Marathi Bible Reading | Thursday 4th November 2021 |31st week in ordinary Time |

      सामान्य  काळातील ३१वा सप्ताह

गुरुवार 

४ नोव्हेंबर    २०२१ 

“पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल."






 संत चार्ल्स बोरोमियो
• महागुरू, वर्तनसाक्षी (१५३८-१५८४)

त्यांना धर्मशिक्षकांचा आश्रयदाता मानले जाते. मरीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची मध्यस्थी केली जाते.

चिंतन : ज्याला देवाच्या सेवेत व मनन-चिंतनात प्रगती करण्याची इच्छा आहे त्यांनी दररोज नव्या दमाने देवाच्या सान्निध्यात राहून देवाची सेवा अखंडीतपणे करीत राहिले पाहिजे. आपल्या सर्व आशा आकांक्षा आणि ध्येय केवळ देवाच्या गौरवासाठी असावे ही तीव्र मनीषा त्याने बाळगली पाहिजे.
- संत चार्ल्स बोरोमियो

 ✝️  


प्रभू येशूने  पापांबद्दल पश्चात्ताप करून  देवाबरोबर समेट करणाऱ्यांसाठी दोन उदाहरणे दिलेली आहेत. आपण जीवनात भरकटलो, बहकलो आणि पापाच्या खोल डोहात जरी पडलो तरी पण पश्चात्तापाच्या अनेक संधी परमेश्वर आपल्याला देत असतो.प्रभूने पहिले उदाहरण हरवलेल्या मेंढराचे दिले आहे. हरवलेल्या मेंढराचा माणूस शोध घेतो व ते सांपडल्यावर त्याला खांद्यावर घेऊन आनंद साजरा करतो. दुसऱ्या उदाहरणात हरवलेल्या नाण्याचा  दाखला आहे. ती बाई दीवा पेटवून, घर झाडून ते नाणे सापडेपर्यंत मनापासून  त्याचा शोध घेते. ते सापडल्यावर ती शेजारणीबरोबर आनंद साजरा करते 

आपल्या जीवनात अनेकदा संसाराच्या चिंता, कामाचा व्याप, जगातील  प्रलोभने व संकटांच्या भोवऱ्यात आपण देवापासून बहकतो व देवाच्या कृपेला पारखे होतो. प्रभू येशू आपला शोध करीत असतो मात्र आपणाला त्याची वाणी ऐकू येत नाही. आपण आज आपल्या जीवनावर चिंतन करीत असतांना प्रभूची वाणी ऐकू या.

पश्चात्तापाची जी संधी मिळेल त्याचा योग्य तो फायदा घेऊ या. देवाकडे वळू या. देवाकडे पश्चात्तापी अंतःकरणाने क्षमा याचना करु या. देवाला आपल्या पश्चात्तापाबद्दल आनंद होत असतो. कारण स्वर्गात आनंद आहे.

✝️

पहिले वाचन : रोम  १४:७-१२
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो."
आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतः करिता मरत नाही. जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो, म्हणून आपण जगलो, किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो. ख्रिस्त मेलेल्यांचा आणि जिवंतांचाही प्रभू असावे म्हणून अशासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला.
तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहो. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, "प्रभू म्हणतो, ज्याअर्थी मी जिवंत आहे, त्याअर्थी माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकील. आणि प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील." 
तर मग आपणांतील प्रत्येक जण आपआपल्यासंबंधी देवाला हिशेब देईल.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र २७:१,४,१३-१४
प्रतिसाद :  ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील.

१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे, 
मी कोणाची भीती बाळगू?
परमेश्वर माझा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू ? 

२) परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले 
त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन,
ते हे “आयुष्यभर परमेश्वराच्या घरात 
माझी वस्ती व्हावी,' म्हणजे मी परमेश्वराचे
 मनोहर रूप पाहत राहीन आणि 
त्याच्या मंदिरात ध्यान करीन.

३) ह्या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे
कल्याण करील परमेश्वराचीच प्रतीक्षा कर, 
खंबीर हो, हिंमत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन मिळवून दिले.
 आलेलुया!


शुभवर्तमान लुक १५: १-१०

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद करा."

सर्व जकातदार आणि पापी लोक येशूचे ऐकण्यासाठी त्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुशी आणि शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले, "हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो." मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला: "तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो."
तसेच अशी कोण स्त्री आहे की, "तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून आणि घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही ? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना आणि शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:“सर्वसामान्य माणसाला पाप्यांत चोर  दिसतो तर येशूला आपल्या नजरेत पाप्यांत संत दिसतो.” आजचं शुभवर्तमान आपणापुढे आणखी
एक आव्हान ठेवत आहे. पापी व जकातदार माणसं ही शास्त्री - परूश्यांसाठी अस्वच्छ व अपात्र असायची. त्यांच्याबरोबर बोलणच काय तर त्यांच्याबरोबर भोजनावळ करणं हे सुद्धा घोर पाप समजलं जायचं. येशू याठिकाणी अगदी जगावेगळी शिकवणूक देतो. हरवलेला पापी परत पूर्वस्थितीवर आल्याने देवाला फार मोठा आनंद होतो. म्हणूनच हरवलेल्यांना शोधावे, त्यांचे तारण करावे हीच येशूची सर्वोच्च इच्छा आहे. (लूक १९:१०) हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं व हरवलेला पुत्र हे दाखले केवळ लूकच्या शुभवर्तमानामध्ये सापडतात. या कारणाने लूकच्या शुभवर्तमानास उपेक्षितांना किंवा हरवलेल्या पापी जनांना खास स्थान आहे. पश्चात्तापी चोराने शेवटी येशूकडे पश्चात्तापी हृदयाने पापी मार्ग सोडून देण्याकरिता व सन्मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रार्थना केली. येशूने त्याला स्वर्गीय नंदनवनात बोलाविले. पापी समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या जीवनात प्रेमाने स्वीकारण्यासाठी तयार आहोत का?

प्रार्थना :-  प्रभू येशू, आमचे जीवन परिवर्तन घडवून आण, आम्हाला तुझ्या स्वर्गीय आनंदात सहभागी कर, आमेन.. 

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या