Marathi Bible Reading | Tuesday 12th October 2021 | 28th Week in ordinary Time |

             सामान्य  काळातील 

२८वा सप्ताह 

मंगळवार 

१२ ऑक्टोबर   २०२१

"तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पाहा, सर्व काही तुमच्यासाठी शुद्ध आहे."




धान्य. कार्लो अकुतीस 
 वर्तनसाक्षी 
३ मे १९९१ - १२ ऑक्टोबर २०२०

 ✝️ 

शास्त्री-परूशी ह्यांना धार्मिकता म्हणजे नियमाधिष्ठीत बाह्य व पोकळ  भक्तीचा देखावा वाटत होती. केवळ बाह्य कर्मकांडाला महत्व देणाऱ्या परूशी व शास्त्र्यांचा प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात निषेध करीत आहे. प्रभू त्यांना  म्हणत आहे, 'तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.'

आपण सुध्दा अनेकदा आपले  बाह्य शरीर स्वच्छ ठेवून पोकळ भक्तीचा देखावा करीत असतो. चांगला पोषाख करुन सभ्यपणाचा आव आणायचा मात्र अंतर्यामी स्वार्थ, हेवा, मत्सर, द्वेष, राग, जुलूम अशा प्रकारच्या दुष्टपणाने आचरण करणाऱ्या सर्वांचा प्रभू आज निषेध करीत आहे. अंतःकरणात साचलेला हा अशुध्दपणा प्रभू येशू आज बाहेर  काढण्यास सांगत आहे. प्रभू म्हणतो, 'जे आंत आहे त्याचा दानधर्म करा म्हणजे  पाहा तुम्हांस सर्व शुद्ध आहे.' परमेश्वराला अपेक्षित शुद्धता, चांगुलपणा आणि| परोपकार तसेच परमेश्वराठायी सर्व समर्पित करण्यासाठी आज प्रभूकडे विशेष  कृपा मागू या.

 विश्वासाने प्रभूच्या आज्ञा आपल्याला पाळता  याव्यात आणि सत्य वचनांवर आधारित अशी प्रभूची उपासना व भक्ती  आपल्याला करता यावी म्हणून नम्रतेने प्रभू चरणी नतमस्तक होऊ या.  आध्यात्मिकतेत वाढत असताना पवित्र आत्म्याची फळे म्हणजेच 

प्रीति,  आनंद,  

सहनशीलता, सौम्यता, 

परोपकार, शांती, 

चांगुलपणा व विश्वासूपणाने जीवन जगण्यासाठी कृपा मागू या.

✝️

पहिले वाचन : रोमकरांस  १:१६-२०
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन 

"देवाला ओळखूनसुद्धा मनुष्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही. "

मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेल्लेण्याला, तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट झालेले आहे,नीतिमान विश्वासाने जगेल ह्या शास्त्रालेखाप्रमाणे हे आहे. वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर आणि अनीतिवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य आणि देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंध:काराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू आणि सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली.
    ह्यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, अशासाठी की, त्यांच्या देहांची त्यांच्यात्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्यांऐवजी निर्मितांची भक्ती आणि सेवा केली, तो निर्माणकर्ता तर युगानुयुगे धन्यवादित आहे. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १९: २-५
प्रतिसाद :आकाश देवाचा महिमा वर्णिते.

१) आकाश देवाचा महिमा वर्णिते, 
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. 
दिवस दिवसाशी संवाद करतो, 
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.

२) वाचा नाही, शब्द नाही, 
त्यांची वाणी ऐकू येत नाही. 
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो,
त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
मी परमेश्वराची अपेक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक   ११:३७-४१

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“दानधर्म करा म्हणजे सर्व काही तुमच्याकरिता कल्याणदायक होईल."

येशू बोलत आहे इतक्यात एका परुश्याने त्याला आपल्याकडे भोजनाला येण्याची विनंती केली, मग तो आत जाऊन भोजनाला बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परुश्याला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, "तुम्ही परुशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता, पण तुमचा अंतर्भाग जुलूम आणि दुष्टपणा ह्यांनी भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग स्वच्छ केला, त्याने अंतर्भागही स्वच्छ केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा आणि पाहा, सर्व काही तुमच्यासाठी शुद्ध आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:आजच्या शुभवर्तमानात प्रभूयेशू एका शास्र्याच्या घरी भोजनास बसलेला आहे. भोजनाला येण्याअगोदर त्याने एका भूतरास्तास मुक्त केले होते व लोकसमुदायाशी वार्तालाप केला होता. अशाप्रकारे शास्त्री व परुशी त्याला अशुद्ध म्हणून त्याच्याकडे पाहात होते. भोजनाच्या वेळी शास्त्री व परुशी जे शुद्धतेचे नियम काटेकोरपणे पालन करीत असत व अशाच लोकांबरोबर ते भोजन करायचे की जे शुद्धतेचे नियम पाळायचे. प्रभूयेशू आपले हात पाय न धुता भोजनाला बसलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटले. येशूचे हे वर्तन त्यांना अयोग्य वाटले. अंतर्गत आणि बाह्य शुद्धता काय आहे ह्याची शिकवण येशू त्यांना देत आहे. प्रभूयेशू हे समजवून देण्याचा प्रयत्न करीत आहे की, परमेश्वराने संपूर्ण माणसाला अंतर्गत आणि बाह्य असे घडवलेले आहे. आणि म्हणून देवाला फक्त बाह्य स्वरूपाची शुद्धता नव्हे तर अंतर्गत आत्म्याच्या शुद्धतेची गरज आहे. येशू हेच सांगत आहे की, प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाह्य कृतीद्वारे अंतर्गत शुद्धता प्रतिबिंबीत करावी. माझी सत्कृत्ये माझ्या अंतर्गत शुद्धतेशी संलग्न आहे का ?

प्रार्थना :-हे प्रभू येशू, अंतर्यामी शुध्द व पवित्र बनण्यास आणि खऱ्या अंतःकरणाने तुझी उपासना व भक्ती करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या