Marathi Bible Reading | Saturday 25th September 2021 | 25th Week in ordinary Time

  सामान्य 

काळातील 

पंचविसावा सप्ताह 

शनिवार 

२५ सप्टेंबर २०२१




संत सेओलफ्रिड
मठाधिपती, वर्तनसाक्षी (६४२-७१६) 

  ✝️  

“मनुष्याच्या पुत्राला, लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. "

प्रभू येशू ख्रिस्त सर्वांसाठी परिपूर्ण आणि कृपेने भरलेले जीवन देण्यासाठी आला होता. परंतु  त्यासाठी प्रभूला क्रुसावरील मरणाला सामोरे जावे लागणार होते. प्रभू येशू शिष्यांना आपल्या स्वतःच्या मृत्युविषयीचे भाकित सांगत आहे, शिष्यांना प्रभूच्या दुःख सहन व मरणाचे रहस्य समजणे कठीण जात होते. मात्र देवपित्याच्या योजनेप्रमाणे दुःख सहन, मरण व  पुनरूत्थान ह्या घटनांमुळेच तारण कार्य पूर्णत्वास जाणार होते. पुनरूत्थानामुळेच ख्रिस्ती श्रद्धा आज बहरत आहे व युगाच्या समाप्तीपर्यंत पसरणार आहे. आपणा सर्वांना सर्वकाळचा आनंद मिळावा म्हणूनच प्रभूने आपल्याला आत्मबलिदान, त्याग, प्रेम व सेवेचा मार्ग दाखविला आहे. प्रभू येशूच्या वचनांवर श्रद्धा ठेवून आपण त्याच्या पुनरागमनाची वाट पाहू या, कारण प्रभू आपल्या सर्वांमध्ये वस्ती करण्यासाठी येणार आहे. 
✝️
पहिले वाचन : जखऱ्या २ :१,५-१०-११

वाचक :जखऱ्या या पुस्तकातून घेतलेले वाचन

“मी येईन नि तुझ्यात वस्ती करीन."

जखऱ्या म्हणाला, “मी आपले डोळे वर करून पाहिले तो पाहा, एक मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन उभा आहे. तेव्हा मी विचारले, तू कोठे जात आहेस?" तो मला म्हणाला, 'तू “येरुशलेमचे माप घेण्यास म्हणजे त्याची लांबी रुंदी पाहण्यास मी जात आहे.” आणि पाहा माझ्याबरोबर भाषण करणारा देवदूत जाऊ लागला तेव्हा दुसरा देवदूत त्याला भेटायला आला. तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणाला असे सांग, येरुशलेममध्ये माणसे आणि गुरेढोरे फार झाल्यामुळे भिती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन आणि तिच्या ठायी मी तेजोरूप होईन.”
हे सियोनकन्ये, जयजयकार आणि उल्हास कर, कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील आणि प्रजा बनतील.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  यिर्मया ३२:१०-१३

प्रतिसाद :परमेश्वर मेंढपाळाप्रमाणे त्यांची देखभाल करील.

१) अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका, 
दूरच्या द्वीपात हे प्रसिद्ध करा 
आणि म्हणा, ज्याने इस्राएलला विखुरले.
तो त्यांना जमा करील. 
मेंढपाळ आपल्या कळपाची जशी देखभाल 
करतो तशी तो त्यांची देखभाल करील.

२) कारण परमेश्वराने इस्राएलचा उद्धार केला आहे 
आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या
 हातून त्याला मुक्त केले आहे. 
ते येऊन सियोनच्या टेकड्यांवर आनंदाने गातील, 
परमेश्वराची उपयुक्त वरदाने त्यांच्याकडे लोटतील.

३) त्या समयी कुमारिका आनंदाने नृत्य करतील, 
वृद्ध आणि तरुण एकत्र आनंद करतील, 
मी त्यांच्या शोकाचे आनंदात रूपांतर करीन, 
मी त्यांचे सांत्वन करीन, त्यांच्या दुःखाचे रूपांतर आनंदात करीन.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे,
म्हणून पित्याने स्वत:च्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला.
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक  ९:४३-४५

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे, या गोष्टींविषयी त्याला विचारायला ते भीत होते. "

येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. ही गोष्ट त्यांना समजली नाही. ती त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ती गुप्त ठेवण्यात आली होती आणि ह्या गोष्टींविषयी त्याला विचारायला ते भीत होते.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: "मी येरुशलेमच्या ठायी तेजोरूप होईन. म्हणून उल्हास कर, कारण मी तुझ्यात वस्ती करीन.” संदेष्टा जखऱ्याच्या मुखाने यहूदी लोकांना सेनाधीश परमेश्वर धीर देत आहे. जगभरात पसरलेले देवाचे लोक येरुशलेम नगरीस परत येतील असे आनंदाचे वर्तमान संदेष्टा सांगत आहे. शुभवर्तमानात मानवपुत्र ख्रिस्ताच्या सहवासात प्रेषित भारावून जातात. त्याचे अलौकिक शब्द व चमत्कार याद्वारे त्यांना आनंद होतो. परंतु ख्रिस्त त्यांना पुढे येणाऱ्या मानहानीची व संकटाची जाणीव करून देतो. मानवपुत्र शत्रूच्या हाती धरून दिला जाईल व तो क्रुसावरचं मरण स्वीकारील ही गोष्ट शिष्यांना समजणे कठीण होते. पण हीच मानव पुत्रासंबंधी देवपित्याची मुक्ती योजना होती हे त्यांना पुढे घडणाऱ्या घटनांद्वारे समजणार होतं. सुवार्तेनुसार जीवन जगण्यास व ख्रिस्ताचं अनुकरण करण्यास लागणारे धैर्य व कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझी तारणदायी योजना व जीवनाची रहस्ये जाणण्यास व  तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन आचरण करण्यास कृपा दे, आमेन.

✝️

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या