सामान्य
काळातील
चोविसावे सप्ताह
शुक्रवार
१७ सप्टेंबर २०२१
संत रॉबर्ट बेलार्मीन
• महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५४२-१६२१)
परोपकार ही अशी गोष्ट आहे की जिच्याशिवाय कुणाचे तारण होऊ शकत नाही आणि जिच्यामुळे कुणाचा नाश होऊ शकत नाही.-संत रॉबर्ट बेलार्मीन
✝️
प्रभू येशूची शिकवण सत्याची व त्याची वाणी देवाची होती. देवराज्य हाच त्याच्या शिकवणुकीचा गाभा होता.
शुभवर्तमानात आज विशेषकरून प्रभू येशूच्या सहवासाने परिवर्तीत जीवन जगून त्याला सहकार्य करणाऱ्या स्त्रियांचा उल्लेख करण्यात आला आहे. 'दुष्टात्मे व विकारांपासून मुक्त केलेल्या अनेक स्त्रिया.' ज्या मग्दालीया मरियेतून सात भूते काढली ती, हेरोदाच्या कारभाऱ्याची बायको योहाना तसेच सुसाना आणि इतर पुष्कळ स्त्रिया ह्या सर्व स्त्रीया येशूच्या कार्यात आपआपल्या परिने आर्थिक व इतर प्रकारची मदत करीत होत्या. त्या सर्व स्त्रियांनी देवराज्याच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते.
जगभरात प्रभू येशूच्या देवराज्याची सुवार्ता पसरविणाऱ्या महिलांच्या अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. असंख्य स्त्रियांनी प्रभूच्या हाकेला प्रतिसाद देऊन देवराज्य पसरविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आरोग्य, शिक्षण, समाजसेवा, अनाथालये व इतर अनेक प्रकारे धर्मभगिनींचे कार्य जगभर सुरु आहे. संत मदर तेरेजांच्या संस्थेचे कार्य जगभरात सर्वांना परिचित आहे. आज आपण धर्मभगिनी व सर्व महिलांसाठी विशेष प्रार्थना करू या. त्यांच्या कार्याद्वारे प्रभूची सेवा घडावी व समाजात शांती प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांना सहकार्य करू या.
✝️
पहिले वाचन :तिमथी ६: २क -१२
वाचक :पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"हे देवभक्ता, तू नीतिमत्त्वाच्या पाठीस लाग.'
ह्या गोष्टी शिकव आणि ह्याविषयी बोध कर. जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती व सुभक्त्यानुसार जे शिक्षण ते मान्य करत नाही, तर तो गर्वाने फुगलेला आहे. त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे वेडा बनला आहे. ह्यांपासून हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय ही उत्पन्न होतात. मन बिघडलेल्या, सत्याला मुकलेल्या, भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही, आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे; परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पाशात आणि माणसांना नाशात व विध्वसांत बुडविणाऱ्या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.
हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. युगानुयुगाच्या जीवनाचे ध्येय धर, त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि अनेक साक्षीदारांसमोर तू उत्तम साक्ष दिलीस.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४९ :६-१०, १७-२०
प्रतिसाद : जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
१) मला फसवणाऱ्यांचा दुष्टपणा मला वेढतो,
अशा विपत्काली मी का भ्यावे ?
ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात
आणि आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात.
२) कोणाही मनुष्याला स्वतःला मुक्त करता येत नाही,
किंवा आपल्या जिवाबद्दल देवाला खंडणी देता येत नाही.
त्याला जीवाची खंडणी त्याच्या मर्यादेपलीकडे आहे.
तो आपला जीव कधीच विकत घेऊ शकत नाही,
किंवा गर्तेचा अनुभव टाळू शकत नही.
३) कोणी मनुष्य धनवान झाला,
त्याच्या घरचा डामडौल वाढला तरी
तू घाबरू नकोस कारण तो मृत्यू पावेल तेव्हा
बरोबर काहीच घेऊन जाणार नाही,
त्याचा थाटमाट त्याच्यामागून खाली उतरणार नाही.
४) तो जिवंत असता जरी स्वतःला धन्य समजून म्हणाला,
तू आपले बरे करून घेतलेस म्हणजे लोक
तुझी स्तुती करतील, तरी तो आपल्या
पूर्वजांना जाऊन मिळणार आहे,
ज्यांच्या दृष्टीला प्रकाश कधीच दिसणार नाही.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा पिता हा आमचे अंत:चक्षू प्रकाशित करो, म्हणजे त्यामुळे त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा. कोणती ही तुम्ही ओळखून घ्यावी.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ८:१-३
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"दुसऱ्या कित्येक स्त्रिया येशूबरोबर होत्या, त्या आपल्या पैशाअडक्याने त्याची सेवाचाकरी करत असत."
येशू उपदेश करत आणि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी आणि गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरियेतून सात भुते निघाली होती ती आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सुसान्ना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:“सेवक विश्वासनिय असावा. शांत, सिद्ध परि शुद्ध असावा.” या शब्दात संत पॉल तिमथी या ख्रिस्तसेवकाला उपदेश करीत आहे. सुभक्ती ही केवळ धार्मिक कर्मकांडात नाही. ती केवळ सामाजिक रितीरिवाज पाळण्यात नाही. त्यासाठी ख्रिस्तसेवकाने पैशाचा लोभ, हेवा, कलह, संशय या दुर्गुणावर मात करण्यासाठीनिग्रहपूर्वक प्रयत्नशील राहावे. “भक्ती व उपासना हे कमाईचे साधन आहे” अशी वृत्ती बाळगणारा लोभी माणूस स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतो. ख्रिस्तसेवकाला मोबदला अथवा मानधन याची पर्वा नसावी. ही भावना माझ्या मनात प्रबळ होत आहे का ? “हे देवभक्ता तू सर्व प्रकारच्या अयोग्य वृत्तीपासून दूर राहा म्हणजे तुझ्या पवित्र जीवनाची साक्ष बळकट होईल” हे प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मला लाभू दे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, देवराज्याची सुवार्ता पसरविण्यास कार्यरत असलेल्या सर्व व्रतस्थ महिलांना सामर्थ्य व कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या