सामान्य
काळातील
पंचविसावा सप्ताह
गुरुवार
२३ सप्टेंबर २०२१
संत पीएटरेलसीनं पीओ
✝️
हाग्गाय संदेष्टा देवाच्या मंदिरापासून बहकलेल्यांना मार्गस्थ होण्यासाठी पाचारण करीत आहे. आपण करीत असलेल्या कार्यात सफलता नाही असे आढळल्यास आपण परमेश्वरापासून दूर आहोत किंवा आपल्या जीवनाचा मार्ग देवाच्या मार्गापासून बहकलेला आहे, असे समजायला हरकत नाही. म्हणूनच संदेष्टा हाग्गय म्हणतो, 'तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष द्या.'
आज आपल्या जीवनावर चिंतन करु या. आपण देवापासून दूर गेलो आहोत देवाला, त्याच्या शब्दाला व प्रार्थनेला आपल्या जीवनात कोणते स्थान आहे? आपले जीवन आचरण, आपण करीत असलेले कार्य व आपण अवलंबलेला जीवनाचा मार्ग आपल्याला देवाच्या सहवासात घेऊन जातो का ? आपल्यामध्ये जर देवा विषयी अज्ञान असेल तर जीवनातील अनेक घटनांचा उघगडा आपल्याला होत नाही. म्हणुनच वेळ असेल तेव्हा बायबल वाचन, संत चरित्र वाचन करावे. देवाचे ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळत असल्यास त्याचा फायदा घ्यावा. जीवनातील कठीण प्रसंगी प्रभूला शोधण्यासाठी नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल.
देवाची कृपा आणि त्याचा सहवास लाभावा, म्हणून पवित्र मंदिरात जाऊन वेळीवेळी पवित्र संस्कारातील प्रभू येशूला आपल्या अंतःकरणात स्वीकारु या. आपल्याला मिळलेल्या असंख्य कृपादानाबद्दल परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ या.
✝️
पहिले वाचन : हाग्गय १ : १-८
वाचक :हाग्गय या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मंदिर पुन्हा बांधा, त्याने मी प्रसन्न होईन."
दारियस राजाच्या कारकिर्दीत दुसऱ्या वर्षी, सहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शल्तीएल याचा पुत्र जेरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यांला हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : "सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही." तेव्हा परमेश्वराचे वचन हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले ते असे: "इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही, मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो."
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, “तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा आणि मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईन आणि माझा महिमा प्रकट करीन, असे परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १५०:१-९
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.
१). परमेश्वराचे स्तवन करा.
नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा,
भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो.
सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हासोत.
२) ती नृत्य करीत त्याच्या नामाचे स्तवन करोत,
डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.
कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.
तो नम्रजनांना तारणाने सुशोभित करतो.
३) भक्त गौरवामुळे उल्हासोत,
ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो,
जे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल.
परमेश्वराचे स्तवन करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्याद्वारे जीवन मिळवून दिले.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ९:७-९
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण ?"
घडत असलेल्या सर्व गोष्टीविषयी मांडलिक हेरोदने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक म्हणत होते, कित्येक एलिया प्रकट झाला आहे असे म्हणत होते आणि कित्येक प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता..
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: हाग्गय संदेष्टा हद्दपारीतून परतलेल्या यहूदी लोकांना देवाचं वचन सांगत आहे. तुम्ही अनैतिक मार्गाने वागलात तर तुम्हांला सुखाने झोप येणार नाही. तुमचे मन सदैव अस्वस्थ राहील. येरुशलेमचे मंदिर बांधा व एकत्र येऊन देवाचे वचन ऐका. शुभवर्तमानात मांडलिक हेरोद राजा भयभीत झाला आहे. त्याने निरपराध योहान बाप्तिस्ताचा शिरच्छदे केला. त्याने नीतिभ्रष्ट असे वैवाहिक जीवन स्वीकारले. संत पॉल आम्हाला आठवण करून देत आहे की, “तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचे मंदिर आहे." अयोग्य व भ्रष्ट जीवनाद्वारे ते भ्रष्ट होऊ देऊ नका. हे प्रभू येशू, शरीरुपी मंदिराचा योग्य सन्मान राखून, तुझ्या वचनानुसार वागण्याची सुबुद्धी आम्हाला दे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच मार्ग व जीवन आहेस, आम्हाला तुझ्या वचना प्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या