Marathi Bible Reading | Monday 8th November 2021 |32ndeek in ordinary Time |

          सामान्य  काळातील ३२वा सप्ताह 

सोमवार 

८ नोव्हेंबर २०२१ 

"जर तुझा भाऊ दिवसातून सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे. असे म्हणाला, तरी त्याला क्षमा कर."

संत गॉडफ्री
महागुरू, वर्तनसाक्षी (१०५०-१११५)
 ✝️  

 गॉडफ्री ह्याने आपल्या तारुण्याची महत्त्वाची वर्षे रात्रंदिवस प्रार्थना करण्यात घालविली. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला धर्मगुरूपदाची दीक्षा देण्यात आली. 

इ. स. ११०३ साली त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला एमिएन्सचे महागुरू म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यावेळी तो अनवाणीच, पश्चात्तापाची जाडीभरडी वस्त्रे (गोणताट) पांघरून शहरात शिरला आणि महागुरूंच्या राजमहालात एखाद्या भिक्षूप्रमाणे राहू लागला.

त्याची सहनशीलता, नम्रता आणि गरिबांविषयी त्याला वाटणारी कळकळ अलौकिकच म्हणावी लागेल. ख्रिस्त आणि बारा प्रेषित ह्या नात्याने तो दररोज १३ गरीब लोकांना भोजन देत असे. कुष्ठरोग्यांच्या इस्पितळांना भेटी देणे, त्यांच्या गरजा भागविणे, त्यांना हसतमुख ठेवून त्यांची सेवा करणे ह्यात त्याला परमानंद मिळत असे.

 प्रभू येशू आपल्याला देव जसा क्षमाशिल आहे, आपणसुद्धा आपला अपराध करणाऱ्याला क्षमा करावी, अशी तसेच क्षमादानाची शिकवण देत आहे. अपराध्यांना क्षमा करण्यासाठी देवाच्या कृपेची गरज असते. हीच देवाची कृपा आपल्या देवावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते.  शिष्यांनी येशूला म्हटले, 'आमचा विश्वास वाढवा.' प्रभू येशूने स्पष्ट करुन सांगितले की, 'केवळ मोहरीच्या दान्या एवढा विश्वास सुद्धा आपल्याला देवाची  प्रचंड महानता व शक्ति अनुभवण्यास मिळू शकते.' 

ह्या जगातील आपले जीवन परस्परांच्या विश्वासाने जर सुकर बनते तर देवावरील आपला विश्वास आपल्याला प्रचंड शक्ति आणि अंतर्बाह्य जीवन  बदलण्याची प्रेरणा देऊ शकतो.

देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि प्रभूच्या वचना प्रमाणे जीवन जगण्यासाठी  आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून सतत प्रभूचे चिंतन करु या. त्याची सहभागीता  अनुभवण्यासाठी त्याच्या ध्यास घेऊ या. 

✝️

पहिले वाचन : ज्ञानग्रंथ  १:१-७
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन

"ज्ञानी दयाशील असतो. प्रभूच्या आत्म्याने जग भरून टाकले आहे."

भूपतींनो, न्यायाची आवड धरा. सरळ मनाने प्रभूचे चिंतन करा. प्रांजळपणे त्याचा ध्यास घ्या. प्रभूची कसोटी न पाहणाऱ्यांना तो सापडतो. त्याच्यावर श्रद्धा टाकणाऱ्यांना तो दर्शन देतो. विपरीत बुद्धीमुळे मनुष्य देवापासून दुरावतो. त्याच्यासामर्थ्याची कसोटी पाहणारा मूर्ख त्याच सामर्थ्याने दोषी ठरतो. •कारण कपटी मनामध्ये ज्ञान प्रवेश करणार नाही, किंवा पापांच्या आहारी गेलेल्या शरिरामध्ये वस्ती करणार नाही. शिस्तप्रिय व शुद्ध आत्मा फसवेगिरीपासून दूर पळून जातो, मूर्ख विचारापासून तो अलिप्त असतो आणि अन्यायाने डोके वर काढले असता तो त्याला विरोध करतो.
ज्ञानी दयाशील असतो तरीदेखील देव-निंदकाला तो दोषमुक्त करणारा नाही. कारण देव त्याच्या अंतर्यामाचा साक्षी आहे. तो त्याचे मन बरोबर ओळखतो आणि त्याचे शब्द ऐकून घेतो. कारण प्रभूच्या आत्म्याने जग भरून टाकले आहे. साऱ्या गोष्टी सामावून घेणाऱ्या आत्म्याला उच्चारलेला प्रत्येक शब्द माहीत आहे.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र १३९:१-१०

प्रतिसाद :प्रभो, मला शाश्वत जीवनाच्या मार्गाने ने.
१) हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, 
तू मला जाणतोस, माझे बसणे आणि 
माझे उठणे तू जाणतोस, 
तू दुरून माझे मनोगत समजतोस. 
तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस. 
माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.

२) हे परमेश्वरा, माझ्या मुखातून असा
 एकही शब्द येत नाही की, 
तो तुला मुळीच ठाऊक नाही. 
तू मागूनपुढून मला घेरले आहेस, 
माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस,
हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडे आहे,
हे अगम्य आहे, हे माझ्या आवाक्याबाहेर आहे.

३) मी तुझ्या आत्म्यापासून कोठे जाऊ? 
मी तुझ्यासमोरून कोठे पळू ? 
मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस. 
अधोलोकी मी आपले अंथरूण केले, 
तरी पाहा, तेथे तू आहेस.

४) मी प्रभातपंख धारण करून समुद्राच्या 
अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो, 
तरी तेथेही तुझा हात मला नेईल, 
तुझा उजवा हात मला धरून राहील


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
 हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे, सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक  १७:१-६

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"जर तुझा भाऊ दिवसातून सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे. असे म्हणाला, तरी त्याला क्षमा कर."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "अडखळणे येऊ नये हे अशक्य आहे, परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने ह्या लहानातील एकाला अडखळवावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बाधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात हित आहे. तुम्ही स्वतः सांभाळा. तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर, त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी त्याला क्षमा कर." मग प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा,” प्रभू म्हणाला, “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर ह्या तुतीच्या झाडाला, तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआपली आध्यात्मिकता तपासून घेण्यासाठी लूक आपल्यासमोर तीन गोष्टी ठेवत आहे. १) लफडेबाजी (गैरवर्तणूक), २) क्षमा करणे, ३) विश्वासात तत्पर असणे. ज्या जगात आपण वास्तव्य करतो तिथे अडथळे येणे अटळच आहे. तथापि शिष्यांनी इतरांना पापास प्रवृत्त करू नये, त्यांना मोह पाडू नये आणि त्यांच्यासमोर चुकीचे उदाहरण ठेवू नये म्हणून येशूने कडक इशारा दिलेला आहे. याउलट शिष्यांनी त्यांच्यापैकी कोणी चुकून पापात पडला तर त्याला त्यांची चूक दाखवून तत्परतेने क्षमा करावी. क्षमेसाठी मर्यादा नाही. 'प्रभू, आमची श्रद्धा बळकट कर' या शिष्यांच्या विनवणीवरून त्यांचा विश्वासाचा अंश अधिक खोलवर मुळावलेला नाही. विश्वास वाढविण्यासाठी लागणारी कृपा आहे ती प्रभूकडून प्राप्त होऊ शकते याची जाणीव शिष्यांना आहे. म्हणून ते येशूकडे विनवणी करतात. लहान लहान गोष्टी विश्वासाने करण्यासाठी व आपली आध्यात्मिकता उंचावण्यासाठी आपण देखील शिष्यांप्रमाणे म्हणू या, 'आमचा विश्वास वाढवा.'
प्रार्थना :-  हे प्रभू परमेश्वरा, तुझी अमर्याद दया, प्रेम व कृपा अनुभवून विश्वासाने खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रेरणा व शक्ति दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या