सामान्य काळातील ३१वा सप्ताह
शनिवार
६ नोव्हेंबर २०२१
"तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही."
- वर्तनसाक्षी, मठाधिकारी (५५९)
मध्ययुगामध्ये संत लिओनार्ड हा जर्मनी, ऑस्ट्रिया आणि बोहेमिया इथे खूप नावारूपाला आला होता आणि त्यात त्यांची भक्ती वाढत गेली. त्याच्या मध्यस्थीने अनेक चमत्कारिक घटना घडत होत्या. त्याला आजारी, मंदबुद्धी, प्रसृतीवेदना सहन करणाऱ्या स्त्रिया आणि तुरुंगातील कैद्यांचा आश्रयदाता संत मानले जाते
✝️
अनीतिच्या मार्गाने धन मिळविणाऱ्या आणि श्रीमंतीचा अभिमान बाळगणाऱ्या परुश्यांचा प्रभू येशू परखड शब्दात निषेध करीत आहे. विशेषतः प्रभू येशू जगातील लोभी प्रवृत्ती असणाऱ्या आणि जागतिक वैभवासाठीच कष्ट करणाऱ्यांना सल्ला देत आहे. "माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे." सुख, संपत्ती, अधिकार, मान-सन्मान मिळविण्यासाठी आणि प्रसिध्दीची हाव असणाऱ्यांसाठी प्रभू येशू म्हणत आहे की, “तुम्हाला देवाची व धनाची सेवाचाकरी करता येत नाही!"
प्रभू येशू धनवानांचा नव्हे तर गरिबांचा कैवारी आहे. आपल्या जागतिक धनाची नव्हे तर अंतःकरणाची श्रीमंती त्याला हवी आहे. आपले विचार व कृती देवाच्या इच्छेनुसार आहे का? आपण आध्यात्मिक दृष्ट्या धनवान आहोत का?
✝️
पहिले वाचन : रोम १६:३-९,१६,२२-२७
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा."
ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी, प्रिस्का आणि अक्विला ह्यांना सलाम सांगा. त्यांनी माझ्या जिवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याही मानतात. जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा, तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथमफळ आहे. मरियेला सलाम सांगा, तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत. माझे नातेवाईक आणि सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया ह्यांना सलाम सांगा ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत आणि माझ्यापूर्वीच ते ख्रिस्तामध्ये होते. प्रभूमध्ये माझा प्रिय आप्लियात ह्याला सलाम सांगा. ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान आणि माझा प्रिय स्ताखू ह्यांना सलाम सांगा. पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात.
हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांला प्रभूमध्ये सलाम सांगतो.
माझे आणि सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम.
आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांद्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे आणि येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्याद्वारे युगानुयुगे गौरव असो. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १४५:२-५,१०-११
प्रतिसाद : हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देईन.
१) मी प्रतिदिवशी तुला धन्यवाद देईन,
आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.
परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे,
त्याची थोरवी अगम्य आहे.
२) एक पिढी दुसऱ्या पिढी पुढे तुझ्या कृत्यांची
प्रशंसा करत राहील, त्या तुझ्या पराक्रमांचे वर्णन करतील.
तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप
आणि तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन.
३) हे परमेश्वरा, तुझे सर्व प्राणिमात्र तुझी स्तुती गातात
आणि तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात
आणि तुझा पराक्रम कथन करतात..
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे,
म्हणून पित्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला.
शुभवर्तमान लुक १६: ९-१५
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे ते तुम्हांला कोण सोपवून देईल ?”
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा, ह्यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांस सार्वकालिक वस्तीत घ्यावे,
"जो अगदी थोड्या गोष्टींविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टींविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी तो पुष्कळ गोष्टींविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही ते जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल? कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्याला प्रीती करील अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.
धनलोभी परुशी हे सर्व ऐकत होते आणि त्याला हसत होते. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःला लोकांपुढे, नीतिमान म्हणवून घेणारे आहा, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो, कारण माणसांना जे परमश्रेष्ठ वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: अन्यायी कारभारी या दृष्टांताचा शेवट प्रभू एका प्रभावी उद्गाराने करतो. "कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही." प्रभूशी विश्वासू असणे म्हणजे दास्यत्वासारखं आहे. प्राचीन काळी दास्यत्व करणे म्हणजे चोवीस तास एकाच धन्याची चाकरी करणे असे होते. आपल्या मालकाशी एकनिष्ठ राहणे व त्याच्या सेवेत सदोदित हजर असणे या दोन गोष्टींची आवश्यकता असते. आज काही लोक सकाळी एकाची व सायंकाळी दुसऱ्याची चाकरी करतात. हा अर्धवेळ एकाच्या ठिकाणी व नंतर दुसऱ्या ठिकाणी काम करणे अशातला भाग नाही. प्रभू शिष्यांना उद्देशून सांगतो की, पैसा व देव तराजूच्या एकाच पारड्यात राहू शकत नाही. पैशाचा वापर गोरगरिबांची सेवा करणे व त्यांना मदत करणे यासाठी केल्यास आपले स्वर्गीय नंदनवनात स्वागत होईल ह्याची त्यांना शाश्वती मिळेल. संपत्तीचे नियंत्रण आपणावर राहता कामा नये. तिचा गुलाम होऊ नये तर आपण केवळ •देवप्रित्यर्थच जगायला हवे. एक दिवस मी पैशाला भेटलो. मी म्हणालो, 'तू एक कागदाचा तुकडा आहेस.' पैसा हसत हसत म्हणाला, 'होय, मी कागदाचा तुकडाच आहे. परंतु मी माझ्या जीवनात अद्यापपर्यंत एक ही डस्टबीन बघितली नाही.'
प्रार्थना :- हे परमेश्वरा, तुच एकमेव देव आहेस, अंतःकरणापासून तुझीच सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या