सामान्य काळातील ३१वा सप्ताह
शुक्रवार
५ नोव्हेंबर २०२१
“अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. हे पाहून धन्याने त्याची वाहवा केली,"
संत बर्टिला
- कुमारिका ( ६९२)
✝️
आपले परोपकारी जीवन, आपले कुटुंबीय, आपले कार्य ह्या अनुषंगाने आपल्या प्रत्येक जबाबदारीविषयी आपण आज विचारविनीमय करु या. प्रत्येक क्षणाला आपण जीवनात जागृत राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, कारण प्रभू अंतिम समयी सांगणार आहे, “तू आपल्या कारभाराचा हिशोब दे" आपण सर्वजण निवडलेले असे देवाचे कारभारी आहोत. आपल्या जीवनातील प्रामाणिकपणा व चांगुलपणा यामुळे आपण देवाच्या कृपेस पात्र होतो.
पहिल्या वाचनात संत पौलाने सकारात्मकतेने आपल्याला बोध केला आहे. संत पौल म्हणतो, “तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयास समर्थ आहात" आपण खरोखरच चांगुलपणाने व ज्ञानाने भरलेले आहोत का ह्यावर चिंतन करीत असताना, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी परिश्रम करु या.
आज महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. संपूर्ण महिनाभरात देवाने केलेल्या असंख्य दानांबद्दल देवाला धन्यवाद देऊ या. पापांबद्दल क्षमा मागू या व चांगले जीवन. जगण्यासाठी कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन : रोम १५:१४-२१
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"येशूचे समर्पण पवित्र आत्म्याला स्वीकारणीय बनावे म्हणून मी परराष्ट्रीयांमध्ये ख्रिस्त येशूचा याजक आहे."
बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले आणि एकमेकांना बोध करायला समर्थ आहा अशी तुम्हांविषयी माझी स्वतःचीही खात्री झाली आहे. तरी मला देवापासून प्रप्त झालेल्या कृपेमुळे मी तुम्हांला आठवण देऊन थोडे बहुत अधिक धैर्याने लिहिले आहे. मी परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक आहे, परराष्ट्रीयांचे समर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन स्वीकारणीय बनावे. ह्यावरून देवाच्या गोष्टींसंबंधाने ख्रिस्त येशूविषयी मला अभिमान वाटतो. ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही. तरी परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी आणि कृतींनी, चिन्हे, आणि अद्भुते ह्यांच्या सामर्थ्यांने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो. ते म्हणजे येरुशलेमपासून सभोवती इल्लूरिकमपर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे. दुसऱ्या मनुष्याने उभारलेल्या पायावर मी बांधले असे होऊ नये म्हणून, ख्रिस्ताचे नाव जेथे पूर्वी ऐकण्यात आले नाही, तेथे सुवार्तेचा प्रचार करण्याची माझी महत्त्वकांक्षा आहे. शास्त्रलेखाप्रमाणे, “ह्याच्याविषयी ज्यांना सांगण्यात आले नाही ते पाहतील आणि ज्यांनी ऐकले नाही ते समजतील."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९८:१-४
प्रतिसाद : परमेश्वराने राष्ट्रांसमोर आपले तारणकार्य प्रकट केले आहे.
१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.
२) परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे,
राष्ट्रांसमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता
आणि आपली दया ह्यांचे स्मरण ठेवले आहे.
३) पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे
तारणकार्य पाहिले आहे.
अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा,
उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे, ते मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे
शुभवर्तमान लुक १६: १-८
वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर, "हा तुमचे द्रव्य उडवतो," असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, "तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो ? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तू कारभार पाहायचा नाही." मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करावे? कष्ट करण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्याला समजून घ्यावे म्हणून मी काय करावे या बाबत मला एक मार्ग सुचला आहे. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यांना बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, शंभर मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून पत्रास मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, शंभर खंडी गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि ऐंशी मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहानपण केले, हे पाहून धन्याने त्याची वाहवा केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:संपत्ती ही देव आणि मानव यांच्यात अडथळा बनू शकते. शिष्यांनी किंवा सर्वसामान्यांनी संपत्तीकडे कोणत्या दृष्टीने पाहावे ही महत्त्वपूर्ण शिकवणुक आजच्या शुभवर्तमानातून आपण शिकतो. मूळातच हा दृष्टान्त आपण कोणत्या दृष्टीने पाहातो हे महत्त्वाचे आहे. तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हा दृष्टांत अभ्यासकांनी मांडला आहे.
१) कारभाऱ्याने धुर्त व चतुराईने आपली नोकरी जाऊ नये म्हणून देणेकऱ्यांची मर्जी संपादन केलेली दिसते.
२) देवाच्या लोकांपेक्षा ऐहिक वृत्तीचे इहवादी लोक हुशार व कावेबाज असतात.
३) कारभारी अप्रामाणिक नव्हताच असं देखील मत पुढे येतं. शिष्यांना किंवा परूश्यांना उद्देशून जर हा उतारा असेल तर त्यांची अभिलाषा व हाव याद्वारे आपण देवाशी मैत्री जुळवू शकत नाही. आपण प्रत्येकांनी या उताऱ्यावरून शिकावे, धडा घ्यावा की आपल्या संपत्तीच्या योगे देवाशी मैत्री जोडली म्हणजे मग पैशाचा उपयोग नाही अशी वेळ आली की देव आपल्या समक्षतेमध्ये त्यांचा स्वीकार करील. संपत्तीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कसा आहे?
प्रार्थना :- हे प्रभो, तुझ्या वरदानाबद्दल धन्यवाद. आमचे जीवन परिवर्तन कर, अमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या