सामान्य काळातील ३२वा रविवार
७ नोव्हेंबर २०२१
“सर्वांच्यापेक्षा गरीब विधवेने अधिक टाकले. "
सारफथ येथील विधवा अत्यंत गरीब होती, मात्र एलीयाने विनंती केल्याप्रमाणे तिने आपल्या मडक्यातील मुठभर पीठ आणि कुपीतील थोड्याशा तेलाच्या भाकरी बनविल्या. एलीयाने त्या भाकरी खाल्यावर परमेश्वराच्या वचनाप्रमाणे, त्या विधवेला भरभराटीचा आशीर्वाद मिळाला. तिचे पीठाचे मडके व तेलाची कुपी कधीच रिकामी झाली नाही.
विधवेने आपली सर्व कमाई देवाच्या दानपेटीत टाकली. हातचे काही राखून न ठेवता विधवेने दान केले. प्रभू येशूने त्या विधवेची प्रशंसा केली आणि दांभिकतेने प्रार्थना व दानधर्म करणाऱ्या शास्त्र्यांचा प्रभूने निषेध केला. आत्मत्याग करुन केलेले दान हेच खऱ्या अर्थाने परमेश्वराला स्वीकारणीय असे दान आहे. परमेश्वर देणाऱ्याचे धन पाहत नाही तर त्याचे उदार अंतःकरण पाहत असतो. स्वतःला दानशूर समजणाऱ्या आणि विपूलतेतून दानधर्म करणाऱ्यांची प्रभू येशूने आज कानउघाडणी केली आहे. अनेकदा गरीबांमधील नीतिमत्ता, आध्यात्मिकता आणि परोपकार हा स्वतःला श्रीमंत व सुसंकृत समजणाऱ्यांपेक्षा खूप मोठा असतो.
आपले जीवन व आपल्याला लाभलेली समृध्दी हे परमेश्वराचे दान आहे. आज आपण त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन आपले सर्वस्व त्याला अर्पण करु या. आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी परोपकार व दानधर्माला प्राधान्य देऊ या
✝️
पहिले वाचन : १राजे १७:१०-१६
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्या विधवेने पिठाची एक भाकर भाजून ती एलियाला दिली. "
एलिया सारफथ येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, "एका पात्रात मला प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये." ती पाणी आणायला जात असता त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, "आपल्या हातात एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये." ती म्हणाली, "तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी दोन काटक्या जमा करत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू." एलिया म्हणाला, “भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याचप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण, नंतर आपल्यासाठी आणि आपल्या मुलासाठी भाज. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करील त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही." तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो, ती आणि तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपीही आटली नाही..
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४६:६-१०
प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन कर.
१) परमेश्वर सदा आपले सत्यवचन पाळतो,
छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो,
भुकेल्यांना अन्न देतो.
परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
२) परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो,
परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो.
परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो,
परमेश्वर निर्वातिसांचे रक्षण करतो.
३) तो अनाथ आणि विधवा ह्यांची दाद घेतो,
परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो.
परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो,
हे सियोन, तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करतो.
दुसरे वाचन इब्री ९:२४-२८
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. "
खऱ्या गोष्टीचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे ख्रिस्ताला वारंवार स्वतःचे अर्पण करावयाचे नव्हते, तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकटझाला आहे. ज्याअर्थी माणसांना एकदाच मरण व त्यानंतर न्याय हे नेमून ठेवले आहे, त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वत:वर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जागृत आणि सिद्ध राहा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
शुभवर्तमान मार्क १२:३८-४४
वाचक :मार्कलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्या सर्वांच्यापेक्षा ह्या गरीब विधवेचे भांडारात अधिक टाकले आहे.”
येशू आपल्या शिकवणीत म्हणाला, “शास्त्रांविषयी जपून राहा. त्यांना लांबलांब झगे घालून मिरवणे, बाजारात नमस्कार घेणे आणि सभास्थानात मुख्य आसने आणि मेजवानीत मुख्य बैठकी ह्यांची आवड असते. ते विधवांची घरे खाऊन टाकतात आणि ढोंगाने लांबलांब प्रार्थना करतात. त्यांना अधिकच शिक्षा होईल."
येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. मग एक गरीब विधवा आली आणि तिने दोन ताब्यांची नाणी, म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचित सांगतो, हे जे भांडारात द्रव्य टाकत आहेत त्या सर्वांच्यापेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे, आपली सर्व उपजीविका टाकली."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: इस्राएलमध्ये विधवा, अनाथ व उपरी ह्या तीन वर्गातील व्यक्ती परावलंबी मानल्या जायच्या. तशात विधवांना तर समाजात अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत असे. त्यांचा कैवार घेण्यासाठी कोणी नसल्याने त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय केला जाई. संदेष्ट्याकरवी अशा लोकांना सन्मानाने वागविले जावे अशी आज्ञा परमेश्वराने दिलेली होती. खुद्द परमेश्वर त्यांचा वापर करून आपली योजना पूर्णत्वास नेत होता. त्यात नामी, रूथ, आजच्या पहिल्या वाचनातील सारफथची विधवा, येशूच्या दाखल्यातील, कार्यातील विधवा, आजच्या शुभवर्तमानातील विधवा ह्यांचा विशेष उल्लेख करता येईल. दानधर्म कसा करावा ह्याचे धडे आजच्या वाचनातून आपल्याला देण्यासाठी दोन विधवांचा आदर्श आपल्यासमोर उभा करण्यात आलेला आहे.
१) किती दिले त्यापेक्षा कोणत्या परिस्थितीत असताना दिले ते महत्त्वाचे असतेः सारफथच्या विधवेकडे थेंबभर तेल आणि मूठभर पीठ होते. ते तिने ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत एलियासाठी वापरले. शुभवर्तमानातील विधवेकडेकेवळ दोन नाणी होती. तरीही आपल्यापेक्षा इतरांची गरज मोठी असू शकते या भावनेने तिने ती दोन्ही नाणी दानकोशात टाकली.
२) काय दिले त्यापेक्षा कसे दिले ते महत्त्वाचे असतेः दोन्ही विधवांच्या मुखात कुरकुर किंवा देणे भाग पडतेम्हणून अशी केवळ कर्तव्याची भावना आढळत नाही. त्या अगदी मनापासून आपल्याजवळ जे आहे त्याचे मन मोकळेपणे व अढळ हस्ते दान करतात. दान करताना जर ते मनापासून केले नाही तर माणूस दोन गोष्टींना मुकतो. दिलेली वस्तू गेली आणि ती देण्यातला आनंददेखील गेला, अशी अवस्था होते.
३) ज्याला दिले गेले त्यापेक्षा ज्याने दिले त्याचा अधिक फायदा होतोः पहिल्या वाचनात विधवेला व तिच्या घराण्याला तीन वर्षे काहीच कमी पडले नाही तर शुभवर्तमानातील निनावी विधवा येशूच्या शिकवणुकीत अजरामर झाली. याचा अर्थ दानधर्म केल्याने इतरांचा फायदा होत असेल परंतु त्यापेक्षा आपला अधिक फायदा होतो.
आत्मपरीक्षणः दानधर्म करताना मी पुढीलपैकी कोणती मनोवृत्ती धारण करतो ? कर्तव्य म्हणून ? प्रसिद्धी मिळेल म्हणून? परमेश्वराचे आभार ● मानण्यासाठी ? प्रेमापोटी? इतरांची गरज मोठी आहे या संवेदनशील भावनेने ?
प्रार्थना :- हे प्रभू परमेश्वरा, हातचे राखून न ठेवता, अंतःकरणापासून दानधर्म करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या