Marathi Bible Reading | 29th Sunday in ordinary Time |17th October 2021 |

सामान्य  काळातील 

२९वा रविवार 

१७ ऑक्टोबर   २०२१ 

“ जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”



धर्मप्रांतीय सिनड उद्घाटन विधी
बोधचिन्ह खालील प्रमाणे .

१. विषय: सहप्रवासात्मक ख्रिस्तसभेसाठी  एकात्मता, सहभागिता व प्रेषितकार्य ,
 कार्यकाळ २०२१ ते २०२३.

२. पवित्र मिस्सा सूर्याप्रमाणे चमकते.

३. जीवनाचे झाड शहाणपण आणि प्रकाशाचे प्रतिक, क्रूस  आशेचे प्रतिक, हाताच्या उघडलेल्या आडव्या रेषा पंखाप्रमाणे  सर्वांना कवेत घेत आहेत व पवित्र आत्माची साथ सोबत .

४. बोधवाक्य: यात्रेकरू ख्रिस्तसभा, सिनड सहप्रवास.

५. छायाचित्र परमेश्वराचे  गतिशिल लोक, गडद रंग आनंदाचे प्रतिक, 
१५ विभिन्न छायाचित्र संपूर्ण मानवजातीचे प्रतिक, 
बिशप   आणि धर्मभगिनी लोकांपुढे नव्हे तर लोकांसमवेत, सर्वांचा सहभाग, पदानुक्रम  नाही सर्व सामान  पातळीवर.

 ✝️  

 प्रस्तावना : आज आपण जगभरातील इतर सर्व प्रांताप्रमाणे आपण सहप्रवासात्मक परिषद सुरू करीत आहोत. सिनडचे हे निरनिराळे टप्पे ऑक्टोबर २०२३ मध्ये रोम येथे होणा-या बिशपांच्या परिषदेत कळस गाठणार आहेत. सिनड हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे.'सिन' म्हणजे सह आणि 'ऑडोस' म्हणजे रस्ता, थोडक्यात सिनड म्हणजे एकत्रित प्रवास चर्च म्हणून आपण सर्वजण पवित्र आत्म्यासह आणि येशू जो आपला मार्ग आहे त्याच्यासह प्रवास करतो. येशूने आपल्या दुखःसहन, मरण व पुनरुत्थानाद्वारे शिष्यांना जीवनात एक मार्ग दाखवला  पवित्र आत्म्याने प्रभावित होऊन अनेक जण सेवा व मिशन कार्यात सहभागी झाले. ते समुदायाचे सेवक बनले. प्रभू येशूच्या दुखःसहन, मरण व पुनरुत्थानाने त्यांचे पूर्ण परिवर्तन झाले. ह्या पवित्र मिस्माबलिदानात शिष्यांनी येशूसमवेत केलेल्या प्रवासावर आपण चिंतन कम या आणि आपल्या धर्मप्रांतातील सिनडचे टप्ये योग्यरित्या पार पडावेत म्हणून प्रार्थना करू या.


यशया संदेष्ट्याने तारणाऱ्याविषयी केलेले हे भाकित प्रभू येशू ठायी पूर्ण झाले. प्रभू येशूने अखिल मानवाच्या उध्दारासाठी सर्वस्व समर्पित केले. प्रभू येशू देवपुत्र असूनही त्याने नम्रता धारण करून तो  माणूस झाला व सर्वांचा तारणारा बनला.

  प्रभू येशूने याकोब व योहान यांना जागतिक सन्मानाविषयी बोध करीत असताना स्वर्गीय सन्मान मिळविण्यासाठी नम्रतेचा धडा दिला. प्रभूने स्पष्ट शब्दात सांगितले की, 'जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे.' नम्रता, लीनता, विनयशीलता आणि  त्याबरोबर सेवा हे गुण खऱ्या ख्रिस्ती माणसाची ओळख पटवून देत असतात.  प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः शिष्यांचे पाय धुतले आणि नम्रतेचे व सेवेचे महान उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे


✝️

पहिले वाचन : यशया ५३:१०-११
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल."

त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पीडले. त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जिवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांस निर्दोष ठरवील, त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३३: ४-५, १८-२०,२२

प्रतिसाद : हे परमेश्वरा, आम्हांवर तुझी कृपादृष्टी असो.

१) परमेश्वराचे वचन सरळ आहे, 
त्याची सर्व कृती सत्याची आहे. 
त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत. 
परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.

२) जे परमेश्वराचे भय धरतात आणि 
त्याच्या दयेची अपेक्षा करतात, 
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा 
आणि दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा 
म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.

३)आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे,
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे. 
हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे. 
म्हणून आम्हांवर तुझी कृपादृष्टी असो.

दुसरे वाचन इब्री  ४:१४-१६

वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

“आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.'

आकाशातून पार गेलेला पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जाहीर करत असलेल्या श्रद्धेला दृढ धरून राहू या. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभुती वाटत नाही, असा आपला तो प्रमुख याजक नाही, तो तर सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ या.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
 आलेलुया!


शुभवर्तमान मार्क    १०:३५-४५

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मनुष्याचा पुत्र पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यासाठी आला आहे."

जब्दीचे दोन मुलगे याकोब आणि योहान येशूकडे येऊन त्याला म्हणाले, "गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हांसाठी करावे अशी आमची इच्छा आहे." तो त्यांना म्हणाला, मी तुम्हांसाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागता हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? आणि जो स्नानसंस्कार मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय? ते त्याला म्हणाले, घेववेल, येशूने त्यांना म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हीप्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्याच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार!
हे ऐकून बाकीचे दहाजण याकोब आणि योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा
(आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांना म्हणाला, "परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात आणि त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, ते तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही, तर जो तुम्हांमध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आणि पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यासाठी आला आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:ऑक्टोबर महिन्यातील तिसरा रविवार हा मिशन संडे म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी जगभर कार्य करीत असलेल्या मिशनऱ्यांची विशेष आठवण करून त्यांच्यासाठीप्रार्थना केली जाते, आणि त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून पवित्र मिस्सेमध्ये विशेष दान गोळा केले जाते, मिशन संडेनिमित्त पोस्टर्स तयार करून, भाविकांना मिशन संडे पाकिटात दान टाकण्यास प्रोत्साहन देऊन व या विषयावर प्रवचन देऊन लोकांमध्ये जागृती केली जाते. दुर्दैवाने बहुतांश श्रद्धावंतांना मिशन म्हणजे एखादे दुर्गम ठिकाण आणि मिशनरी म्हणजे मागास भागामध्ये गोरगरिबांची सेवा करणारे फादर्स, ब्रदर्स्, सिस्टर्स व प्रापंचिक कार्यकर्ते असे वाटत असते. खरे पाहता बाप्तिस्मा घेतलेली प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ही मिशनरी असते. तिला ख्रिस्ताच्या पावित्र्यात सहभागी होण्यास आणि याजक, राजा व संदेष्टा ह्या त्याच्या तिहेरी मिशनकार्यात सहभागी होण्यास पाचारण करण्यात आलेले असते. 
१) याजक म्हणून मिशनकार्य : याजक या नात्याने ख्रिस्ताने सर्व साक्रामेंतांची प्रस्थापना केली. आजचे दुसरे वाचन त्याला सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक म्हणून संबोधते. त्याने बकऱ्यांचे किंवा बैलाचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण केले. आध्यात्मिक, धार्मिक, नैतिक वसात्विक जीवन जगून ख्रिस्ती मनुष्य ख्रिस्ताच्या या बलिदानाची सुवार्ता सर्वत्र पसरत असतो. 
२) संदेष्टा म्हणून मिशनकार्य : समाजामध्ये सुरू असलेल्या अनिष्ट रूढीपरंपरांना वाचा फोडण्यासाठी ख्रिस्ती व्यक्तीला पाचारण करण्यात आलेले असते. प्रवाहाविरुद्ध पोहताना नक्कीच तिला दुःख सहन करावे लागत. पहिल्या वाचनातील परमेश्वराच्या सेवकाचे दुःखभोगाचे वर्णन प्रभू येशूला लागू केले जाते. 
३) राजा म्हणून मिशनकार्य : राजा म्हटला म्हणजे प्रशासन आले, अधिकार आला, सत्ता आली. मात्र ह्या सर्वांचा वापर लोकांच्या कल्याणाकरिता होणे गरजेचेआहे. येशू हा विश्वाचा सम्राट असूनही दासाचे स्वरूप धारण करतो. मी सेवा करण्यासाठी आलो आहे असे सांगतो. अधिकाराच्या जागा मिळवू पाहणाऱ्या जब्दीच्या दोन मुलांना प्याला प्राशन करण्याचे आवाहन करतो. सेवावृत्तीने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाने ख्रिस्ती व्यक्ती राजा म्हणून आपले मिशनकार्य करीत असते.

आत्मपरीक्षण : मिशनविषयी माझी कल्पना कशी आहे? 'ख्रिस्तसभा ही स्वभावतः मिशनरी वृत्तीची आहे' तिच्या मिशनकार्यात मला माझे स्थान समजलेले आहे का ?
प्रार्थना :-  

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या