सामान्य
काळातील
पंचविसावा सप्ताह
शुक्रवार
२४ सप्टेंबर २०२१
दयामाता सण
संत पीटर नोलास्को, पेन्याफोर्टचे संत रेमंड आणि अॅरागॉनचा राजा जेम्स ह्यांनी इ.स. १२३३ साली बार्सेलोना (स्पेन) येथे स्थापन केलेल्या 'दयामाता संघा'ने सारासेनच्या गुलामगिरीतून ख्रिस्ती गुलामांना मुक्त करण्याचे प्रेषितकार्य सुरू केले. त्यासाठी लागेल ती खंडणी या संस्थेतील धर्मगुरू व धर्मबंधू स्वकष्टाने मिळवून देत असत. त्यांनी पवित्र मरियेच्या सन्मानार्थ हा सण साजरा करण्यास सुरुवात केली.
हळूहळू फ्रान्स आणि स्पेन देशांनी हा सण साजरा करण्यास प्रारंभ केला व शेवटी पोप इनोसंट तेरावे ह्यांनी १६९६ साली संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेने सदर सण साजरा करावा अशी अधिकृत घोषणा केली. वसईतील मर्सेस या ठिकाणी मर्सेस माऊली (दयामाता) चे चर्च आहे व सप्टेंबर महिन्याच्या शेवटी दयामातेचा सण तिथे साजरा केला जातो.इंग्लडच्या परिवर्तनासाठी आणि चुकीच्या धार्मिक शिकवणुकीपासून भाविकांचे संरक्षण व्हावे म्हणून दयामातेचा धावा केला जातो. सैतानाच्या विषारी तावडीतून पाप्यांची सुटका व्हावी, शुद्धीस्थानातील आत्म्यांचे तारण व्हावे म्हणून देखील पवित्र मरियेकडे मध्यस्थीची याचना केली जाते.
✝️
'तू देवाचा ख्रिस्त आहेस. "
परमेश्वर आपल्या निवडलेल्या प्रजेची काळजी घेतो व संरक्षण करतो. , 'यहोशवाने हिम्मत धरून परमेश्वराचे मंदिर बांधावे.' परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे व परमेश्वराचा आत्मा त्यांच्याठायी कायम आहे अशी शाश्वती स्वतः परमेश्वर त्यांना देत आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना दोन प्रश्नविचारीत आहे. पहिला प्रश्न, 'लोक मला कोण म्हणून म्हणतात ?' दुसरा प्रश्न विचारला की, 'तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?"अशावेळी केवळ पेत्राने उत्तर दिले की, 'तू देवाचा ख्रिस्त आहेस. 'ह्याचाच अर्थ देवापासून प्रत्यक्ष आलेला तारणारा प्रभू. सामान्य माणसांना ख्रिस्ताविषयी माहिती असतेच मात्र ख्रिस्ती माणसांना प्रभू वैयक्तिक प्रश्न विचारत आहे, 'तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?' आपल्याला प्रभू येशूविषयी सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.
प्रभू येशूने विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावर आपण आज चिंतन करू या. बालपणापासून आत्तापर्यंत आपण बाप्तिस्मा, प्रायचित्त, ख्रिस्तशरीर, दृढीकरण, विवाह संस्कार किंवा दीक्षा व व्रत विधी स्वीकारलेले आहेत. अती पवित्र अशा प्रत्येक कृपा संस्कारात प्रभू येशू कोण आहे ह्याची ओळख आपल्याला झाली आहे का? आपल्या दैनंदिन जीवनात प्रभू येशूचा कोणता अनुभव आपल्याला आला आहे? येशू आपल्यासाठी कोण आहे ?
पहिले वाचन : हाग्गय २ : १-९
वाचक :हाग्गय या पुस्तकातून घेतलेले वाचन
लवकरच मी हे मंदिर वैभवाने भरीन.
दारियस राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे " आता यहुदाचा प्रांताधिकारी शल्तीएल याचा पुत्र जेरुब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक याचा पुत्र यहोशवा आणि शिल्लक राहिलेले लोक यांना असे विचार: “ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हांला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? हे जेरुब्बाबेल, हिम्मत धर, असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका, यहोसादाकच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा आणि कामास लागा, मी तुम्हांबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही इजिप्त देशातून निघाला तेव्हा तुम्हाबरोबर केलेला करार कायम आहे आणि माझा आत्मा तुमच्या ठायी कायम आहे, तुम्ही भिऊ नका. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन ही हालवून सोडीन, मी सर्व राष्ट्रांना हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांचा इच्छाविषय या मंदिरात येईल आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी या स्थळाला शांती देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४३:१-४
प्रतिसाद :माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्याच्यावर मी भाव ठेवीन.
१) हे देवा, माझा न्याय कर,
भक्तिहीन राष्ट्रांशी माझ्या बाजूने लढ.
कपटी आणि कुटील
मनुष्यांपासून मला मुक्त कर.
२)कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस,
तू माझा त्याग का केलास?
वैऱ्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे ?
३) तू आपला प्रकाश आणि आपले सत्यप्रकट कर,
ती मला मार्ग दाखवोत.
तुझ्या पवित्र पर्वतावर,
तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवोत.
४) म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो
माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन आणि
हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे, ते मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे.
शुभवर्तमान लूक ९:१८-२२
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तू देवाचा ख्रिस्त आहे. मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी ह्याचे अगत्य आहे."
येशू एकांती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात ?" त्यांनी उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलिया आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे. त्याने त्यांना म्हटले, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?" पेत्राने उत्तर दिले, "देवाचा ख्रिस्त." मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: संदेष्टा हाग्गय, बाबिलोनच्या हद्दपारीतून स्वदेशास परतलेल्या यहुदी लोकांना सेनाधीश परमेश्वराचे वचन सांगत आहे. तुम्ही संख्येने कमी आहात. पण परमेश्वर तुम्हाबरोबर आहे. म्हणून हिम्मत धरा व मंदिराची पुन्हा बांधणी करण्यास तयार व्हा. “भिऊ नका, देवाने तुमच्या पूर्वजाबरोबर केलेला करार कायम आहे. मी तुम्हाला शांतीचे राज्य देईन.” देवाच्या या वचनाची ख्रिस्ताद्वारे पूर्तता झाली आहे असे संत लूक शुभवर्तमानात सांगत आहे. “गुरुवर्य, तू ख्रिस्त म्हणजे जिवंत देवाचा पुत्र आहेस. तुझ्याठायी सर्वसमर्थ देवाचे वचन पूर्ण होत आहे.” पेत्राप्रमाणे आम्हालादेखील ख्रिस्त हा मशिहा म्हणजे तारणारा आहे ह्याचा अनुभव यावा म्हणून प्रार्थना करू या.
प्रार्थना :हे प्रभू येशू, माझ्या वैयक्तिक जीवनात मी तुला सर्वार्थाने ओळखावे व तुला अनुसरावे म्हणून मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या