सामान्य काळातील
२९वा सप्ताह
२२ऑक्टोबर २०२१
“काळाची लक्षणे आपण ओळखावी.”
संत पोप जॉन पॉल दुसरे
वर्तनसाक्षी
✝️
संत पौल आज विशेष रितीने आपण सर्वदा देवाच्या संकल्पाप्रमाणे जीवन जगावे म्हणून सल्ला देत आहे. आपल्या अंतःकरणात दैहिक आणि आध्यात्मिक भावनांचे जणू युध्द सुरु असते. चांगले करण्याचा विचार केला की आपल्यामध्ये असलेले दैहिक पाप स्वस्थ बसत नाही आणि जे चांगले ते कृतीत आणण्यास शक्य होत नाही. म्हणूनच संत पौल आपल्याला आठवण करून देत आहे की, देवाने त्याचा आत्मा आपल्यामध्ये घातला आहे. पवित्र आत्म्याची आराधना करुन जे चांगले, पवित्र आणि नैतिक त्याचा आपण स्वीकार करावा आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण आपले निर्णय घ्यावेत.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू काळाची लक्षणे आपण ओळखावीत आणि यथोचित चांगले काय आहे ते समजून घ्यावे म्हणून सल्ला देत आहे. आपण जर योग्यप्रकारे येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी केली नसेल तर आपला न्याय होणार आहे. आपण आपल्या जीवनातील सर्व चांगल्या तसेच अनिष्ट घटनांवर चिंतन करु या. सर्वदा चांगल्याचा ध्यास कसा घेता येईल ह्याचा विचार करु या.
आज आपण शरीराने, मनाने व आत्म्याने प्रभूला शरण जाऊ या. आपल्या संपूर्ण जीवनावर परमेश्वराला ताबा घेण्यासाठी विनंती करु या. जीवनात जे जे चांगले, न्याय, दैवी आणि पवित्र असेल त्याचा स्वीकार करण्यासाठी देवाकडे सद्सद्विवेक बुध्दीची प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन : रोम. ७:१८-२५
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?"
मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे ते मला साधत नाही. जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते.
तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो, तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. किती मी दुर्दैवी माणूस! ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून मला कोण सोडवील? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे आभार मानतो.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११९: ६६,६८,७६-७७
प्रतिसाद : प्रभो, तुझे नियम मला शिकव.
१) विवेकबुद्धी आणि ज्ञान मला दे,:
कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे.
तू चांगला आहेस, तू चांगले करतोस,
तुझे नियम मला शिकव.
२) तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार
तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे.
माझ्यावर करुणा करा म्हणजे मी जगेन.
कारण तुझे शास्त्र माझा पूर्णानंद आहे.
३) तुझे नियमशास्त्र मी कधीही विसरणार नाही,
कारण तू त्यांच्याद्वारे मला नवजीवन दिले आहेस,
मी तुझा आहे, माझे तारण कर,
कारण मी तुझ्या नियमशास्त्राचा आश्रय घेतला आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे,
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १२:५४-५९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, मग या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही.'
येशू लोकसमुदायांना म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून वर येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता, पावसाची सर येत आहे आणि तसे घडते, दक्षिणेचा वारा सुटतो तेव्हा कडाक्याची उष्णता होईल, असे तुम्ही म्हणता आणि तसे घडते. अहो ढोंग्यांनो, तुम्हांस पृथ्वीवरील आणि आकाशातील लक्षणांचा अर्थ लावता येतो, तर ह्या काळाचा अर्थ तुम्ही का लावत नाही ?
आणखी जे यथार्थ आहे ते तुम्ही स्वतःच का ठरवत नाही ? तू आपल्या वादयाबरोबर न्यायाधीशाकडे जाताना वाटेतच त्याच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न कर, नाहीतर कदाचित तो तुला न्यायाधीशाकडे ओढून नेईल आणि न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल आणि शिपाई तुला तुरुगांत टाकील. मी तुला सांगतो, पै न् पै फेडीपर्यंत तू तेथून सुटणार नाहीस..
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:आजचे शुभवर्तमान अनेकांना धक्कादायक व त्रासदायक वाटेल. प्रभूयेशू शांती ऐवजी अग्नीत भस्म करण्याच्या कठोर भाषेचा प्रयोग करीत आहे. अग्नी हा देवाचा न्याय जो आहे त्याचे चिन्ह म्हणून वापरण्यात आले आहे. जेव्हा पवित्र आत्माचा वर्षाव अग्नीच्या जिभांच्या रूपात प्रेषितांवर संचार करतो, त्या अग्नीद्वारे ते भस्म होत नाही किंबहुना पवित्र आत्म्याच्याद्वारे त्यांच्या आत्म्याचे शुद्धीकरण झालेले आहे. येशूचे शिष्य बनणे व त्याचे कार्य करणे म्हणजे वैरभाव व गैरवर्तन याला सामोरे जाणे असे आहे. येशूने |स्वतः आपल्या जीवनात विरोध सहन केला आणि म्हणून येशूच्या शिष्यांना सुद्धा विरोध सहन करावा लागेल आणि अनेक वेळा स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींकडून ह्या विरोधाला त्यांना सामोरे जावे लागेल. येशू ह्या जगामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी आला आहे परंतु ह्या तारण कार्यात विरोध होईल व त्याचा छळ केला जाईल तसेच त्याच्या शिष्यांनासुद्धा छळ आणि विरोध सहन करावा लागेल. येशूचे कार्य करत असताना इतरांकडून विरोध किंवा त्रास मला होत आहे का ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, जे जीवनासाठी यथार्थ व पोषक ते स्वीकारण्यास व सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून राहण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या