सामान्य काळातील
२८वा रविवार
१०ऑक्टोबर २०२१
"येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत."
✝️
देवाच्या सहवासात सर्वकाळचा आनंद, शांती आणि प्रीति वसते. सार्वकालिक जीवन म्हणजे तेथे यातना, दुःख, मरण नाही तर अमरत्वाचे जीवनआहे. देवाच्या शाश्वत आनंदापुढे सर्व काही नगण्य आहे, म्हणूनच शलमोन राजाने देवाकडे विवेक शक्ती आणि देवाचे ज्ञान मागितले. दैवी ज्ञान हे पृथ्वीवरील सर्व धनदौलत, आनंद, सौंदर्य व प्रकाशापेक्षा महान आहे, कारण देवाठायी सर्व गोष्टी शक्य आहेत.
अत्यंत श्रीमंत माणूस देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करीत होता, मात्र जागतिक आणि नाशवंत अशा वैभवाचा त्याग करायला तो तयार नव्हता. ह्या प्रसंगी प्रभू येशूने आपल्या शिष्यांना जागतिक वैभव सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी अडथळा बनू शकते. ह्याची जाणीव करून दिली. जागतिक वैभव केवळ पैसा व धनसंपत्तीच नव्हे, आपले आई वडील, नातलग, मुले, आपले घर-दार, आपली बुध्दीमत्ता, शहाणपण, अधिकार, मान सन्मान अशा सर्व गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या असतात. प्रभूला अनुसरणे कठीण आहे मात्र अशक्य नाही, हे प्रभू आपल्याला सांगत आहे.
प्रभूचे वचन आपल्याला शाश्वती देत आहे की त्याग करणाऱ्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.
✝️
पहिले वाचन : ज्ञानग्रंथ ७:७-११
वाचक : ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्ञानाशी तुलना करता मी संपत्तीला कवडीमोल समजतो."
मी प्रार्थना केली आणि मला समजशक्ती देण्यात आली. मी देवाचा धावा केला आणि मला विवेकशक्ती लाभली. राजदंडापेक्षा आणि सिंहासनापेक्षा मी ज्ञानाची अधिक इच्छा धरली. त्याच्या तुलनेत मी संपत्तीला कवडीमोल समजतो. अमूल्य रत्न ज्ञानापेक्षा मला प्रिय नव्हते. कारण ज्ञानासमोरसारे सोने अगदी वाळूसारखे असते आणि चांदी केवळ चिखलासारखी वाटते. आरोग्यापेक्षा आणि सौदर्यापेक्षा ज्ञान मला अधिक प्रिय आहे. प्रकाशापेक्षा ते मला अधिक हवे होते. कारण त्याचे तेज कधीच मंदावत नाही. त्याच्या सहवासात मला साऱ्याच चांगल्या वस्तू लाभल्या. त्याच्या ठायी अपार संपत्ती होती.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९०: १२-१७
प्रतिसाद : तू आपल्या दयेने आम्हांला तृप्त कर.
१) आमचे आयुष्य मोजके दिवस आहे
हे आम्हांला शिकव म्हणजे आम्ही सुज्ञ होऊ..
हे परमेश्वरा, मागे फिर, किती वेळ लावशील ?
तू आपल्या सेवकांवर करुणा कर.
२) तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर,
म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन
आमचे सर्व दिवस आनंदात घालवू
जेवढे दिवस तू आम्हांला पीडले,
जेवढी वर्षे आम्ही अरिष्ट पाहिले
त्या मानाने आम्हांला आनंदित कर.
३) तुझी कृती तुझ्या सेवकांना,
तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे.
परमेश्वर जो आमचा देव त्याचा
कृपाप्रसाद आमच्यावर होवो.
आमच्या हातचे काम सिद्धीस ने.
दुसरे वाचन इब्री ४:१२-१३
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाचे वचन मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे."
देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव आणि आत्मा, सांधे आणि मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे आणि प्रकट केलेले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभु म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
शुभवर्तमान मार्क १०:१७-३०
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जा, तुझे असेल नसेल ते विक आणि माझ्यामागे ये."
* (येशू निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यासाठी मी काय केले पाहिजे?” येशू त्याला म्हणाला, "मला उत्तम का म्हणतोस ? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेत : खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप आणि आपली आई ह्यांचा मान राख." त्याने त्याला उत्तर दिले, "गुरुजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे." येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये." परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले आणि कष्टी होऊन तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता.तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंताचा प्रवेश होणे कठीण आहे बघा ?” तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. येशू त्यांना पुन्हा म्हणाला, "मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे! धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे." तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन त्याला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे ?" येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, "मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु देवाला नाही, देवाला सर्व काही शक्य आहे.") पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहो." येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता आणि सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेतीवाडी आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: चिरकाळ किंवा कायम टिकणारे असे काहीतरी आपल्याला सापडावे असे माणसाला वाटत असते. माणसाचा हा शोध आयुष्यभर सुरू राहतो. अशी एखादी गोष्ट आयुष्याच्या पूर्वार्धात जर आपल्याला सापडली तर माणूस आपले सर्वस्व पणाला लावून त्या गोष्टीमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देतो आणि मग त्याच्या जीवनाचे सार्थक होतेः
१) ज्ञान : पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे शलमोन राजाने ज्ञान हा आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान खजिना असल्याचे मानले. त्यामुळे एक ज्ञानी राजा म्हणून तो सर्वत्र नावारूपाला आला. देशोदेशीचे राजे-महाराजे व राण्या त्याचा सल्ला घेण्यासाठी आणि त्याचे वैभव पाहण्यासाठी येत.
२) देवाचे वचन : इब्री लोकांस पत्र लिहिणाऱ्या लेखकाला देवाचे वचन हा अत्यंत मौल्यवान खजिना असल्याचे पटलेले होते. हे देवाचे वचन दुधारी तरवारीसारखे आहे. ते उच्चारणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाला जसे स्पर्शन जाते तसेच ते ऐकणाऱ्याच्या अंतःकरणाला भेदून जाते त्यासाठी जीव वआत्मा, सांधे व मज्जा, विचार व हेतू अश्या तीन जोड्या लेखक आपल्यापुढे सादर करतो.
३) स्वर्गीय संपत्ती : आपल्या तरुणपणापासून सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी धडपडणारा एक युवक येशूला भेटतो. येशू त्याला चार गोष्टींचीजाणीव करून देतो : सर्व प्रकारच्या चांगुलपणाचा उगम परमेश्वराठायी आहे, परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हा सार्वकालिक जीवन मिळविण्याचा खात्रीलायक मार्ग आहे, धनाची आसक्ती हा या मार्गातील खूप मोठा अडथळा ठरू शकतो, त्यामुळे दृश्य संपत्तीवर पाणी सोडून येशूच्यामागे येण्यांने माणसाला स्वर्गातील अदृश्य संपत्ती मिळू शकते. हा श्रीमंत तरुण नेमका तिसऱ्या टप्प्यातच अडकला त्यामुळे त्याला स्वर्गीय संपत्ती मिळविता आली नाही.
आत्मपरीक्षण : मी माझ्या जीवनात कोणत्या गोष्टीचा शोध घेत आहे? सार्वकालिक जीवन मिळविण्याच्या मार्गात कोणकोणते अडथळे मला जाणवतात? स्वर्गीय संपत्ती मिळविण्यासाठी मला कोणत्या एका गोष्टीचा त्याग करावा लागणार आहे? त्यासाठी मी कितपत तयार आहे ?
प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, आमच्या उणीवांची जाणीव आम्हाला व्हावी आणिसर्वस्वी आम्ही तुला शरण यावे म्हणून आम्हाला बळ दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या