Marathi Bible Reading | Thursday 14th October 2021 | 28th Week in ordinary Time |

               सामान्य  काळातील 

२८वा सप्ताह 

गुरुवार 

१४ ऑक्टोबर   २०२१ 

जे आंत जात होते त्यांस तुम्ही प्रतिबंध केला. ”


संत कलिस्टस पहिले 

परमगुरुस्वामी , रक्तसाक्षी (.... -२२२)

 ✝️  

कर्मकांडाच्या नावाखाली अन्यायाने त्यांनी सामान्य माणसांवर अनेक बंधने लादली. आज सुद्धा स्वतःला धार्मिक आणि ज्ञानी पंडित समजणारी माणसे समाजात आहेत. चर्चमध्ये नियमित जाणारी परंतु पवित्र मिस्साबलिदानाचे महत्त्व न जाणणारी, बायबल वाचन करणारी पण आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ  लावणारी, सर्व प्रकारचे कर्मकांड पाळणारी पण आध्यात्मिकते विषयी अज्ञान असणारी, मरिया भक्तीत सहभागी होणारी मात्र मरियेचा आदर्श न गिरवणारी, ख्रिस्ती म्हणून मिरवणारी मात्र ख्रिस्तानुवर्तन न करणारी. अशा मानसिकतेची माणसे स्वत: आध्यात्मिकतेत वाढत नाहीत आणि इतरांना सुद्धा चांगले जीवन जगू देत नाहीत. अशा सर्वांना प्रभू येशू आज सांगत आहे, 'तुमची केवढी दुर्दशा  होणार ! तुम्ही स्वत:आत गेला नाहीत व जे आत जात होते त्यांस तुम्ही प्रतिबंध  केला.'

तारण सर्वांसाठी आहे. संत पौल म्हणतो, 'देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील  विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. केवळ नियमशास्त्र पाळण्यापेक्षा विश्वास महत्वाचा आहे. सर्वांच्या तारणासाठी प्रभू येशू जगात आला होता.

कुणालाही विश्वासापासून, उपासनेपासून व खऱ्या भक्तीपासून परावृत्त करू  नये. सर्वदा इश ज्ञानात व प्रभू शब्दात वाढत राहावे आणि परोपकारी जीवन जगता यावे म्हणून विशेष प्रार्थना करु या.

✝️

पहिले वाचन : रोमकरांस  ३:२१-३०
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन 

"मनुष्य नियमशास्त्रातील कर्माने नव्हे तर विश्वासाने नीतिमान ठरतो."

नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमान ते प्रकट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची आणि संदेष्ट्यांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते देणगीदाखल नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे, म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे.

तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. कारण नियमशास्त्रातील कर्माने नव्हे तर मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. देव केवळ यहूद्यांचा आहे का? तो परराष्ट्रीयांचा नव्हे का? हो, तो परराष्ट्रीयांचा देखील आहे, कारण देव एकच आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १३०: १-२,४-६
प्रतिसाद : परमेश्वराच्या ठायी दया आहे. 

१) हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करत आहे.
हे प्रभो, माझी वाणी ऐक, 
माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.

२) हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील,
 तर हे प्रभो, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील? 
तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.

३) मी परमेश्वराची अपेक्षा करतो, 
मी त्यांच्या वचनाची आशा धरतो. 
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यांपेक्षा 
मी प्रभूची अधिक वाट पाहतो.



जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा! तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक   ११:४७-५४

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 


"हाबेलच्या रक्तापासून तर जखऱ्याच्या रक्तापर्यंतच्या प्रत्येक संदेष्ट्यांच्या रक्ताबद्दल ह्या पिढीला हिशेब द्यावा लागेल."

येशू शास्त्र्यांना म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले! तुम्ही साक्षीदार आहा आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील काहीना ते जिवे मारतील आणि काहींना छळतील, ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त म्हणजे हाबेलच्या रक्तापासून वेदी आणि पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीकडून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हां शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, पण तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.
तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि परुशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्यावर प्रश्नांचा भडीमार करू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनपरुश्यांचा निषेध केल्यानंतर प्रभूयेशू तीन वेळा शास्त्रांचा धिक्कार करीत आहे. सर्वप्रथम शास्त्रांनी परमेश्वराच्या शब्दाला कायद्याच्या दृष्टीने पाहिले आहे. म्हणून अनेक धार्मिक कायदेशीर बंधने लोकांवर लादलेली आहेत व ती हलकी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची मदत ते लोकांना करीत नाहीत. तोराहमधील बंधनांचे पालन करून देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याऐवजी नियमशास्त्राचे पालन करणे मोठे ओझे लोकांसाठी झाले आहे. शास्त्र्यांनी काटेकोरपणे नियमशास्त्राचे पालन करण्यास भाग पाडून, ईश्वराच्या सानिध्यात येण्याऐवजी त्याने अनेक प्रकारचे अडथळे निर्माण केले आहेत व लोकांना परमेश्वरापासून दूर केले आहे. त्यांच्याकडे तारण प्राप्त करून घेण्याच्या किल्ल्या होत्या, परंतु त्यांनी स्वतः ह्या किल्ल्यांचा उपयोग केला नाही व इतरांना करू दिले नाही. नियमशास्त्राचे कठोर स्पष्टीकरण देऊन त्याने लोकांना देवापासून अलिप्त ठेवले. तारणप्राप्तीसाठी प्रेमाचे व सेवेचे जीवन जगण्याचे  आवाहन करण्याऐवजी आपण काय केले पाहिजे व काय करू नये ह्या गोष्टींवर ते भर देत होते.म्हणून येशू त्यांचा धिक्कार करतो. माझ्यावागणुकीद्वारे मी इतरांना देवाच्या सानिध्यात आणण्याचा प्रयत्न करतो का ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, विश्वासात वाढत जाऊन खरे नीतिमान, भक्तीमान व आध्यात्माने भरलेले परोपकारी ख्रिस्ती जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या