सामान्य काळातील
२९वा सप्ताह
२१ऑक्टोबर २०२१
“मी पृथ्वीवर आग पेटवण्यास आलो आहे. "
संत हिलेरियन महान
मठाधिकारी, वर्तनसाक्षी (२९१-३७१)
✝️
प्रभू येशूची शिकवण आचरणात आणणाऱ्यांमध्ये अशांतता प्रस्थापित होईल कारण खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याच्या परिशुध्दतेची आग लागलेली माणसे प्रभूला अनुसरतील. अग्नी म्हणजे देवाच्या समक्षतेचे प्रतिक आहे. अग्नी म्हणजे पारखणे, कारण देव न्यायाच्या दिवशी सर्वांना आपल्या जीवनाचा हिशोब द्यायचा आहे. ख्रिस्तामध्ये एकरूप होऊन त्याची सहभागिता अनुभवलेल्यांमध्ये आणि विश्वासहीन असलेल्यांमध्ये विवाद होऊन फूट पडण्याची शक्यता असते. आपण काळाची लक्षणे ओळखावी आणि ख्रिस्ताबरोबर ऐक्य साधावे म्हणून आज आवाहन करण्यात आले आहे.
‘पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे,' असा संत पौल आजच्या पहिल्या वाचनात बोध देत आहे. प्रभू येशू ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतलेल्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून आशीर्वादित केले आहे. तरीपण पापाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन देवाची मुले बनण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील बनले पाहिजे.
पवित्र आत्म्याच्या परिशुध्दतेची आणि अंतरात्म्यातील प्रेमाची आग आपल्यामध्ये प्रज्वलित व्हावी म्हणून आपण आज कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.
✝️
पहिले वाचन : रोम. ६:१९-२३
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
तुम्ही पापापासून मुक्त झाल्यामुळे देवाचे गुलाम झाला आहा.
तुमच्या देहस्वभावाच्या दुर्बलतेमुळे मनुष्यव्यवहाराप्रमाणे मी बोलत आहे. जरी तुम्ही आपले अवयव स्वैराचार करण्याकरिता अमंगळपण आणि स्वैराचार ह्यांना गुलाम म्हणून समर्पण केले होते पण आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्त्वाला गुलाम असे समर्पण करा.
तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्त्वासंबंधाने बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टीची तुम्हांला आता लाज वाटते त्यापासून तुम्हांला त्या वेळेस काय फळ प्राप्त होत असे?त्यांचा शेवट तर मरण आहे. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १: १-४,६
प्रतिसाद : जो मनुष्य परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो तो धन्य !
१ ) जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही,
पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि
निंदकांच्या बैठकीत वसत नाही.
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो,
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.
२) जर झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते,
जे आपल्याला हंगामी फळ देते,
ज्याची पाने कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा तो आहे आणि
जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.
३ ) दुर्जन तसे नाहीत,
ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत.
कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो,
पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:४९-५३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू म्हणतो, मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी नव्हे तर फूट पाडण्यासाठी आलो आहे.”
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी पृथ्वीवर आग पेटवायला आलो आहे. ती आतापर्यंत पेटली असती तर किती बरे होते! मला स्नानसंस्कार घ्यायचा आहे आणि तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे. मी पृथ्वीवर शांतता देण्यास आलो आहे असे तुम्हांस वाटते काय? मी तुम्हांस सांगतो, नाही, तर फूट पाडण्यास. आतापासून एका घरातील पाच जणांत दोघाविरुद्ध तिघे आणि तिघांविरुद्ध दोघे अशी फूट पडेल. मुलाविरुद्ध बाप आणि बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सुन अशी फूट पडेल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:आजचे शुभवर्तमान अनेकांना धक्कादायक व त्रासदायक वाटेल. प्रभूयेशू शांती ऐवजी अग्नीत भस्म करण्याच्या कठोर भाषेचा प्रयोग करीत आहे. अग्नी हा देवाचा न्याय जो आहे त्याचे चिन्ह म्हणून वापरण्यात आले आहे. जेव्हा पवित्र आत्माचा वर्षाव अग्नीच्या जिभांच्या रूपात प्रेषितांवर संचार करतो, त्या अग्नीद्वारे ते भस्म होत नाही किंबहुना पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांच्या आत्म्याचे शुद्धीकरण झालेले आहे. येशूचे शिष्य बनणे व त्याचे कार्य करणे म्हणजे वैरभाव व गैरवर्तन याला सामोरे जाणे असे आहे. येशूने स्वतः आपल्या जीवनात विरोध सहन केला आणि म्हणून येशूच्या शिष्यांना सुद्धा विरोध सहन करावा लागेल आणि अनेक वेळा स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींकडून ह्या विरोधाला त्यांना सामोरे जावे लागेल. येशू ह्या जगामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आला आहे परंतु ह्या तारण कार्यात विरोध होईल व त्याचा छळ केला जाईल तसेच त्याच्या शिष्यांनासुद्धा छळ आणि विरोध सहन करावा लागेल. येशूचे कार्य करत असताना इतरांकडून विरोध किंवा त्रास मला होत आहे का ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझी वचने ग्रहण करण्यास व तुझ्या प्रकाशात खरे जीवन आचरण करण्यास कृपा व प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या