सामान्य काळातील
३०वा रविवार
जागतिक मिशन रविवार
२४ ऑक्टोबर २०२१
"मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे."
✝️
यिर्मया पुस्तकातील आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर म्हणतो की सर्व प्रकारच्या लोकांना तो पृथ्वीच्या दिगंतापासून जमा करील. सर्व पांगळे, आंधळे आणि गरजवंतांना परमेश्वर सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ आणिल. परमेश्वराच्या ह्या आश्वासनाबद्दल जयघोष करण्याचे यिर्मयाने आवाहन । केले आहे. प्रभू येशूठायी परमेश्वराची ही योजना पूर्णत्वास आलेली आपण पाहतो.
आजच्या शुभवर्तमानातील आंधळा असलेला भिकारी खऱ्या अर्थाने प्रार्थना, विश्वास आणि परिवर्तनाचे चांगले उदाहरण आहे. येशू वाटेने जात आहे हे कळताच त्याने मोठ्या आवाजात विनंती केली, 'अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा.' त्याला लोकांनी अडथळा आणला परंतु त्याने प्रभूला साद घालणे बंद केले नाही. प्रभू येशू त्या आंधळ्यांची हाक ऐकून थांबला व त्याने आंधळ्या बार्तीमयला जवळ बोलाविले. आपण जर अविरतपणे प्रार्थना केली तर प्रभू ती ऐकतो. येशू बोलावित आहे हे समजताच तो आंधळा भिकारी आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे गेला ह्याचाच अर्थ त्याने गत जीवनाचा त्याग करून तो येशूजवळ गेला. तो म्हणाला, 'मला दृष्टी प्राप्त व्हावी.' जीवनात जे अतिमहत्वाचे आणि गरजेचे आहे तेच मागावे. त्याच्या विश्वासाची जणू कसोटी घेतली गेली आणि बार्तीमयला दृष्टी प्राप्त झाली. प्रभूने म्हटले, 'जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.'
✝️
पहिले वाचन : यिर्मया ३१:७-९
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आंधळे आणि पागळे ह्यांना मी समाधानाने परत आणीन."
परमेश्वर म्हणतो, याकोबविषयी आनंदाचा गजर करा, राष्ट्रांच्या अग्रेसराचा जयजयकार करा, घोषणा करा, स्तवन करा, आणि म्हणा, परमेश्वराने आपल्या लोकांचा, इस्राएलाच्या अवशेषाचा उद्धार केला आहे. पाहा, मी त्यांना उत्तरेच्या देशातून आणीन, त्यांना पृथ्वीच्या दिगंतापासून जमा करीन, त्यांच्यामध्ये आंधळे आणि पागंळे, गर्भवती आणि प्रसूतिवेदना लागलेल्या असतील, मोठ्या समुदायाने ते इकडे परत येतील. ते अश्रूपात करत येतील, ते विनंती करत असता मी त्यांस नेईन, ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन, कारण मी इस्राएलचा पिता आहे आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२६: १-६
प्रतिसाद : परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
१) सियोनातून धरून नेलेल्या लोकांना
जेव्हा परमेश्वराने परत आणले तेव्हा
आम्ही स्वप्नात आहो असे आम्हाला वाटले.
तेव्हा आमचे मुख हास्याने आणि
आमची जीभ जयघोषाने भरली.
२) अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की,
परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.
हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे
३ )आम्हाला बंदिवासातून परत आण.
जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात
ते हषीने कापणी करतील.
४) जे पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतात
ते खात्रीने आनंद करत आपल्या पेंढ्या घेऊन येतील.
दुसरे वाचन इब्री ५:१-६
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.
प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरिता नेमलेला असतो. म्हणून त्याने दाने आणि पापाबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी. अज्ञानी आणि बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलतेने वेष्टीलेला आहे आणि ह्या दुर्बलतेने त्याने जसे लोकांसाठी तसे स्वतःसाठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो.
त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वत:ला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की,
“तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे.” त्याने त्याला गौरविले. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीहीतो म्हणतो,
“मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुगे याजक आहेस.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
शुभवर्तमान मार्क १०:४६-५२
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी."
येशू, त्याचे शिष्य आणि लोकसमुदाय यरिहो सोडून जात असता, तिमयाचा मुलगा बार्तीमय हा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नाझरेथकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला, "अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा ! तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा! “ तेव्हा येशू थांबून म्हणाला, "त्याला बोलवा. मग ते त्या आंधळ्याला बोलावून म्हणाले, "धीर धर, ऊठ तो तुला बोलावत आहे. “ तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे आला. येशू त्याला म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे ? “आंधळा त्याला म्हणाला, “गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी ." येशू त्याला म्हणाला, "जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. “ तेव्हा तात्काळ त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:माणसाच्या जीवनात चढउतार नेहमी येत असतात. पडझड झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या उमेदीने तो कामाला लागतो. इस्राएली लोकबाबिलोनच्या हद्दपारीत गेल्यानंतर जेरुसलेममध्ये केवळ दुबळे, व्यंग, निराधार लोक मागे राहिले. आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा त्यांच्यासमोर एका नव्या विश्वाचे चित्र उभे करतो. सर्वकाही पूर्वपदावर येईल अशी आशा त्यांच्यात उत्पन्न करतो. दुसऱ्या वाचनात ही भाकीत पूर्णत्वास जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक बनून आला असे आपल्याला सांगितले जाते तर शुभवर्तमानात ही नूतनीकरणाची एकंदरीत प्रक्रिया यरिहो येथील बार्तीमय नावाच्या एका आंधळ्याला दृष्टीदान देऊन येशू कशी पूर्णत्वास नेतो त्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. या प्रक्रियेचे एकूण तीन टप्पे आहेतः
१) येशूने यरिहोत प्रवेश केला : येशू आपल्या दुःखसहन मरण प्रक्रियेतून जाण्याच्या हेतूने जेरुसलेमला पुनरुत्थानाच्या निघालेला आहे त्यासाठी तो यरिहोतून जात आहे. एकंदर चमत्कारकथेचे मुख्य पात्र म्हणून सर्वघडामोडींवर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे.
२) आंधळ्या बार्तीमयचा संघर्ष : येशू नाझरेथकर जवळून जात आहे हे फक्त ऐकून आंधळा बार्तीमय त्याच्याकडे दयेची याचना करतो. त्याला दृष्टी नव्हती परंतु श्रवणशक्ती (कान) आणि वाचा (तोंड) होते. येशू नाझरेथकर हाच दाविदाचा पुत्र (मशिहा) आहे असा तर्क करणारी बुद्धी व श्रद्धा होती. मात्र त्याच्यापुढे लोकसमुदायाचा मोठा अडथळा होता. लोकांनी त्याला गप्प राहण्यास सांगूनही तो आपला संघर्ष पुढे सुरूच ठेवतो.
३) नवजीवनाची पहाट : मुंगीच्या पावलांचा आवाज ऐकणारा परमेश्वर (येशू) आंधळ्या भक्ताची आर्त किंकाळी ऐकून थांबतो. त्याच्या मार्गातील अडथळा (लोक) आता साधन बनतात. तेच त्याला धीर देतात. येशू त्याला दृष्टी देतो. येशूला भेटण्यापूर्वी तो आंधळा होता, भिकारी होता,रस्त्याच्या कडेला बसला होता. येशूची भेट झाल्यानंतर त्याला दृष्टी आली, त्याने भीक मागणे सोडून दिले (आपले वस्त्र टाकून दिले) तो रस्त्यावर येशूच्या मागोमाग चालू लागला.
आत्मपरीक्षण : प्रतिकूल परिस्थितीत असताना माझ्या जीवनात सर्वकाही पूर्वपदावर येईल ही आशा मनी बाळगण्यात कोणकोणते अडसर आहेत? माझ्या जीवनातील आंधळेपणाची मला जाणीव आहे का ? मी रस्त्याच्या कडेला आहे की मुख्य प्रवाहात आहे ?
प्रार्थना :- हे प्रभू येशू, माझी श्रद्धा बळकट व्हावी, तुझ्या वचनाप्रमाणे मी जीवन जगावे म्हणून मला कृपाशक्ती बहाल कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या