सामान्य
काळातील
चोविसावे सप्ताह
गुरुवार
१६ सप्टेंबर २०२१
“त्याने तिला म्हटले, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
संत कॉर्नेलियुस
परमगुरू, रक्तसाक्षी (--- २५३)
संत सिप्रियन
• महागुरू, रक्तसाक्षी (१९०-२५८)
✝️
पापी स्त्रीने पश्चात्ताप पूर्वक केलेली कृती समजावून सांगण्यासाठी प्रभू येशू आपल्या शिष्यांना दोन कर्जदारांचा दृष्टांत सांगत आहे. परमेश्वर दयाळू आणि प्रेमळ आहे. पापांचा पश्चात्ताप करून परमेश्वराला शरण येणाऱ्या प्रत्येकावर तो अधिक प्रेम करतो. पापी स्त्रीचे येशूवरील प्रेम ती कृतीतून व्यक्त करते. त्या कृतींचे समर्थन प्रभू येशूने केलेआहे. तिने आपल्या आसवांनी प्रभूचे पाय धुतले व केसांनी ते पुसले. प्रभूच्या चरणाचे त्या स्त्रीने मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. म्हणूनच प्रभूने | तिला म्हटले तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, कारण तिने येशूवरील आपली प्रीति आणि विश्वास कृतीतून व्यक्त केला.
ख्रिस्ती माणूस खरोखरच देवावर प्रीति करतो असे म्हणत असेल तर अंतःकरणापासून आपल्या पापांची कबुली देऊन पश्चात्ताप करायला तयार असले पाहिजे. पवित्र पापनिवेदन संस्कारामध्ये परमेश्वर आपल्याला अनेकवेळा पश्चात्तापाच्या संधी उपलब्ध करून देत असतो. आपले खरोखरच देवावर प्रेम आहे का ते तपासून पाहू या.
✝️
पहिले वाचन :तिमथी ४: १२-१६
वाचक :पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“आपणाकडे आणि आपल्या शिक्षणाकडे नीट लक्षठेव. असे केल्याने तू स्वतःचे आणि तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधशील."
कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास आणि शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध आणि शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव, ह्यात गढून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वत:चे आणि तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधशील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११० :७-१०
प्रतिसाद : परमेश्वराची कृत्ये थोर आहेत.
१) त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य आणि न्याय्य आहेत,
त्याचे सर्व विधी विश्वसनीय आहेत,
ते सदासर्वकाळ अढळ असे आहेत,
ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत.
२) त्याने आपल्या लोकांना उद्धार दान पाठवून
दिले आहे, त्याने आपला करार सर्वकाळासाठी
नेमला आहे, त्याचे नाव पवित्र आणि भययोग्य आहे.
३) परमेश्वराचे भय ज्ञानाचा उगम होय,
त्याप्रमाणे जे वागतात त्या सर्वाना सुबुद्धी प्राप्त
होते, त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ७:३६-५०
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली. "
परुश्यांतील कोणाएकाने येशूला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि येशू त्या परुश्याच्या घरी जाऊन भोजनाला बसला, तेव्हा त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती. येशू परुश्याच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली आणि आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. तेव्हा ज्या परुश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, "हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण आणि कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते." तेव्हा येशूने त्याला म्हटले, "शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे." तो म्हणाला, "गुरुजी, बोला," "एका सावकाराचे दोन कर्जदार होते, एकाला पाचशे रुपये देणे होते आणि एकाला पन्नास होते. देणे फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने त्या दोघांना सोडले. तर त्यातून कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?" शिमोनने उत्तर दिले, "ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.' मग तो त्याला म्हणाला, "बरोबर ठरविले." तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनला म्हटले, "तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही, परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले. तुम्ही माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्याचे थांबवले नाही. तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले. ह्यावरून मी तुम्हाला सांगतो की, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्याची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीती केली; ज्याला थोड्यांची क्षमा झाली आहे तो थोडी प्रीती करतो. मग त्याने तिला म्हटले, "तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा त्याच्याबरोबर भोजनांना बसलेले आपसात म्हणू लागले, “पापांची क्षमादेखील करणारा हा कोण ?" मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:ख्रिस्ताच्या दयेचा अनुभव ज्याला येतो त्याचे जीवन शांतीने भरून जाते. प्रभू येशूच्या पायाशी बसून रडणाऱ्या पश्चात्तापी स्त्रीला शांतीचा अनुभव आला. “मी पापी लोकांना सन्मार्ग दाखविण्यास आलो आहे.” मला स्वतःच्या पापी अवस्थेची व उणेपणाची जाणीव होते, तेव्हा प्रभू ख्रिस्ताच्या दयेचा व शांतीचा अनुभव येऊ लागतो. म्हणूनच स्वतःला सभ्य व नीतिमान मानणाऱ्या परुशाला ख्रिस्ताच्या सहवासात असताना सुद्धा दयेचा व शांतीचा अनुभव आला नाही. “पुष्कळ अजूनि उणा, प्रभू मी पुष्कळ अजूनि उणा” कविवर्य नारायण वामन टिळकांच्या या विनवणीच्या स्वरातून हेच सत्य दिसून येते.
प्रार्थना : हे प्रभू येशू, श्रद्धेने तुजपाशी येण्यास व पाप स्वीकार करून तुझ्या क्षमेचे दान मिळविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
✝️

0 टिप्पण्या