Marathi Bible Reading | Sunday 19th September 2021 | 25th Sunday in ordinary Time

  सामान्य 

काळातील 

पंचविसावा रविवार 

१९ सप्टेंबर २०२१


"जो कोणी माझ्या नावाने अशा बाळकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो"

 ✝️ 
 
ज्ञानग्रंथातील आजच्या वाचनात नीतिमान माणसाच्या जीवनातील आव्हाना संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. नितिमान माणसाचे जीवन सहज, सोपे नसते कारण तो जगरहाटीच्या प्रवाहाविरुद्ध जाऊन देवाच्या मार्गाने चालत असतो. नीतिमान माणूस नम्र व संयमी पण ज्ञानी असतो. त्याच्या जीवनात दुर्जन नेहमीच अडथळे निर्माण करीत असतात. मात्र नीतिमानाने देवाला आपल्या जीवनात प्राधान्य दिलेले असते. संत याकोब आजच्या दुसऱ्या वाचनात स्पष्ट करतो की,| 'नीतिमान माणूस शांतीप्रिय, सौम्य, दयाकृत्ये व सत्कृत्ये करणारा असतो. '
लहान बालकाचे उदाहरण समोर ठेवून प्रभू येशू आपल्या शिष्यांना आजच्या शुभमर्तमानात नम्रतेची व सौम्यतेची शिकवण देत आहे.  नम्रता हा ख्रिस्ती माणसाचा खूप महान गुण आहे. नम्रतेमुळे माणूस सहनशील, प्रेमळ, दयाळू व प्रामाणिक बनून सेवाकार्य करण्यास पुढाकार घेत असतो. नम्रता माणसाला उच्च स्थानी घेऊन जात असते. ख्रिस्ती माणसातील नम्रता ह्या गुणांमुळे आपण इतरामती प्रेम व परोपकार दाखवून त्याग करायला तयार असतो. प्रभू येशू अतिनम्र बनून आपल्या सर्वांच्या तारणासाठी माणूस झाला व त्याने आपल्यावरील प्रेमाखातर सर्वस्व समर्पित केले.
 
✝️
पहिले वाचन :ज्ञानग्रंथ  २: १२,१७-२०
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"आपण त्याला लाजिरवाणा मृत्यूदंड देऊ या."

नास्तिक आपल्याला म्हणतात: नीतिमान मनुष्य आपल्याला त्रास देतो, आपल्या जीवनाचा धिक्कार करतो, कायद्याच्या उल्लंघनाबद्दल आपली खरडपट्टी काढतो, आम्ही परंपरेविरुद्ध असल्याचा ती आरोप करतो, म्हणून आपण त्याच्या मार्गात दबा धरून बसू या. त्याचे शब्द खरे आहेत की काय ते पाहू या, त्याचा अंत कसा होतो ते बघू या. जर सदगुणी मनुष्य देवाचा पुत्र असेल, तर देव त्याची बाजू घेईल आणि त्याच्या शत्रूंच्या तावडीतून त्याची सुटका करील. त्याचा निष्ठुरतेने छळ करून, त्याच्या सभ्यतेची व सहनशीलतेची परीक्षा पाहू या. प्रभू माझे रक्षण करील असे तो म्हणतो, तेव्हा आपण त्याला लाजिरवाणा मृत्यूदंड देऊ या.
हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ५४ :३-६,८

प्रतिसाद :  प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे.

१) हे देवा, तू आपल्या नामसामर्थ्याने मला तार, 
आपल्या शक्तीने मला न्याय दे.
हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या शब्दांकडे कान दे.

२) कारण गर्विष्ठ लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत, 
निष्ठुर लोक माझा जीव घेऊ पाहतात. 
त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही.

३) पाहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे.
 माझ्या जीवनाचा आधार आहे.
मी आनंदाने तुला यज्ञबली अर्पीन, 
हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे, 
मी त्याचे स्तवन करीन.


दुसरे वाचन याकोबचे पत्र ३:१६-४:३

वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन 
"शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. "

जेथे मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था आणि प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया आणि चांगली फळे ह्यांनी पूर्ण, निःपक्षपाती, निष्कपट असे आहे. पण शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. तुम्हांमध्ये लढाया आणि भांडणे कशातून उत्पन्न होतात ? 
तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही ? तुम्ही हाव धरता पण तुम्हांला मिळत नाही, म्हणून तुम्ही घात करू पाहता. तुम्ही लोभाने त्याच्या अगदी पाठीशी लागता, तरी ते तुमच्या पदरात पडत नाही. मग तुम्ही भांडता व लढता तरीही तुम्हांला ते मिळत नाहीच, कारण तुम्ही ते देवाजवळ मागत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हांला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे आपल्या चैनीकरिता मागता.

हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, 
स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव
 आलेलुया!


शुभवर्तमान मार्क  ९:३०-३७

वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. जर कोणी पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वाचा सेवक झाले पाहिजे. "

येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून निघून गालिलमधून चालले होते आणि हे कोणाला कळू नये, अशी त्याची इच्छा होती. कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता. तो त्यांना असे सांगत होता की, “मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे, ते त्याला जिवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल." परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याला विचारायला ते धजले नाहीत.
पुढे ते कफर्णहूम येथे आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, “तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता ?” पण ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या बाराजणांना बोलावून म्हटले, “जर कोण पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे." मग त्याने एक बाळक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले आणि त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला, जो कोणी माझ्या नावाने अशा बाळकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.
प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:शुभवर्तमानामध्ये येशूच्या शिष्यत्वासाठी विविध प्रतिमा व प्रतिके वापरण्यात आलेली आहेत. त्यात क्रूस, प्याला, बालक, सेवक अशा प्रतिकांचा समावेश होतो. आजच्या शुभवर्तमानात क्रूस आणि बालक ही प्रतिके वापरण्यात आलेली आहेत. संदर्भ आहे प्रेषितांमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा. सर्वात मोठा कोण? यावरून ते आपसांत चर्चा करीत होते. मोठे होण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. मात्र मोठेपणा विषयीच्या चुकीच्या कल्पनांमुळे माणसाचं अवघं आयुष्य जिकिरीचं बनून जातं. येशू मात्र मोठेपणाची कल्पना समजून सांगताना शिष्यांना त्याची संकल्पना स्पष्ट करतो. 
१)शिष्यत्व पत्करण्यासाठी दुःख सहन करण्याची तयारी ठेवावी लागतेः आजच्या पहिल्या वाचनात नीतिमान जीवन जगू पाहणाऱ्या लोकांना सापळ्यात अडकविण्यासाठी दुर्जन कसे टपलेले असतात त्याचे वर्णन करण्यात आलेले आहे. येशूचे शिष्यत्व पत्करून स्वर्गराज्य गाठायचे ही सुळावरची पोळी असते. स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते. शुद्ध होण्यासाठी अग्नि दिव्यातून जावे लागते तर अंकुरित होण्यासाठी जमिनीत गाडून घ्यावे लागते. 
२) शिष्यत्वासाठी शिक्षा सोसावी लागतेः आजच्या दुसऱ्या वाचनात संत जेम्स आपल्याला सांगतो की, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही कारण आपली वागणूक आणि आपल्या मनातील हेतू शुद्ध नसतात. त्याच पत्रात इतरत्र तो एलियाचा संदर्भ देऊन नीतिमा प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते हे दाखवून देतो. 
३) शिष्यत्वासाठी नम्रता आवश्यक असतेः येशू आपल्या प्रेषितांसमोर लहान बालकांचा आदर्श उभा करतो. यहुदी समाजात बालकांना विशेष स्थान नव्हते. लोकसंख्या मोजताना १२ वर्षांखालील मुलांची गणती केली जात नसे. शिवाय बालकासाठी सर्व काही आणि सर्वजण खूप मोठे असतात. इतरांना आपल्यापेक्षा थोर मानावे आणि स्वतः मात्र पडद्यामागून काम करणे पसंत करणे ही नम्रता शिष्यत्वासाठी आवश्यक असते.

आत्मपरीक्षणः मोठेपणाविषयी माझी संकल्पना काय आहे? येशूचे शिष्यत्व पत्करण्यासाठी कोणकोणते दुःख भोगण्यास व कोणकोणती शिस्त पाळण्यास मी तयार आहे, माझ्या जीवनात बालसुलभ नम्र मनोवृत्ती धारण करण्यात कोणकोणते अडथळे आहेत ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझा नम्र अनुयायी बनून सेवाकरण्यास तुझी सुवार्ता  पसरविण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
✝️

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या