सामान्य काळातील
२९वा सप्ताह
१९ ऑक्टोबर २०२१
“ "देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.””
क्रूसभक्त संत पॉल
वर्तनसाक्षी (१६९४-१७७५)
व
संत आयझॅक आणि सहकारी
- रक्तसाक्षी (१६४९)
✝️
प्रभू येईल तेव्हा आपल्या प्रत्येक कृतीचा व घडलेल्या घटनांचा हिशोब घेणार आहे म्हणूनच जीवनात सतत जागृतीची आवश्यकता आहे. आपले मानवी जीवन क्षणभंगूर आहे. आपला श्वास, आपले विचार, आपले बोलणे, आपली कृती हे सर्व परमेश्वराच्या कृपनेच आपल्या जीवनात घडत असते. आपल्या जीवनाचा स्वामी परमेश्वर आहे म्हणूनच तो आपल्याला सावधान करुन सांगत आहे,
'तुम्ही सिद्ध असा,' कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. प्रभू येशू वैभवाने पुन्हा येणार असून सर्वांचा न्यायनिवाडा होणार आहे, अशी आपली ख्रिस्ती श्रद्धा आहे. 'प्रभू येशू ख्रिस्ताने घोषित केलेले देवराज्याचे कार्य विफळ होण्यासाठी सैतान सतत कार्यशील असतो' (१ पेत्र ५:८), म्हणूनच आपण सर्वदा जागृत राहून जीवन जगणे गरजेचे आहे.
प्रभू येशू मार्ग, सत्य, जीवन आणि प्रकाश आहे. त्याच्या दिव्य प्रकाशात चालत राहून आपण आपले जीवन आचरण करण्यास प्रेरणा मागू या. प्रभूच्या स्वर्गीय नंदनवनात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आपण जागृत राहून प्रभू समवेत प्रार्थना, मनन, चिंतन करु या. प्रभू म्हणतो, 'जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य.'
✝️
पहिले वाचन : रोम. ५:१२,१५,१७-२१
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“जर ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर जे कृपेच्या दानाची विपुलता स्वीकारतात, ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील."
एका माणसाच्या द्वारे जगात पाप शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेषकरून अधिक झाली. जर त्या एकाच इसमाच्याद्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे आणि नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झाली, जसे पापाने मरणाच्यायोगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करावे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४०: ७-१०, १७
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे.
१) यज्ञपशू आणि अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही,
पण ऐकायला तू माझे कान उघडले आहेस.
होम आणि पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस.
ह्यावरून मी म्हणालो, पाहा, मी आलो आहे.
२) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की,
हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे,
तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.
३) महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले.
हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही
हे तू जाणतोस.
४ )तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी
आनंद आणि उल्हास पावोत.
तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे
परमेश्वराचा महिमा वाढो, असे सतत म्हणोत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:३५-३८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य."
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही असा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हांला सत्य सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा जे त्याला असे आढळतील ते धन्य आहेत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात प्रभूयेशू आपल्या शिष्यांना सावध राहाण्याचे आवाहन करीत आहे. घरमालक आणि त्याचे चाकर ह्या दाखल्याद्वारे तो। आपल्याला तत्पर राहाण्याचे सांगत आहे. घरमालक आपल्या लग्नासाठी आपल्या वधूच्या घरी गेलेला आहे. त्याचे चाकर त्याच्या परत येण्याची वाट पाहात आहेत. परंतु तो कधी येईल हे त्यांना ठाऊक नाही म्हणून त्यांनी दक्ष राहिले पाहिजे. जेणेकरून आपला स्वामी दरवाजा ठोठावताच ते घराचे दार उघडून त्याचे स्वागत करू शकतील. हे दार ठोठावताच उघडतील अशा सेवकांना आशीर्वाद प्राप्त होईल व त्यांना धन्य म्हटले जाईल. परंतु धोका असा आहे की, वाट बघत असताना सेवक झोपी जाऊ शकतो आणि झोपणे म्हणजे दुर्लक्ष दर्शवते. ह्या दाखल्याद्वारे प्रभूयेशू स्पष्टपणे सांगत आहे की, अपेक्षेनुसार ‘परुसिया' म्हणजे प्रभूच्या गौरवाने परत येण्याची वाट बघत आहेत आणि त्याचे स्वागत करण्यासाठी तत्पर असतील अशा ख्रिस्तीजनांना येशूचा दिव्य आशीर्वाद प्राप्त होईल. प्रभू येशू पुन्हा येईल म्हणून त्याच्या स्वागतासाठी मी सज्ज आहे का ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, जीवनात सतर्क व जागृत राहून तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या