सामान्य
काळातील
पंचविसावा सप्ताह
सोमवार
२० सप्टेंबर २०२१
"उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही."
संत अँड्रूयू कीम, पॉल कॉंग आणि सहकारी
कोरीयाचे रक्तसाक्षी (१८३९, १८४६, १८६२, १८६७)
✝️
यिर्मयाला प्राप्त झालेल्या परमेश्वराच्या वचनाने पारसाचा राजा कोरेश ह्याला स्फूर्ति मिळाली. कोरेश राजाने येरुशलेमेत देवाचे मंदिर बांधण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. राजाचे आवाहन स्वीकारुन यहुदा व बन्यामीन कुळातील त्याचे प्रमुख, याजक व लेवी ह्यांनी ते आवाहन स्वीकारले. सर्वांनी स्वसंतोषाने सोने, चांदी, सामानसुमान, पशू व मौल्यवान वस्तु देऊन देवाचे मंदिर बांधण्यास सहकार्य केले.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू दिव्यावरुन धडा देऊन आपला जीवनरुपी दिवा सतत तेवत राहावा, आपल्या प्राप्त सर्व दानांचा उपयोग स्वतः बरोबरच इतरांच्या भल्यासाठी आणि विशेषतः देवाच्या गौरवासाठी करावा, असे आवाहन प्रभू येशू आपल्या सर्वांना करीत आहे. आपल्याला मिळालेले देवाचे दान इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आहे. आपण आज आपल्या जीवनावर चिंतन करु या. देवाने आपल्याला कोणत्या कलागुणांनी आणि वरदानांनी भरलेले आहे ? आपल्यातील हे कलागुण व वरदाने गुप्त न ठेवता त्यांचा वापर झाला पाहिजे.
प्रभू येशू पुढे म्हणत आहे, ‘उघकीस येणार नाही असे काही गुप्त नाही.' परमेश्वर सर्वज्ञ आहे. त्याला आपला प्रत्येक विचार आणि आपल्या प्रत्येक कृतिची जाणीव आहे. आपण परमेश्वरापासून कोणतीच गोष्ट गुप्त आणि लपवून ठेवू शकत नाही. म्हणूनच देवाच्या गौरवासाठी, ख्रिस्त सभेच्या आणि बंधु-भगिनींच्या कल्याणासाठी सहकार्य करण्यास प्रेरणा मिळावी, म्हणून प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन : एज्रा १:१-६
वाचक : एज्जा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुमच्यामध्ये देवाच्या सर्व लोकांपैकी जो कोणी असेल त्याने यहुदातील येरुशलेमला जावे."
यिर्मयाच्या मुखाने प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन सिद्धीस जावे म्हणून पार्शियाचा राजा सायरस याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने ह्या राजाच्या मनाला स्फूर्ती दिली, तेव्हा त्याने आपल्या सर्व राज्यात जाहीर केले आणि लेखी फर्मानही पाठवले ते असे: “पार्शियाचा राजा सायरस असे म्हणतो, स्वर्गीचा देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली असून अशी आज्ञा केली आहे की यहुदा प्रांतातील येरुशलेममध्ये माझ्या प्रीत्यर्थ एक मंदिर बांध. त्याच्या सर्व लोकांपैकी जो कोणी तुमच्यामध्ये असेल त्याबरोबर त्याचा देव असो. त्याने यहुदातील येरुशलेममध्ये जाऊन इस्राएलचा देव परमेश्वर यांचे मंदिर बांधावे. येरुशलेममध्ये जो आहे तोच देव होय. जो कोणी शिल्लक राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरा म्हणून राहत असेल, त्याला तेथल्या मनुष्यांनी चांदी, सोने, सामानसुमान आणि पशू देऊन सहाय्य करावे, याखेरीज येरुशलेममधील देवाच्या मंदिराकरिता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावी.”
तेव्हा येरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी वरती जायला देवाने ज्यांच्या मनात स्फूर्ती दिली ते यहुदा आणि बन्यामीन यांच्या पितृकुळांचे प्रमुख, याजक आणि लेवी उठून उभे राहिले. त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामानसुमान, पशू आणि मौल्यवान वस्तू देऊन त्यांना सहाय्य केले, यांखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२६ :१-६
प्रतिसाद : परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
१ सीयोनातून धरून नेलेल्या लोकांना
जेव्हा पमेश्वरानेच परत आणले तेव्हा
आम्ही स्वप्नात आहो असे आम्हांला वाटले.
तेव्हा आमचे मुख हास्याने
आणि आमची जीभ जयघोषाने भरली.
२) अन्य राष्ट्रांतील लोक म्हणू लागले की,
परमेश्वराने ह्यांच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत.
त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे.
३) हे परमेश्वरा, नेगेब येथील ओढ्यांप्रमाणे
आम्हांला बंदिवासातून परत आण.
जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने कापणी करतील.
४) जे पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतात
ते खात्रीने आनंद करीत आपल्या पेंढ्या घेऊन येतील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो
आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ८:१६-१८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
" आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून दिवा दिवठणीवर ठेवतात.”
येशू लोकसमुदायाला म्हणाला, कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा, ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वागणारा माणूस आपल्या चांगल्या कार्याचा गवगवा करीत नाही. मात्र कुटुंबातील व समाजातील लोकांना त्याचं जीवन प्रेरणा देणारे ठरते. मदर तेरेजा म्हणतात, “आपलं ख्रिस्ती जीवन हा एक आरसा आहे, त्यात गरीब व वंचित बांधवाप्रति करुणा भरलेली असावी.” अशा माणसाचं जीवन एखाद्या दीपगृहाप्रमाणे अंधारात योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करते. पर्शियाचा राजा कोरेश हा यहूदी धर्मीय नव्हता. परंतु त्याने यिर्मयाने भाकित केलेले देवाचे वचन स्वीकारले. येरुशलेमात इस्रारायलच्या देवाचे मंदिर बांधण्यात पुढाकार घेतला. राजाच्या या सत्कार्यातून यहूदी लोकांना स्फुर्ती मिळाली. मोलवान वस्तू देऊन त्यांनी सहाय्य केलं. प्रभू येशू म्हणतो, “तुमचं जीवन उंच जागी लावलेल्या दिव्यासारखे प्रकाशमय होऊ द्या.”
प्रार्थना : हे परमेश्वरा,अंतःकरणापासून उदारपणे तुझी व बंधु भगिनींची सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या