Marathi Bible Reading | Wednesday 3rd November 2021 |31st week in ordinary Time |

     सामान्य  काळातील ३१वा सप्ताह

बुधवार 

३ नोव्हेंबर    २०२१ 

"तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही."




 संत मार्टिन डी पोरेस
-वर्तनसाक्षी ( १५६९-१६३९)

 ✝️  

परस्पर प्रीतीच्या आज्ञेतच देवाच्या आज्ञांचे पालन होत असते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा गाभा  देवप्रीति बरोबरच परस्पर प्रीति हाच होता. मात्र प्रीति करणाऱ्याला त्यागमय जीवन जगावे लागते हे प्रभूने आवर्जून सांगितले आहे.

 प्रभू येशू खऱ्या शिष्यात्वाचे स्पष्टीकरण देत आहे. खऱ्या शिष्याला मोठ्या अग्निदिव्यातून आणि कसाटीतून पार जावे  लागते. प्रभू प्रथम म्हणतो की आपण आपला वधस्तंभ उचलून घेउन त्याला अनुसरले पाहिजे. आपल्या जीवनात आलेल्या सर्व प्रकारच्या दुःखाचा, संकटांचा व अडथळ्यांचा वधस्तंभ आपण उचलायचा आहे.  आपले आप्तेष्ट, आपली भौतिक धनसंपत्ती व जे काही शिष्य बनण्यास अडथळा निर्माण करेल अशा सर्वांचा त्याग करण्यास प्रभू आवाहन करीत आहे. सर्वस्वाचा त्याग करुन ख्रिस्ताला अनुसरणे सोपे नाही, मात्र अशक्यही नाही. सर्व प्रेषितगण आणि संतगणांनी त्यागमय व खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे.

जागतिक जीवनात अनेक प्रलोभने व मोह आहेत. प्रभूला अनुसरतांना त्यांची अडखळण होते मात्र आपल्या सर्वांचा बाप्तिस्मा प्रभू ठायी व पवित्र आत्म्याठायी झालेला आहे. प्रभूचे सामर्थ्य आणि कृपा आपल्याला मिळाली आहे. आपण त्याची निवडलेली प्रजा आहोत म्हणूनच प्रभू पासून  आपल्याला विभक्त होता येत नाही. प्रभू येशूचे खरे शिष्य बनण्यास सामर्थ्य, धैर्य, प्रेरणा व कृपा लाभावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करु या. 

✝️

पहिले वाचन : रोम  १३:८-१०
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

 "प्रीती हे नियमशास्त्रांचे पूर्णपणे पालन होय."

एकमेकांवर प्रीती करणे ह्यांच्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे. “व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको," ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश "जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर," ह्या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. 

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ११२:१-२,४-५,९  
प्रतिसाद : जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो : त्याचे कल्याण होते.

१) परमेश्वराचे स्तवन करा, 
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो 
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य! 
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. 
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.

२) सरळ जनांना अंध:कारात प्रकाश प्राप्त होतो, 
त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत 
जो मनुष्य दया करतो आणि उसनेदेतो त्याचे कल्याण होते,
तो न्यायाने आपला व्यवसाय करील
त्याने सढळ हाताने गरिबांना दानधर्म केला आहे 
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी देवाने आपणाला सुवार्तेच्या द्वारे पाचारण केले आहे.
 आलेलुया!


शुभवर्तमान लुक १४: २५-३३

वाचक :लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही."

येशूबरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही त्याग करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हेपाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, 'हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही,' अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करायला निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलाला पाठवून सलोख्याने बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:येशू अगदी परखड शब्दात म्हणतो, "जर तुम्हाला माझा अनुयायी व्हायचं असेल तर स्वतःला विसरा.” या शिकवणीद्वारे आपल्या समोर येशू निवडीचा पर्याय ठेवत आहे. चांगलं काय आणि वाईट काय हे जाणून घेण्याची देणगी सॉलोमन राजाने देवाकडे मागितली. त्यांचा हा चांगुलपणाचा पर्याय देवाला प्रसन्न करून गेला. एका बाजूला पैसा - संपत्ती, डामडौल, प्रतिष्ठा दिसत आहे तर दुसऱ्या टोकावर संत मदर तेरेजा सारखी सेवा करणारी माणसं दिसत आहे. एका बाजूला सुरक्षित भिंतीत सुखसोयीचं जीवन जगणारी माणसं दिसतात तर दुसऱ्या बाजूला आपण फुटपाथावर उघडी नागडी फुटलेल्या घरात असुरक्षितेचं जीवन कंठत राहणारी माणसं बघतो. येशूच्या हाकेला होकार देणे म्हणजे स्वेच्छा बाजूला ठेवून येशूसारखं जीवन जगण्यासाठी तयार असणं. सध्याच्या या युगात येशूच्या ह्या शिकवणुकीचं पालन करणं हे जरी कठीण असलं तरी अशक्य नाही. म्हणून येशू म्हणतो “जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर (शत्रूवर) प्रीती कर.” मी काय निवडणार: येशूची शिकवणुक की जागतिक मुल्यांना मिठी मारणार ?

प्रार्थना :-  हे प्रभू येशू, तुझ्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा  दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या