशूच्या शब्दावर मनन-चिंतन केले तर असे दिसून येईल की, प्रभू येशू आपल्या आईचा गुणगौरव गात आहे. प्रभूयेशू फक्त त्या स्त्रीलाच नव्हे तर संपूर्ण उपस्थित असलेल्या लोक समुदायाला उद्देशून आपल्या आईचे उदाहरण देत आहे. येशू आपल्याला आज हेच शिकवत आहे की, जी व्यक्ती देवाचे शब्द ऐकते, व आत्मसात करते व त्याप्रमाणे जीवन जगते ती व्यक्ती खरे कृपापात्र आहे. म्हणून माता मरियेचे आपण अनुकरण केले पाहिजे कारण तीने आपल्या जीवनात परमेश्वराचे शब्द आत्मसात केले व विश्वासाचे जीवन जगून परमेश्वराला समर्पित केले. प्रभू येशू सर्वांना त्याच्या आईचे उदाहरण देऊन तिच्यासारखे श्रद्धेचे व समर्पित जीवन जगण्यासाठी आवाहनकरीत आहे. कौटुंबिक नात्यांपेक्षा श्रद्धेचे जीवन जगणे हे अधिक श्रेष्ठ आहे असे येशू सांगत आहे. मी खरोखरच माता मरियेसारखे विश्वासाचे व समर्पित जीवन जगत आहे का ?

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझी वचने जीवनदायी आहेत. तुझ्या वचनांचे वाचन मनन, चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन. 
✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या