Marathi Bible Reading | Saturday 18th September 2021 | 24th week in ordinary Time

 सामान्य 

काळातील 

चोविसावे सप्ताह 

शनिवार 

१८ सप्टेंबर २०२१




क्युपर्टिनोचे संत जोसेफ
• वर्तनसाक्षी (१६०३-१६६३)

ब्रिंडीसी (इटली) जवळच्या क्युपर्टिनो नावाच्या गावातील एका चांभाराच्या घरी जोसेफ डिसा ह्याचा जन्म झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्याला शाळेमध्ये दिव्य दृष्टान्त होत. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला 'स्वप्नदर्शी' असे नाव दिलेले होते.

पुढे वयाच्या १७ व्या वर्षी त्याने फ्रान्सिस्कन आणि कॅप्युचिन संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्याची खूप खटपट केली. परंतु त्याची बुद्धिमत्ता साधारणच असल्यामुळे आणि साक्षात्कारांमध्ये बेभान झाल्याने त्याचा बराच वेळ वाया जाई. त्यातच कामावर त्याचे लक्ष नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला सर्वत्र प्रवेश नाकारला जाई.

ला ग्रॉटेला येथल्या फ्रान्सिस्कन संस्थेने मात्र त्याच्या प्रामाणिक इच्छेला वाव मिळावा म्हणून त्याला घरकामासाठी संस्थेत प्रवेश दिला. हळूहळू त्याची पश्चात्ताप बुद्धी, नम्रता व आज्ञाधारकपणा इतकी प्रखरतेने जाणवू लागली की, त्याला लवकरच धर्मगुरुपदाची दीक्षा देण्याचे ठरविण्यात आले.

प्रथम वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत त्याला लिखाण वाचनाची सवय करावी लागली. मात्र ईशज्ञान विषयक प्रश्न हाताळताना त्याची तारांबळ उडे. परंतु या बुद्धिमत्तेच्या पलिकडे असलेल्या एका वेगळ्याच विश्वातील दान त्याला लाभलेले होते. पापी लोकांना तो दुरूनच ओळखू शकत असे. त्यांचे चेहरे त्याला काळवंडलेले दिसत. तसेच अशुद्ध जीवन जगणाऱ्या व्यक्ती त्याच्याजवळ आल्यानंतर त्याला वेगळ्याच प्रकारची दुर्गंधी येत असे.

साक्षात्काराची देणगी तर त्याला काही औरच प्रमाणात लाभली होती. एखाद्या संताचे नुसते नाव घेतले, चर्चचा घंटानाद त्याच्या कानावर आदळला किंवा धार्मिक गायन त्याला ऐकू आले की तासन् तास जोसेफ बेभान होत असे. देहभान हरपून केवळ प्रार्थना, मनन व चिंतनामध्ये दंग होऊन जाई. त्यामुळे त्याला गायनमंडळ, जाहीर पवित्र मिस्सा व मिरवणूक ह्यापासून दूर ठेवण्यात आलेले होते. त्याच्यासाठी खासगी चॅपल बांधलेले होते. शिवाय त्याच्या नावाभोवती आता प्रसिद्धीचे वलय निर्माण झाल्यामुळे लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्या पायापाशी लोळण घेत. त्यात चेंगराचेंगरी होऊन जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला होता.

उपवास, प्रायश्चित्त व प्रार्थना याबाबतीत त्याची साधनासुद्धा खूप परिपूर्णतेला पोहोचलेली होती. उपवासकाळात तो फक्त गुरुवार आणि रविवार या दोन्हीच दिवशी जेवण घेई. जोसेफ हा देवाचा एक प्रसन्नचित्त व साधासुधा मनुष्य होता. परंतु त्याला लाभलेल्या आध्यात्मिक दानांमुळे बराच गैरसमज निर्माण झाला. त्याच्याविषयीच्या अफवांना ऊत आला.

इ. स. १६६३ साली मरण पावलेल्या जोसेफ ह्यांना पोप क्लेमेंट तेरावे ह्यांनी १७६७ साली संत म्हणून घोषित केले.

संत जोसेफ हा परिक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा (परिक्षार्थींचा)

आश्रयदाता संत होय.

देवावर प्रेम करा. ज्याच्यापाशी देव आहे त्याच्याजवळ सर्व काही आहे. जगाला जरी दिसत नसले तरी अंतर्यामी तो श्रीमंत आहे.क्युपर्टिनोचे संत जोसेफ


 ✝️ 
  प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आणि जीवन देणारा देव आहे, असे संत पौल घोषित करुन त्याचा सन्मान करण्यासाठी आज आपल्याला आवाहन करीत आहे.
 आपण चिंतन करु या की, प्रभूचा शब्द (बायबल वाचन) आत्मसात करुन त्यावर आपण चिंतन मनन करतो का?  शेवटी देवराज्याची सुवार्ता घोषविण्यासाठी आपल्या सर्वांना प्रभू वचनाचे सामर्थ्यशाली शस्त्र घेऊन जगात पाठवित आहे.
 
✝️
पहिले वाचन :तिमथी ६: १३ -१६
वाचक :पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निर्मळ ठेव."

सर्व प्राणिमात्रांला जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पोंती पिलातासमक्ष स्वतःविषयी निर्भय साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निर्मळ तू ठेव. जो धन्य आणि एकच अधिपती, राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रगट होणे यथाकाळी दाखवील. त्याला सन्मान आणि पराक्रम युगानुयुगे आहे. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे. 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १०० :१-५

प्रतिसाद :आनंदगीत गात परमेश्वरासमोर या. 

१) अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, 
परमेश्वराचा जयजयकार करा. 
हर्षाने परमेश्वराची सेवा करा. 
आनंदगीत गात त्याच्यापुढे या. 

२) परमेश्वर हाच देव आहे 
याची जाणीव ठेवा. 
त्यानेच आम्हांला उत्पन्न केले, 
आम्ही त्याचेच आहोत, 
आम्ही त्याची प्रजा, 
त्याच्या कुरणातील कळप आहो.

३) त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात, 
स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा, 
त्याचे उपकारस्मरण करा, 
त्याच्या नावाला धन्यवाद द्या.

४) खरोखर, परमेश्वर चांगला आहे, 
त्याची दया सनातन आहे. 
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.



जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 

तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना
ज्योतीसारखे जगात दिसता
 आलेलुया!


शुभवर्तमान लूक  ८:४-१५

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 


"वचन ऐकून जे सालस आणि चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात. ते चांगल्या मातीत पडलेले बी आहे."

जेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला आणि गावोगावचेही लोक येशूजवळ आले तेव्हा तो दाखला देऊन म्हणाला : “पेरणारा आपले बी पेरायला निघाला आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले, ते तुडवले गेले आणि आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली. काही चांगल्या जमिनीत पडले, ते उगवून शंभरपट पीक आले. असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकायला कान आहेत, तो ऐको."

तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, ह्या दाखल्याचा अर्थ काय? येशू म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे, परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत, कारण त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये आणि ऐकत असता त्यांना समजू नये." हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे. वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात, नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये आणि त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहे की, ते ऐकतात, वचन आनंदाने ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते, ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात आणि परीक्षेच्या वेळी गळून पडतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहे की, ते ऐकतात आणि संसाराच्या चिंता, धन आणि विषयसुख ह्यात आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते आणि ते पक्व फळ देत नाहीत. चांगल्या मातीत पडलेले हे आहे की, ते वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंत:करणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:देवराज्यासंबंधी शिकवण देताना प्रभू येशू पेरणाऱ्या शेतकऱ्याचा दाखला देत आहे. बी हे देवाचे वचन आहे. परमेश्वर पिता मुक्तहस्ते बी पेरतो. योग्य प्रतिसादाविना ते फुकट जाते. खडकाळ जमीन, काटेरी झुडुपे ही सर्व प्रतिके आहेत - निष्काळजी पणाची ! चांगली माती हृदयात भरलेल्या सद्भावनेचे प्रतिक आहे. ज्यांच्याठायी बंधुजनाप्रती सद्भावना व प्रीती भरलेली आहे ते ख्रिस्तवचनाचा सदैव मान राखतात व भरपूर प्रतिसाद देतात. “देवा, तुझे शब्द अमुचा प्रकाश! देवा तुझे शब्द अमुचे जीवन.” हे प्रभू येशू, तुझ्या शब्दाच्या प्रकाशात आमचे जीवन उजळू दे. तुझ्या दिव्य शब्दांचा आधार घेऊनच आम्ही दुर्गुणांवर मात करू शकतो. “बंधुप्रीतीचे बीज आमच्या अंतर्मनात रूजू दे. अंकुरित होऊ दे."

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या स्वर्गीय वचनांवर मनन-चिंतन करुन स्वर्गीय रहस्य जाणण्यास व फलदायी जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️

   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या