सामान्य काळातील
२८वा सप्ताह
बुधवार
१३ ऑक्टोबर २०२१
“तुमची केवढी दुर्दशा होणार”
संत एडवर्ड
राजा, वर्तनसाक्षी (१००४-१०६६)
✝️
संत पौल यहुद्यांच्या वागण्यावरून त्यांना दोष लावित आहे. परमेश्वराची ममता आणि दया ह्या विषयी आस्था न बाळगता, तसेच पश्चात्तापाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना संत पौल म्हणतो, 'तो प्रत्येकाला ज्याच्या त्याचा कृत्याप्रमाणे फळ देईल."
परुशी कशाप्रकारे ढोंगी व सोवळेपणाचे जीवन आचरण करतात हे प्रभू येशू त्यांचा निषेध करुन त्यांना सांगत आहे. हे मोशेच्या नियमांप्रमाणे परुशी दशांश अर्पण करतात पण न्यायाने आणि प्रीतिने आचरण करीत नाही. सभास्थानांत श्रेष्ठ आसने व बाजारात नमस्कार घेणे परुशांना आवडते. म्हणजेच सर्वांनी सन्मान द्यावा असे त्यांना वाटते पण गरिबांवर अनेक प्रकारे अत्याचार करतांना त्यांना काहींच वाटत नाही. प्रभू येशू स्पष्ट शब्दात अशा प्रवृत्तीच्या माणसांना म्हणत आहे, 'तुमची केवढी दुर्दशा होणार'.
चर्चसाठी मोठमोठ्या देणग्या देणारी काहीं माणसे प्रत्यक्षात अन्याय-अत्याचार करीत असतात. आपण खूप धार्मिक असल्याचा आव आणून इतरांच्या जीवनात अडथळे निर्माण करणारी माणसे आपल्यामध्ये आहेत. खरे ख्रिस्ती जीवन आचरण करणारी माणसे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगतात. ते इतरांच्या जीवनात आनंद व शांती निर्माण करीत असतात. ते गरजवंतांच्या सहाय्याला धावून जातात व नम्रतेने ख्रिस्ताची सुवार्ता पसरवित असतात.
✝️
पहिले वाचन : रोमकरांस २:१-११
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन
"देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल, प्रथम यहुदी लोकांना आणि हेल्लेणी लोकांनासुद्धा."
हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही. कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोसत्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस, पण अशा गोष्टी करणाऱ्यांविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस आणि स्वतः त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते का? किंवा देवाची ममता तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा, आणि सहनशीलता ह्यांचा विपुलतेचा अनादर करतोस? की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध आणि यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतः करिता क्रोध साठवून ठेवतोस? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान आणि अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच, परंतु जे तट पाडणारे आहेत आणि सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध आणि कोप, संकट आणि क्लेश ही येतील. देवाजवळ पक्षपात नाही म्हणून दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग हेल्लेणी, अशा प्रत्येकावर ती येतील. सत्कृत्य करणारा प्रत्येकजण, प्रथम यहुदी आणि मग हेल्लेणी ह्यांस गौरव, सन्मान आणि शांती ही मिळतील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६२: २-३,६-७,९
प्रतिसाद : परमेश्वरा, तू प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतोस.
१) मी केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिलो आहे,
त्याच्यापासून मला तारणप्राप्ती होते.
तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे,
तोच माझा उंच गड आहे,
मी मुळीच ढळणार नाही.
२) हे माझ्या मना, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा,
कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे.
तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे,
तोच माझा उंच गड आहे, मी ढळणार नाही.
३) अहो, लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा.
त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा,
देव आमचा आश्रय आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
शुभवर्तमान लूक ११:४२-४६
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार!"
येशू परुश्यांना म्हणाला, "तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार आहे कारण तुम्ही पुदिना, सताप, आणि प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय आणि देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करता. ह्या गोष्टी करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. तुम्हा परुश्यांची केवढी दुर्दशा होणार आहे कारण सभास्थानात श्रेष्ठ आसने आणि बाजारात नमस्कार घेणे तुम्हांला आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार आहे कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरीसारखे आहा, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात."
तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणाएकाने त्याला म्हटले, "गुरुजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता." तो म्हणाला, "तुम्हां शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार आहे कारण वाहायला अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्याला लावत नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:प्रभू येशू आणि शास्त्री-परूशी ह्यांच्यातील वाढता विवाद आजच्या शुभवर्तमानात आपणांस ऐकावयास मिळत आहे. महत्वाचे व शुल्लक ह्याच्यातील फरक काय आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न प्रभूयेशू करीत आहे. सरळ व स्पष्ट शब्दात प्रभूयेशू शास्त्री व परुशी ह्यांची निंदा करीत आहे. नियमशास्त्र जे आहे त्याचा काटेकोरपणे ते पाळण करीत आहेत. परंतु महत्वाचे जे आहे ते म्हणजे न्यायाने वागणे व ईश्वरावर प्रेम करणे ह्या गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. येशू ह्या गोष्टींबद्दल शास्त्री व परूशी ह्यांची टीका करीत आहे. न्याय व देवावरील प्रेम याकडे त्यांनी दुर्लक्ष करून बाह्य धार्मिकतेवर लक्ष दिले आहे. खऱ्या देवाची भक्ती करणे म्हणजे इतरांकडून स्तुती प्राप्त करून घेणे नव्हे. बाह्य आणि अंतर्गत ही भिन्नता आहे हे तो दर्शवितो. माझ्या जीवनात मी खरी धार्मिकता कशाप्रकारे व्यक्त करतो ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, अंतर्यामी शुध्द व पवित्र बनण्यास आणि खऱ्या अंतःकरणाने तुझी उपासना व भक्ती करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या