सामान्य
काळातील
पंचविसावा सप्ताह
बुधवार
२२ सप्टेंबर २०२१
'प्रभू येशूने त्यांस सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. "
संत थॉमस विलानोव्हा
महागुरू, वर्तनसाक्षी (१४८८-१५५५)
✝️
देवाचे राज्य भूतलावर प्रस्थापित करणे म्हणजे सर्वत्र प्रेम, शांती, परोपकार, दया व समेटाचे वातावरण असायला हवे. त्याचप्रमाणे देवराज्यात कोणीही दुःखी, कष्टी आणि व्याधीग्रस्त व भूतग्रस्त असू नये. अशा स्वर्गीय आनंदाचा अनुभव सर्वांना मिळावा म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांना निवडले व प्रथम त्यांना देवराज्याचा अनुभव दिला.
बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येक माणसाला प्रभू येशू तेच सामर्थ्य व अधिकार देऊन आज देवाची व सुवार्तेची साक्ष देण्याकरिता पाचारण करीत आहे. देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला तारणाचे साधन बनवू इच्छित आहे.
प्रार्थना, तप साधना व प्रभू वचनांचे प्रशिक्षण घेण्यासाठी ख्रिस्तसभा प्रत्येकाला पाचारण करीत असते. इशज्ञानाचे व बायबलचे प्रशिक्षण घेण्यासाठी व देवराज्याची साक्ष देण्यासाठी ख्रिस्तसभा सुद्धा आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे. आज समाजातील गरिब, दुःखी, कष्टी, आजारी आणि भयग्रस्त व निराश माणसांना आपल्या सहकार्याची गरज आहे. प्रभू येशू बोलावित आहे. प्रभूवरील आपला विश्वास दृढ बनवून आपण त्याचे खरे अनुयायी बनण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन : एज्रा ९ : ५-९
वाचक :एज्रा या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही. "
उपोषण केलेला, वस्त्र आणि झगा फाडलेला, अशा स्थितीत मी एज्रा, संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो, “हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत. आणि आमचे दोष वाढून गगनाला जाऊन पोहोचले आहेत. आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहो आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही आमचे राजे आणि आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट आणि लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहो, आज आमची स्थिती अशीच आहे. पण सांप्रतथोडे दिवस आमचा देव परमेश्वर याने आम्हांवर अनुग्रह केला आहे. आमच्यातले थोडेसे लोक बचावून शिल्लक ठेवले आहेत आणि आम्हांला त्याच्या पवित्रस्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे, आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत आणि आमच्या दास्यात आम्हांला थोडेसे नवजीवन मिळाले आहे. आम्ही दास तर आहोच, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही, उलट त्याने पारसदेशीय राजांच्याद्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, यासाठी की, आम्ही नवजीवित होऊन आपल्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी आणि यहुदा व येरुशलेम यांमध्ये आम्हांला आश्रयस्थान मिळावे."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र तोबीत १३:२,४,६,७,८
प्रतिसाद : परमेश्वराला धन्यवाद असो.
१) परमेश्वर शिक्षा करूनदेखील दया दाखवतो,
तो मनुष्यांना अधोलोकांत पाठवतो
आणि सर्व हानीपासून त्यांचा बचाव करतो.
त्याच्या हातून कोणी सुटू शकत नाही.
२) तोच आम्हांला त्यांच्यात पसरवतो.
त्यांच्यामध्ये आपण त्याचा महिमा दाखवू या
आणि सर्व जिवंतांमध्ये त्याचा महिमा गाऊ या.
कारण तोच आपला प्रभू परमेश्वर आहे,
तोच अनंत काळचा आपला पिता आणि देव आहे.
३) आता आपल्यासाठी त्याने जे काय केले.
त्याचा विचार करून त्यासाठी उंच स्वरात
त्याला धन्यवाद द्या. युगानुयुगे राजाची स्तुती
करून अनंतकाळ देवाला धन्यवाद देऊ या.
४) मी या निर्वासित जमिनीवर असता
त्याला धन्यवाद देईन मी पापी लोकांच्या समोर
त्याचे सामर्थ्य आणि महिमा दाखवीन.
५) अहो पापी लोकांनो, त्याच्याजवळ परत या,
त्याच्यासमोर चांगले आचरण करा.
कुणास ठाऊक, कदाचित तो तुम्हांला
दयादृष्टी दाखवील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देवाने आपल्याला सुवार्तेच्याद्वारे आपल्या
प्रभू येशु ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ९:१-६
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि रोग्यांना बरे करण्यास पाठवले. "
येशूने बारा प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भुते काढण्याचे आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि रोग्यांना बरे करण्यासाठी पाठवले. त्याने त्यांना सांगितले, प्रवासासाठी काही घेऊ नका, काठी, झोळी, भाकरी किंवा पैसा घेऊ नका, अंगरखे दोन दोन घेऊ नका. ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा आणि तेथूनच निघून जा. जे कोणी तुमचे स्वागत करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध साक्ष व्हावी म्हणून त्या गावातून निघतेवेळेस आपल्या पायांची धूळ झाडून टाका. मग ते निघून सर्वत्र सुर्वाता सांगत आणि रोगी बरे करत गावोगावी फिरू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:बाबिलोनमध्ये हद्दपार झालेले यहूदी लोक जेरुसलेमला परत आले तेव्हा त्यांच्यामध्ये एज्रा व नेहेम्या या संदेष्ट्यांना देवाने पाठविले. देवाने यहूदी राष्ट्राला दिलेला करार त्यांनी मनःपूर्वक पाळावा. त्यांनी नवजीवित होऊन देवाचे मंदिर उभारावे. त्याद्वारे देवाच्या कृपादृष्टीचा लाभ घ्यावा यासाठी एज्रा संदेष्टा मनोभावे प्रार्थना करीत आहे. नव्या करारात परमेश्वराच्या वचनाची पूर्तता झाली. प्रभू ख्रिस्ताने देवराज्याची घोषणा केली. या मिशनकार्यात सहभागी होण्यासाठी प्रेषितांना निवडले. देवाच्या अनंत दयेने आम्हीदेखील या प्रेषितकार्यात सहभागी झालो आहोत. शब्दाने व कृतीने आम्ही सुवार्ता पसरावी. पीडीत व दुर्बल बंधुजनांना सर्वतोपरी सहाय्य करावे. हे प्रभू येशू, प्रेषितकार्यात समरस होण्यासाठी कृपा आम्हाला दे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, देवराज्याच्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन,
✝️

0 टिप्पण्या