Marathi Bible Reading | Saturday 23rd October 2021 | 29th Week in ordinary Time |

      सामान्य  काळातील 

२९वा  सप्ताह 

२३ऑक्टोबर   २०२१ 

“तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हां सर्वांचा नाश होईल.”


संत जॉन कॅपिस्ट्रान

वर्तनसाक्षी (१३८६-१४५६)

 ✝️  

 आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू अंजिराच्या निष्फळ झाडाचा दाखला देऊन आपल्याला आपल्या जीवानाविषयी जाणीव करुन देत आहे. आपले जीवन परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे फलदायी होण्यासाठी आहे. जीवन फलदायी बनविण्यसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे यावर आपण चिंतन करु या.
परमेश्वराच्या दहा आज्ञा पाळल्याने आपण देवाचा व आपल्या परस्पर बंधुभिनींचा व माता-पित्यांचा योग्य तो सन्मान करतो, तसेच देवाबरोबर व परस्पर मानवांबरोबरचे संबंध सुधारित असतो. नैतिकता आपल्या प्रत्येकाला प्रामाणिकपणाने, संयमाने आणि नम्रतेने शुद्ध जीवन जगण्यास प्रवृत्त करते. देवाचे वचन आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे मार्गक्रमण करण्यास प्रेरणा देते. आपण अंतर्मुख बनून आपल्या जीवनावर विचार करु या . 
आपण देवाच्या कृपेला अपूरे पडतो कारण आपण देवाविरुद्ध आणि बंधुभगींनी विरुद्ध पाप करतो. आपल्याला पश्चात्तापाची व परिवर्तनाची गरज आहे. जीवन फलदायी बनविण्यासाठी संतपौल सांगतो त्याप्रमाणे आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावणे गरजेचे आहे. आपण आपल्या आचरणावर चिंतन व परीक्षण करुन घडलेल्या सर्व पापांबद्धल पश्चात्ताप करावा. चांगले पाप निवेदन करण्यास आपल्याला प्रेरणा लाभावी.म्हणून प्रार्थना करूया. 

✝️

पहिले वाचन : रोम.  ८:१-११
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन

 "ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा तुम्हांमध्ये वसती करतो." 
ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, कारण ख्रिस्तयेशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला शाप आणि मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने आणि पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दडांज्ञा ठरविली, ह्यात उददेश हा की, जे आपण देहस्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणांमध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. कारण जे देहस्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. देहस्वभावाचे चितंन हे मरण पण आत्म्याचे चितन हे जीवन आणि शांती आहे. कारण देहस्वभावाचे चितंन हे देवाबरोबर वैर आहे, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही.
परंतु तुम्हांमध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहा. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही; पण ख्रिस्त तुम्हांमध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जीवन आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हांमध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हांमध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र २४: १-६
प्रतिसाद :   प्रभो, हेच लोक तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत.

१) पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, 
जग आणि त्यात राहणारे सारे लोकही परमेश्वराचेच आहेत.
कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, 
त्यानेच जलप्रवाहावर तिला स्थिर केले.

२) परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल ?
 त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? 
ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, 
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो.

३) त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. 
आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. 
त्याला शरण जाणारे हेच लोक होत, 
हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले ते हेच. 


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, 
माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक   १३:१-९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"जर पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.'

त्याच वेळी तेथे असलेल्या काही जणांनी येशूला, ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञामध्ये मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले. मग त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ह्या गालिलकरांनी असे दुःख भोगले ह्यावरून बाकीचे सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हांला वाटते काय ? मी तुम्हांला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते येरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते. पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.
त्याने एक दाखला सांगितला कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अजिरांचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला. परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अजिरांच्या झाडावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी ? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज आणखी एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्याभोवती खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे प्रभूयेशू लोकसमुदायाला प्रायश्चित्त करण्यासाठी आग्रह करत आहे. आजच्या अंजिराच्या दाखल्यामध्ये द्राक्षमळ्याचा माळी झाडाच्या वतीने द्राक्षमळ्याच्या मालकाकडे मध्यस्थी करतो आणि झाडाला फळ प्राप्ती व्हावी म्हणून आणखी एक वर्ष द्यावे अशी विनवणी करतो. जमीन ही एक मौल्यवान नैसर्गिक संसाधन आहे म्हणून एका निष्फळ झाडाची जोपासना करणे व्यर्थ आहे. त्या जमिनीचा भाग जेथे फळे न देणारे झाड आहे त्या जमिनीचाही सदुपयोग होत नाही. म्हणून त्या निष्फळ झाडाला कापून फळ देणारे झाड हे फायदेशीर ठरेल. परंतु माळी मध्यस्थी करतो व आणखीन एका वर्षात त्या झाडाची देखरेख करून खतपाणी घालून, त्या झाडाला फळे प्राप्त होईल अशी मागणी करतो. दुसऱ्या वर्षी त्या झाडावर फळे आले नाहीत तर कापून टाकावे असा सल्ला द्राक्ष मळ्याच्या मालकाला देतो. मुद्दा हाच आहे की, वेळ कमी आहे. आपला न्याय होण्याआधी परमेश्वर आपल्याला शेवटची संधी देत आहे. म्हणून आपण प्रायश्चित्त करून नवीन जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी चांगले फळ देणारे झाड आहे का ?

प्रार्थना :- हे प्रभू येशू, सफलतेने जीवन जगण्यास आम्ही सर्वदा जागृत असावे व पश्चात्ताप करुन नुतनीकरण करावे म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या