सामान्य काळातील
२९वा सप्ताह
१८ ऑक्टोबर २०२१
“ "देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.””
‘ प्रिय चिकित्सक' (किंवा प्रिय वैद्य लूक)
संत लूक
शुभवर्तमानकार (८५)
सूरिया प्रांताची राजधानी असलेल्या अंत्युखिया येथे लुकस नावाचा एक तरुण राहात होता. तो पेशाने वैद्य होता. आपल्या दुसऱ्या प्रेषितीय दौऱ्यावर असताना पौलने या वैद्याची औषधोपचरानिमित्ते भेट घेतली. संत पौलचे जीवन आणि देवावरील त्याची अढळ श्रद्धा ह्याचा लूकवर खूप प्रभाव पडला. त्याने तात्काळ ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि संत पौलचे शिष्यत्व पत्करले. परराष्ट्रीयांना देवाची सुवार्ता सांगण्यासाठी तो आता संत पौल ह्याच्याबरोबर हिंडू फिरू लागला. अथेन्स, थेस्सलनिका आणि करिथ येथे पौल देवाच्या राज्याची शिकवण लोकांना देत होता आणि इफिस ह्या ठिकाणी तो ३ वर्षे राहिला. या सर्व काळात लूक ह्याने फिलिप्पै येथे प्रेषितकार्याचा भार सांभाळला.
पुढे लूक संत पौलबरोबर येरुशलेम येथे परतला आणि कैसेरिया येथे पौल बंदिवान म्हणून जीवन जगत असताना त्याने वारंवार त्याची भेट घेतली. कदाचित ह्याच वेळेत त्याने प्रदीर्घ असे येशूचे संत लूककृत शुभवर्तमान लिहिले असावे. पुढे ह्या शुभवर्तमानाला बायबलपंडित संत जेरोम व संत जॉन क्रिझोस्टोम ह्यांनी संत पौलकृत शुभवर्तमान असे यथार्थपणे संबोधिलेले आढळते. संत लूक ह्यांना पौलकडूनच आपले लिखित साहित्य निर्माण करण्याची प्रेरणा झालेली मानले जाते. पौलची प्रवचने आणि सुवार्ता प्रसार ह्यांना लूक आपल्या गोष्टी- वेल्हाळ शैलीत शब्दबद्ध केले.
संत मत्तयकृत अरेमाईक भाषेतील शुभवर्तमान ह्या अगोदरच लोकांमध्ये पसरलेले होते. शिवाय संत लूकला संत मार्कच्या शुभवर्तमानाचा आधार होताच.ख्रिस्ती नैतिकता, दारिद्र्य आणि प्रसन्नता अशा ख्रिस्ती मूल्यांचा पुरस्कार या शुभवर्तमानात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर देवदूताचा मरियेला निरोप, मरिया अलीशिबा भेट, येशूचा जन्म आणि त्याचे बालपण ह्याचं सुंदर व जिवंत चित्रण लूकने आपल्या शुभवर्तमानात केले आहे. ह्या सर्व गोष्टी संत लूक मोठ्या कष्टाने त्या काळात उपलब्ध असलेल्या साक्षीदारांकडून गोळा केल्या. त्यापैकी एक साक्षीदार पवित्र मरिया असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संत लूकचे शुभवर्तमान पवित्र मरियेवर भर देते. त्याला पवित्र मरियेचे शुभवर्तमान असेही संबोधले जाते.
पुढे पौल रोम येथील तुरुंगात असताना संत लूक त्याच्याबरोबर होता. (कलस्सै ४: १४) त्याचवेळी त्याने ख्रिस्तसभेचा सांप्रत इतिहास लिहिला असावा. हा इतिहास प्रेषितांची कृत्ये या नावाने नव्या करारात समाविष्ट करण्यात आलेला आहे. संत पौलचा शिरच्छेद झाल्यानंतर संत लूक दल्मातिया (युगोस्लाव्हिया) येथे गेला आणि ग्रीसमध्ये त्याला रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. संत लूक हा वैद्य, कलाकार, मटण विकणारे, काचेचा व्यवसाय करणारे आणि लिपीक ह्यांचा आश्रयदाता संत मानला जातो.
✝️
ख्रिस्तसभा आज सुवार्तिक संत लूक ह्याचा सण साजरा करीत आहे. संत लुकने त्याच्या सर्व कलागुणांचा वापर करून ख्रिस्ताची देवराज्याची सुवार्ता घोषविली. आपण तीच प्रेरणा आज संत लूककडून घेऊ या. आपणही आपल्यातील सर्व कलागुणांचा योग्य तो वापर करून देवराज्य पसरविण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.
✝️
पहिले वाचन : २ तिमथी ४:१०-१७
वाचक : पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"लूक मात्र माझ्याजवळ आहे."
देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीका येथे गेला. क्रेस्केस गलतीया येथे आणि तीत दालमतिया येथे गेला. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्कला आपल्याबरोबर घेऊन ये, कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे. तुखिकाला मी इफिस येथे पाठवले आहे. माझा झगा त्रोवसात कार्पाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये आणि पुस्तके, विशेषकरून चर्मपत्रेही आण. आलेक्सांद्र तांबटाने माझे पुष्कळ वाईट केले, त्याची फेड त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रभू करील. त्याच्याविषयी तूही जपून राहा कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता. माझ्या पहिल्या जबानीच्या वेळेस माझ्या बाजूचा कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते. ह्याबद्दल त्यांचा हिशेब घेण्यात न येवो. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४५: १०-१३, १७-१८
प्रतिसाद : हे प्रभो, तुझे भक्त तुझ्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य जाहीर करतात.
१) हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणीमात्र स्तुती गातात,
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात
आणि तुझा पराक्रम कथन करतात.
२) ते तुझे पराक्रम आणि तुझ्या राज्याचे
वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस
जाहीर करतात. तुझे राज्य युगानुयुगे राहणारे राज्य आहे,
तुझा राज्याधिकार पिढ्यान्पिढ्या टिकणारा आहे.
३) परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे,
तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.
जे कोणी त्याचा धावा करतात,
जे मनापासून त्याचा धावा करतात, त्या सर्वांना तो समीप आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मी तुम्हांला निवडले आणि तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे
शुभवर्तमान लूक १०:१-९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत."
प्रभूने आणखी बहात्तर जणांना नेमून ज्या ज्या नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हांला मी पाठवत आहे, पाहा. पैशाची थैली, झोळी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे, 'ह्या घरास शांती असो,' असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खातपीत राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेलात आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हाला वाढतील ते खा. त्यात जे आजारी असतील त्यांना बरे कराआणि त्यांना सांगा की, 'देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.'
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आज आपण सुवार्तिक संत लूकचा सण साजरा करीत आहोत. संत लूकने आपल्यासाठी बायबलमधील दोन बहुमूल्य पुस्तकांचा संच अर्पण केला आहे. ती म्हणजे - संत लूक लिखित शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्ये.शुभवर्तमानातून संत लूक आपल्याला प्रभूयेशूख्रिस्ताच्या जीवनाचे दर्शन घडवतो व प्रेषितांची कृत्ये ह्यापुस्तकाद्वारे पहिल्या ख्रिस्ती समुदायाचे दर्शन देतो. परंपरेनुसार संत लूक हा अंत्युखियाचा मूळ रहिवाशी व एक मूळ चिकित्सक होता. तो संत पॉलचा विश्वासू सहकारी होता. म्हणून संत पॉल त्याला कलस्सैसकरांस पत्र ४:१४ मध्ये ‘आमचा प्रिय चिकित्सक' (किंवा प्रिय वैद्य लूक) असे उद्देशून म्हणतो. संत लूकचे शुभवर्तमान हे अद्वितीय मानले गेलेले आहे आणि त्याला अनेक उपशीर्षके देण्यात आलेली आहेतः दयेचे करुणेचे शुभवर्तमान, गरिबांची सुवार्ता, प्रार्थना व पवित्र आत्म्याचे शुभवर्तमान, आनंदाची सुवार्ता, सार्वत्रिक मुक्तीचे शुभवर्तमान इत्यादी. संत पॉलचे साथीदार म्हणून त्यांनी अनेक देशामध्ये फिरून येशूची सुवार्ता पसरविण्याचे कार्य केले. आपल्या लेखणीतून त्याने ख्रिस्ताला संपूर्ण जगभर प्रकट केले. माझ्या जीवनाद्वारे मी प्रभूयेशूला इतरांसमोर प्रकट करतो का ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, देवाचे राज्य या जगामध्ये यावे यासाठी माझा योग्य तो वापर कर आणि मला तुझी तारणदायी सुवार्ता पसरविण्याचे साधन बनव, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या