Marathi Bible Reading | Wednesday 20th October 2021 | 29th Week in ordinary Time |

   सामान्य  काळातील 

२९वा  सप्ताह 

२०ऑक्टोबर   २०२१ 

" ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागितले  जाईल.



संत बर्टिला बॉस्कार्डिन
- कुमारिका (१८८८-१९२२)

 ✝️  

प्रभू येशू ख्रिस्ताठायी आपल्या सर्वांना जीवनदायी नीतिमत्व आणि  कृपा प्राप्त झाली आहे. आपले जीवन देवाच्या कृपेत वाढत राहावे आणि फलदायी बनावे म्हणून देवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे अनेक वरदाने व कृपादाने आपल्याला दिली आहेत. आपल्या कृपादानांचा योग्य तो परिणाम आपल्या जीवनात दिसून यायला हवा म्हणून प्रभू येशू आपल्याला सतर्कतेचा इशारा देत आहे. देवाने आपल्या प्रत्येकाला आपल्या योग्यतेप्रमाणे कलागुण व वरदाने दिलेली आहेत. आपण त्यांचा योग्य तो वापर देवाच्या गौरवासाठी आणि परस्परसेवेसाठी करणे महत्वाचे आहे.
प्रभू येशू आज आपल्या प्रत्येकाला जागृत राहून आपल्या परमेश्वराठायी असलेल्या बांधिलकीची आठवण करून देत आहे. परमेश्वराने दिलेल्या विनामुल्य मात्र अनमोल दानांची परतफेड  आपल्याला करायची आहे.

प्रभू येशू आज स्पष्टपणे सांगत आहे की आपण जर देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलो नाही तर आपल्याला पुष्कळ फटके मिळतील. प्रभू  येशूने म्हटले आहे, 'मी तुम्हाला निवडले आहे व तुम्हाला नेमिले आहे ह्यात हेतू  | हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे' (योहान १५:१६). आपल्या कलागुणांचा व  धनसंपत्तीचा वापर देवाच्या कार्यासाठी कसा करता येईल ह्यावर आपण
अंतर्मुख होऊन चिंतन करु या.  

✝️

पहिले वाचन : रोम.  ६:१२-१८
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा."

तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. तुम्ही आपले अवयव अनीतीचे साधने होण्याकरीता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वत:स देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहा. म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.
तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! आज्ञा पालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःला गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहा. ते तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झाला, म्हणून देवाची स्तुती असो.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १२४: १-८

प्रतिसाद :   प्रभूच्या नामामुळे आमचा उद्धार होतो.

१) आता इस्राएलने म्हणावे की, 
जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, 
लोक आमच्यावर उठले तेव्हा, 
जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, 
तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला 
त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते.

२) जलांनी आम्हाला बुडवले असते, 
त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता, 
खळवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले अंसते. 
परमेश्वर धन्यवादित असो. 
त्याने आम्हांला त्यांच्या दाढांत भक्ष्य म्हणून पडू दिले नाही.

३) आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्याच्या 
पाशातून मुक्त झाला आहे.
खरोखर पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहो. 
आकाश आणि पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता 
परमेश्वर त्याच्या नावामुळे आमचा उद्धार होतो.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक   १२:३९-४८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभो, हा दाखला आपण आम्हालाच सांगता की, सर्वांना? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांस खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात ठरवून तो दास चाकरांना आणि चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल. मग तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याची जागा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, व ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अपेक्षिले जाईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनघरमालक आणि त्याचे सेवक ह्या दाखल्याद्वारे कोणत्या सेवकाला बक्षिस मिळेल आणि कोणास शिक्षा प्राप्त होईल ह्याचे स्पष्टीकरण प्रभूयेशू देत आहे. घरमालक बाहेरगावी असताना जे सेवक त्याच्या येण्याची आतूरतेने वाट पाहात आहेत व जागरूक आहेत अशा सेवकांची घरमालक घरी परतल्यावर प्रसंशा करील व त्याला बक्षिस देईल. जे सेवक घरमालक परगावी असताना त्याच्या येण्याची वाट न पाहता स्वतःच्या जीवनात रमून जातील अशा आज्ञाभंग करणाऱ्या सेवकांना स्वामी शिक्षा करील व त्यांना हाकलून देईल. तात्पर्य, पुन्हा एकदा प्रभूयेशूच्या परत येण्याशी निगडीत आहे. म्हणून जेव्हा प्रभूयेशू न्याय करण्यास पुन्हा येईल तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याचे स्वागत करण्यास जागरूक व सज्ज असले पाहिजे. येशू हा अचानक आणि अनपेक्षित पुन्हा येईल. म्हणून आपण आपल्या मनाची व आत्म्याची तयारी केली पाहिजे. प्रभूयेशू आपल्याला हाच उपदेश देत आहे की, आपल्यावर जे कार्य सोपवले आहे ते आपण चिकाटीपणाने केले पाहिजे. आपण आपली मने विचलित न होऊ देता कर्तव्यदक्ष असलो पाहिजे. जे विश्वासू आहेत त्यांना विशेष अधिकार व जबाबदाऱ्या देण्यात येतील व ज्यांनी दुर्लक्ष केले आहे त्यांच्याकडून सर्वकाही परत घेण्यात येईल. प्रभूच्या स्वागतासाठी मी कर्तव्यदक्ष जीवन जगत आहे का ?
प्रार्थना :-हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या सर्व कृपादानांबद्दल तुला धन्यवाद, तुझ्या इच्छेप्रमाणे फलदायी जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या