Marathi Bible Reading | Monday 11th October 2021 | 28th Week in ordinary Time |

            सामान्य  काळातील 

२८वा सप्ताह 

सोमवार 

११ऑक्टोबर   २०२१

"कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे


संत पोप जॉन तेवीसावे यांचा सण 

 ✝️ 

प्रभू येशू तारणारा आहे असा विश्वास ठेवणाऱ्या व त्याचे अनुकरण करणाऱ्यांच्या जीवनात अद्भूत दैवी चिन्हे अनुभवायला मिळतात परंतु  संशय, अविश्वास आणि भीतीने त्रस्त झालेल्या शास्त्री परुश्यांनी प्रभू येशूकडे चिन्हांची मागणी प्रथम केली. पहिल्याने चिन्ह मग विश्वास ठेवणार असे सांगणाऱ्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त आज सांगत आहे, ' ही पीढी दुष्ट आहे, ही चिन्ह मागते.'

परमेश्वराने योनाला पाचारण करून नीनवेकरांस पश्चातापाचा संदेश दिला. नीनवेकरांसाठी चिन्ह झालेल्या योनाच्या संदेशावर त्यांनी विश्वास ठेवला. योनाप्रमाणेच प्रभू म्हणतो, 'मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला चिन्ह होईल. तीन दिवस योना माशाच्या पोटात होता, मात्र प्रभू येशू तीन दिवसांनंतर पुनरुत्थित होणार होता, हे महान चिन्ह सर्व मानवजातीसाठी तारणाचे चिन्ह बनले. परमेश्वराचा चमत्कार आपल्या जीवनात व्हावा असे वाटत असेल तर त्याची महानता अनुभवण्यासाठी पंचेद्रियांच्या पलिकडे जाऊन त्याचा शोध घ्यावा लागेल. प्रभू येशूच्या वचनांवर विश्वास ठेवून त्याच्या सहवासाचा अनुभव आम्हाला घेता आला पाहिजे.

आपल्या जीवनात अनेक चिन्हाद्वारे देव आपल्याशी बोलत असतो. निसर्ग, निसर्गातील घडामोडी, पक्षी, प्राणीमात्र, आपले बंधु-भगिनी आपले कार्य, संपर्कातील अनेक माणसे अशा सर्वांतून दररोज अनेक चिन्हे आपल्याला अनुभवावयास मिळतात. आपण अंतर्मूख बनून प्रभूचे अस्तित्व अनुभवण्यासाठी प्रेरणा मागू या.

✝️

पहिले वाचन : रोमकरांस  १:१-७
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन 

"सर्व राष्ट्रांनी श्रद्धा बाळगावी व आज्ञापालन करावे म्हणून ख्रिस्ताद्वारे आम्हाला कृपा आणि प्रेषितपद ही मिळाली."

पवित्र जन होण्याकरिता बोलावलेले रोम शहरातील देवाचे प्रियजन ह्या सर्वांना, प्रेषित होण्याकरिता बोलावण्यात आलेला देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला आणि पवित्र आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्याद्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. त्याच्याद्वारे आम्हांला कृपा आणि प्रेषितपद ही मिळाली, त्याच्या नावाकरिता सर्व राष्ट्रांनी श्रद्धा बाळगावी व आज्ञापालन करावे. त्यांच्यापैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यासाठी बोलावलेले आहा, त्या तुम्हांला देव जो आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा आणि शांती असो.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ९८: १-४

प्रतिसाद :  परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे.

१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, 
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. 
त्याने आपल्या उजव्या हाताने, 
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.

२) परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे, 
राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. 
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली 
सत्यता आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे.

३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे 
तारणकार्य पाहिले आहे. 
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,
 परमेश्वराचा जयजयकार करा.
उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक   ११:२९-३२

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 


“योनाच्या चिन्हाशिवाय ह्या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही."

बराच मोठा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असता येशू त्यांना म्हणू लागला, ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते, परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायदानाच्या दिवशी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील, कारण शलमोनचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे, निनवेचे लोक न्यायदानाच्या दिवशी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:आजच्या शुभवर्तमानात लोकसमुदायातील काहींचा अविश्वास पुन्हा दिसून येत आहे. त्यांच्या अविश्वासामुळे ते येशूकडे चिन्हाची मागणी करीत आहेत. येशू स्पष्ट शब्दात त्यांना कोणत्याही प्रकारचे चिन्ह देण्यास नकार देतो. त्याऐवजी प्रभूयेशू त्यांना परमेश्वराचा शब्द ऐकून, तो आत्मसात करणे व त्याप्रमाणे पवित्र जीवन जगण्यास त्यांना पाचारण करीत आहे.लोकसमुदायातील काही लोक येशूकडे चिन्हाची मागणी करीत आहेत कारण त्यांना येशू व त्याची शिकवणूक अमान्य आहे. म्हणून येशू त्यांना म्हणत आहे, 'ही पिढी दृष्ट आहे'. येशू सांगत आहे की संदेष्टा योना ह्याचे चिन्ह देण्यात येईल. ज्याप्रमाणे योना ह्याने निनवेकरांस पश्चात्ताप करण्यास आव्हान केले व त्या लोकांनी योनाचे शब्द स्वीकारून पश्चात्ताप केला त्याचप्रमाणे प्रभूयेशू लोकसमुदायातील सर्वांना पश्चात्ताप करण्याचे आवाहन करीत आहे. माझ्या जीवनात मी सुद्धा त्याच्या अस्तित्वाच्या चिन्हाची मांगणी करतो का ?

प्रार्थना :-हे प्रभू येशू, तुझा सहवास, तुझी जवळिकता अनुभवण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या