सामान्य काळातील
२८वा सप्ताह
शुक्रवार
१५ ऑक्टोबर २०२१
भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात
अविलाची संत तेरेजा
-कुमारिका, धर्मपंडिता (१५१५- १५८२)
✝️
स्पेनच्या वायव्येला ५० मैल अंतरावर ओल्ड कॅस्टील नावाचे शहर वसले होते. तेथे अविला नावाचे एक सुंदर गाव होते. त्या गावात संत तेरेजाचा जन्म झाला. बायबलपंडित संत जेरोम ह्यांची पत्रे वाचून तेरेजाने आपल्या स्वत:च्या वैयक्तिक तारणासाठी वयाच्या १८ व्या वर्षी कार्मेलाईट कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. प्रार्थना हे अनेक कृपादानांचे भांडार खुले करणारे महाद्वार आहे. जर हे महाद्वारच बंद असेल तर देव आणखी कोणत्या मार्गाने त्याचा कृपावर्षाव करतो ते मला समजत नाही असे ती नेहमी म्हणायची.
कॉन्व्हेंटमध्ये असताना तेरेजा अचानक आजारी पडली. त्या आजारपणाच्या काळात तिने चिंतनशील प्रार्थना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्याच काळात तिने संत अगस्तीनने लिहिलेले “आत्मनिवेदन” वाचून काढले आणि ती संपूर्णत: देवाला शरण आली, त्याकाळी अनेक धार्मिक संस्थामध्ये शिस्त थोडीशी सैल झालेली होती. सातत्याने होणाऱ्या पाहुण्यांच्या वर्दळीमुळे प्रार्थनामय जीवनाकडे थोडेफार दुर्लक्ष होत असे. तेरेसा म्हणे, प्रार्थना आणि स्वार्थलोलुपता ह्यांचे मेतकूट कधीही जमू शकत नाही. ह्याच कारणास्तव आता आपल्या जीवनात केवळ देवालाच प्रथम स्थान देण्याचा निर्णय तिने घेतला.
प्रार्थनामय जीवनातील तिची प्रगती वाखाणण्याजोगी होती. त्यामुळेच आता ती अशा अवस्थेप्रत येऊन पोहोचली की, दृष्टांत, साक्षात्कार आणि असामान्य कृपेचा अनुभव तिला वारंवार येऊ लागला, स्वत: ख्रिस्त तिच्याशी बोलला त्यावेळी आपल्या हृदयातून प्रेमाचा अग्निबाण आरपार जाताना तिने अनुभवला. मधुराभक्तीचा अनुभव ती आता घेऊ लागली. अशा भक्तीमध्ये भक्त आणि परमेश्वर परस्परांस पती-पत्नी मानतात. सुरुवाती, सुरुवातीला ह्या साक्षात्कारांचा अर्थ तिला समजेना. ती गोंधळून जाई. आपल्या आध्यात्मिक गुरूसमोर मन मोकळे करताना तिच्या मनाची घालमेल होई. आध्यात्मिक गुरूंच्या मनातही शंका आणि गैरसमज निर्माण होत. हा साक्षात्कारच की सैतानाचा फसवा डाव याचे आकलन करणे कठीण जाई.
बघता बघता अशी २० वर्षे गेली. या २० वर्षामध्ये तिने बरीच खडतर तपश्चर्या अनुभवली होती. मात्र त्याचे फलित तिला आता मिळू लागले. जगातील सर्व प्राणीमात्रापासून, आपत्ती व मोहांपासून ती दूर राहू लागली. ख्रिस्ताचे अनुकरण परिपूर्णरित्या करण्याचा एकच ध्यास तिला लागला, “जी प्रार्थना केवळ देवाला प्रसन्न करते, आपल्यामध्ये बदल घडवून आणते आणि चांगले कृत्य करण्यास आपल्याला प्रेरणा देते तीच खरीखुरी प्रार्थना असते. आपल्या स्वत:च्या समाधानासाठी केलेली प्रार्थना ही प्रार्थना नसतेच मुळी!"
संत पीटर (आल्कान्ताराचे, सण १८ ऑक्टो.) आणि संत फ्रान्सिस बोर्जिया (सण १० ऑक्टो.) ह्या तिच्या आध्यात्मिक गुरूंना कळून चुकले, की देवाचे सामर्थ्य तेरेजाठायी कार्यरत झालेले आहे आणि इ. स. १५६१ मध्ये आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने कार्मेलाईट संस्थेचे नूतनीकरण करण्याची आज्ञा तिला दिली. त्यावेळी तिचे वय ४६ वर्षांचे होते.
आपल्या आयुष्याची ऊर्वरित वर्षे तिने बराच विरोध सहन करून १७ कॉन्व्हेन्ट्स आणि १५ मठ उभारण्यात घालविली. तिच्या मते कोणतीही गोष्ट आपल्याला विचलित करू शकत नाही. सर्व गोष्टी येतात नि जातात. फक्त देव तेवढा राहतो. धीराने सर्व गोष्टी मिळविता येतात. आपला देव तेवढा पुरेसा आहे (God alone Suffices).
आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेनुसार तिने 'परिपूर्ण मार्ग' 'राजभवन' आणि 'देवप्रीतीची संकल्पना' अशी आध्यात्मिक पुस्तके लिहिली. अध्यात्म क्षेत्रातील अनेक अग्रेसर पंडितांमध्ये तेरेजानेही आपला ठसा उमटविला.
संत तेरेजा ऑक्टोबरच्या ४ तारखेला १५८२ साली मरण पावली. पोप ग्रेगरी पंधरावे ह्यांनी १६२२ साली तिला संतपद दिले. देऊळमातेने तिला धर्मपंडिता (डॉक्टर ऑफ द चर्च) हा मरणोत्तर किताब बहाल केला.
चिंतन : जेव्हा तुम्ही पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारता तेव्हा आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आत्म्याचे डोळे उघडा. त्यानंतर आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी प्रभू येशू ख्रिस्त विराजमान झालेला पहा. - संत तेरेजा
परमेश्वर आपल्यावर निःस्वार्थी प्रेम करतो व त्याच प्रेमाठायी आपला सांभाळ करीत असतो. त्याच्यावरील विश्वासात आपण दृढ बनावे आणि धैर्याने जीवनातील सर्व आव्हाहनाना सामोरे जाता यावे म्हणून प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवू या. प्रभू सर्वदा आपल्या बरोबर आहे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून आपण धैर्याने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा मागू या.
✝️
शुभवर्तमान लूक १२:१-७
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
0 टिप्पण्या