सामान्य काळातील
२८वा सप्ताह
शनिवार
१६ ऑक्टोबर २०२१
संत मार्गारेट मेरी अलाकोक
कुमारिका (१६४७-१६९०)
✝️
सतराव्या शतकामध्ये प्रोटेस्टंट पंथ इंग्लंडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेला होता की, त्यामुळे ख्रिस्ती श्रद्धा धोक्यात आलेली होती. दुसरीकडे फ्रान्ससारख्या देशात राजा लुई चौदावा हा भौतिकवादी राजा राज्य करीत असल्याने श्रद्धेची ज्योत क्षीण होत होती. ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी देवाने फ्रान्समधील एका व्रतस्थ धर्मभगिनीची निवड केली. तिचं नाव होतं मागरिट मेरी अलाकोक.ख्रिस्ताने प्रत्यक्ष आज्ञापिल्याप्रमाणे आपले घरदार सोडून १६७१ साली तिने पर ले मोनिअल येथील विझिटेशन कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. तो दिवस होता संत योहानच्या सणाचा! अगदी सुरुवातीलाच तिला येशूचा साक्षात्कार झाला आणि तिला येशूचा जीवलग शिष्य योहानप्रमाणे येशूच्या उराशी (अतिपवित्र हृदयाजवळ) टेकण्याची संमती खुद्द येशूने दिली.
ख्रिस्त तिला म्हणाला, मानवावरील प्रेमापोटी माझ्या हृदयात प्रेमाचा अग्नि इतका धगधगतो आहे की, त्यामध्ये आता आणखी प्रीतीच्या ज्वाला समाविष्ट करणे केवळ अशक्य आहे. हे प्रेम आता तू इतरांपर्यंत पोहोचविले पाहिजे. मी तुला प्रकट करीन त्या महान व अतिमौल्यवान गोष्टी तू लोकांना सांग आणि त्यांच्यात देवधर्माविषयी प्रेम उत्पन्न कर. ह्या अतिमौल्यवान गोष्टींमध्ये सैतानाच्या सामर्थ्यापासून लोकांचा बचाव करण्याचे आणि तारण प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य दडलेले आहे.
मी लोकांवर इतकं प्रेम केले परंतु त्या बदल्यात मला काय मिळाले? तिरस्कार, अपमान, अनादर, कटुता आणि कृतघ्नता. म्हणूनच मी तुला आज्ञा करतो की, कॉर्पुस ख्रिस्ती (ख्रिस्ताच्या शरीर व रक्ता) च्या सणानंतरच्या आठवड्यातील शुक्रवार माझ्या अतिपवित्र हृदयाच्या सन्मानार्थ राखून ठेवला जावा. ह्या दिवशी लोकांनी भाल्यांनी विंधिलेल्या माझ्या घायाळ व रक्तबंबाळ हृदयाकडे पाहून पश्चात्ताप करावा, प्रायश्चित्त करावे आणि परिवर्तनासाठी दृढ निश्चय करावा, व आपल्या छोट्या मोठ्या पापांची भरपाई करावी अशा प्रकारे माझ्या अतिपवित्र हृदयाचा सन्मान करणाऱ्यांना मी विशेष कृपादाने देईन, शिवाय तशी भक्ती करण्यास इतरांना प्रोत्साहन देणाऱ्यांना दैवी प्रेमाची अलौकिक देणगी मी देईन.
प्रभू येशू ख्रिस्ताने तिला असे ठामपणे सांगितले की, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी श्रद्धावंतांनी ख्रिस्तशरीर संस्कार स्वीकारावा तसेच त्या दिवशी संध्याकाळी अतिपवित्र साक्रामेंत आराधनेसाठी वेदीवर खुले ठेवावे.
शेवटी येशू तिला म्हणाला, “अतिपवित्र हृदयाच्या प्रिय शिष्ये, तू हे सर्व करशील तेव्हा तुला बराच अपमान आणि टीकानिंदा सहन करावी लागेल आणि माझ्या नावासाठी तुला रक्तदेखील सांडावे लागेल" आणि खरेच तिच्या कॉन्व्हेंटमधील इतर भगिनींना वाटले हिला दुष्टात्म्याने पछाडलेले आहे की काय म्हणून त्या तिच्यावर पवित्र पाणी शिंपडत असत.
हळूहळू संत मागरिट मेरी हिचे आध्यात्मिक गुरू धन्यवादित क्लॉड डे ल कोलुम्बीएरे ह्या येशूसंघीय धर्मगुरूंनी तिच्या साक्षात्कारांना अधिकृत मान्यता मिळविण्याचा प्रयत्न केला व अशा प्रकारे येशूच्या अतिपवित्र हृदयाची भक्ती व आराधना पसरली व ख्रिस्तसभेच्या महान परंपरेचा ती एक भाग बनली.
संत मागरिट मेरी हिचा मृत्यू १७ ऑक्टोबर १६९० साली झाला आणि पोप बेनेडिक्ट पंधरावे ह्यांनी तिला १९२० साली संतपदाचा बहुमान दिला.
आपल्या सर्वांना श्रद्धेत टिकून राहण्यासाठी व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा व सामर्थ्य लाभावे, व पवित्र आत्म्यानुसार आपले जीवन आपण जगावे म्हणून प्रभूची व पवित्र आत्म्याची आराधना करु या.
✝️
पहिले वाचन : रोमकरांस ४:१३,१६-१८
वाचक : पौलचे रोमकरांस यातून घेतलेले वाचन
“आब्राहामने श्रद्धा ठेवली, आशेला कारण नसताही त्याने आशा बाळगली."
आब्राहामचे आचरण धर्मशास्त्रानुसार होते म्हणून नव्हे,पण त्याच्या श्रद्धेमुळे तो नीतिमान ठरला म्हणून, सारे जग त्याचेच होईल असे अभिवचन त्याला व त्याच्या वंशजांना देण्यात आले होते.
तेव्हा आब्राहामच्या साऱ्या वंशजांना म्हणजे केवळ धर्मशास्त्राप्रमाणे वागणारांनाच नव्हे पण आब्राहामप्रमाणे ज्यांची श्रद्धा आहे त्यांनाही हे अभिवचन मेहेरबानीदाखल खात्रीने मिळावे म्हणून ते श्रद्धेवर आधारलेले आहे, कारण आब्राहाम आपणा सर्वांचा पिता आहे. त्याच्याविषयी धर्मशास्त्रात लिहिले आहे, "मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे." जो मृतांना जिवंत करतो व अस्तित्वात नसेल ते आपल्या आज्ञेसरशी अस्तित्वात आणतो, अशा देवावर त्याची श्रद्धा होती. आब्राहामने श्रद्धा ठेवली, आशेला कारणही नसताना आशा बाळगली, त्याच्याविषयी सांगण्यात आले होते, “इतके तुझे वंशज होतील" म्हणूनच तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०५: ६-९, ४२-४३
प्रतिसाद : प्रभू आपल्या कराराची सर्वकाळ आठवण ठेवतो.
१) त्याचा सेवक आब्राहाम ह्याचे वंशजहो,
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो,
तो प्रभू आमचा देव आहे.
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.
२) तो आपला करार सर्वकाळ आठवतो,
म्हणजे हजारो पिढ्यांसाठी दिलेले
अभिवचन पाळतो, तो करार त्याने आब्राहामशी केला,
तो पाळण्याची इसहाकजवळ शपथ घेतली.
३) कारण आपला सेवक आब्राहाम याला दिलेल्या
पवित्र अभिवचनाची त्याला आठवण होती.
अशा रीतीने त्याने आपले लोक, आपली निवडलेली प्रजा,
मोठ्या आनंदाने वाजतगाजत बाहेर आणली.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो,मी तुझे स्तवन करतो,
कारण ह्या गोष्टी तू बालकांना प्रकट केल्या
शुभवर्तमान लूक १२:८-१२
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा तुम्हांस शिकवील."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यासमोर स्वीकारतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर स्वीकारील; तसेच जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरूद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरूद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हांला सभा, 'सरकार, आणि अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे आणि काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्याविषयी काळजी करू नका. कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभूयेशू भविष्यामध्ये त्याच्या शिष्यांविरुद्ध होणारा छळ अपेक्षित करीत आहे त्याबद्दल ताकीद देत आहे. शिष्य म्हणून त्यांचा छळ झाला तरी त्याने पवित्र आत्म्याचे स्मरण केले पाहिजे. संकटसमयी पवित्र आत्म्याकडून सामर्थ्य व मार्गदर्शन प्राप्त होईल. सभास्थानात राज्यकर्ते व अधिकारी त्यांच्यासमोर आणले जाईल ही भविष्यवाणी त्याचे प्रेषित संत स्टीफन व पौलाच्या जीवनात पूर्ण झालेली आहे. तो आपल्या शिष्यांना चेतावणी देत आहे की, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांचा छळ होईल आणि त्यांना न्यायासनासमोर आणले जाईल. म्हणून त्यांनी आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. विश्वासातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, मानवी न्यायाधिशासमोर त्यांनी घाबरू नये. परंतु जो चिरंतन न्यायाधीश आहे त्याची त्यांनी भीती बाळगावी. कठीण परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा त्यांच्या मदतीस येईल व त्यांना धैर्य प्राप्त होईल. माझ्या दैनंदिन जीवनात मी पवित्र आत्म्याचे स्मरण करतो का ?
प्रार्थना :- हे पवित्र आत्म्या ये, आमची श्रद्धा बळकट कर व तुझ्या पवित्र दानांनी आम्हाला भरुन टाक, आमेन.
✝️
0 टिप्पण्या