आगमनकाळातील ४ चौथा सप्ताह
शुक्रवार २४ डिसेंबर २०२१
“प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्यांच्यापुढे चालशील."
संत बर्नर्ड तर भावनातिशयाने म्हणतात की, “प्रेमास पात्र, कौतुकास योग्य आणि आदरणीय असे काही जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपण बेथलेहेमास जाऊ या !"१८ डिसेंबर १९३३ साली बोलीयम येथील ओंकेझेंल ह्या ठिकाणी बेर्टिझोनिया होल्टकॅम्प ह्या भाविकाला दिलेल्या दर्शनात पवित्र मरियेने पुढील शब्द उच्चारले, "ख्रिस्तजन्माचा खरा आनंद साजरा करण्यासाठी प्रार्थना, उपवास, प्रायश्चित्त आणि त्याग इ. द्वारे आपली आध्यात्मिक तयारी करण्याचे आवाहन लोकांना करा.”
✝️
तारणाऱ्याच्या जन्माचा संदेश देणारा व त्याचा मार्ग तयार करणारा योहान बाप्तिस्ता ह्याच्या जन्माची योजना परमेश्वराने जखऱ्या व अलीशाबा ह्यांच्याद्वारे पुर्णत्वास नेली. योहानाच्या जन्मानंतर याजक जखऱ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि त्याने परमेश्वराचे स्तुती गीत गाईले. भक्तीमान व नीतिमान जखऱ्याने उल्हासाने स्तोत्र गीत गात म्हटले,
‘इस्त्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो.' देवावरील मजबूत श्रद्धा असलेल्या जखऱ्याला पवित्र आत्माची प्रेरणा झाली व त्याने योहानाच्या जन्माचे रहस्य प्रकट केले. योहानाच्या जन्मामुळे त्याचा वंश पूढे चालू राहिल अशी शाश्वती जखऱ्याला नव्हती कारण देवाची योजना त्याला समजली होती. आपला मुलगा योहान हा तारणाऱ्याचा मार्ग तयार करणारा वाटाड्या आहे, ह्याची जाणीव त्याला होती. तरी सुद्धा जखऱ्याने देवाची स्तुति करुन देवाला धन्यवाद दिले. आपल्या प्रत्येकाला जखऱ्याप्रमाणे देवाच्या महान योजनेत सहभागी होण्यासाठी पाचारण आहे.
पहिले वाचन २ शमुवेल ७:१-५,८१,१६
वाचक : शमुवेलाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“दावीदचे राज्य सतत प्रभूच्या समोर सुरक्षित राहील."
दावीद राजा आपल्या महालात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान नामक संदेष्ट्याला म्हणाला, "पाहा, गंधसरूच्या मंदिरात राहत आहे. पान देवाचा कोष कनाथीच्या आत राहत आहे." नाथान राजाला म्हणाला, "तुझ्या मनात जे काही असेल ते कर. कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे." त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानला प्राप्त झाले, "जा माझा सेवक दावीद याला सांग, परमेश्वर म्हणतो: तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय ?"
तर आता माझा सेवक दावीद यास सांग, "सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ्यापुढून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इस्राएल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यांस रुजवीन म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करुन राहतील आणि ते तेथून पुढे कधी ढाळणार नाहीत. इस्राएल लोकांवर मी शास्ते नेमले होते काळापासून जसे दुर्जन त्यांस त्रस्त करत होते ते ह्यापुढे करणार नाहीत. तुला मी शत्रूपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की, मी तुझे घराणे कायमचे स्थापीन."
तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ्यापुढे अढळ राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८९:२-५,२७,२९
प्रतिसाद : प्रभूच्या प्रेमाचे मी गुणगान गाईन
१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना
तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन.
तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल.
तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
२) “मी स्वतः निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे.
माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे :
तुझा वंश मी अबाधित ठेवीन.
तुझे सिंहासन पिढ्यान्पिढ्या राखीन "
३) तो मला म्हणेल, तूच माझा पिता,
माझा देव माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस.
त्याच्यावरले माझे प्रेम अढळ राहील.
त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे इम्मानुएल, आमच्या राजा आणि न्यायाधीशा, हे प्रभो परमेश्वरा, ये आणि आमचे तारण कर.
शुभवर्तमान लूक १:६७-७९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आमचा स्वर्गवासी परमेश्वर पूर्वेकडे उगम पावलेल्या सूर्याबरोबर आम्हांला भेटण्यासाठी येत आहे."
योहनचा बाप जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन भाकीत केले ते असे :इस्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो. कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद ह्यांच्या घराण्यात तारणाचे शिंग उभारले आहे. हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते. म्हणजे आपल्या शत्रूंच्या आणि आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार, म्हणजे जी शपथ आपला पूर्वज आब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी. ती अशी, तुम्ही आपल्या शत्रूंच्या हातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने आणि नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.आणि हे बाळका, तुला परमेश्वराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्यासाठी तू त्याच्यापुढे चालशील, ह्यासाठी की, त्याच्या लोकांना त्याच्या पापांच्या क्षमेने तारणाचे ज्ञान द्यावे. आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे. तिच्यायोगे उदयप्रकाशावरून आमच्याकडे येईल. ह्यासाठी की, त्याने अंधारात आणि मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:हा बालक होणार तरी कोण? ह्या लोकांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून लूकने जखऱ्याचे स्तोत्र सादर केलेले आहे. ह्या स्तोत्राच्या प्रारंभीच 'इस्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो' असे शब्द वापरून हे आभारगीत आहे असे लूकने सूचित केलेले आहे. जखऱ्या देवभिरू व नीतिमान होता ह्या लूक १:६ मधील वचनाचा भक्कम पुरावा म्हणजे आपली जीभ मोकळी होणाऱ्या जखऱ्या देवाला धन्यवाद देतो हा होय. लूकने सादर केलेले जखऱ्याचे स्तोत्र मरियेच्या स्तोत्रासारखेच असून त्यासाठी अ) देवाला धन्यवाद, ब) धन्यवाद देण्याची कारणे, क) समारोप अशी रचना वापरण्यात आलेली आहे. मरियेच्या स्तोत्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीविषयी आपण जे अभ्यासले तेच जखऱ्याच्या स्तोत्राला लागू पडते. ह्या स्तोत्र गीतात एकूण तीन विषय समावलेले आहेत. १) कृपावंत |परमेश्वराचा मानवी जीवनातील हळूवार प्रवेश, २) लोकांसाठी त्याने प्रकट केलेली तारण योजना, ३) परमेश्वराने मानवाशी केलेल्या कराराची पूर्तता.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, ये आणि आमचे जीवन परिवर्तन कर आम्हाला तुझा प्रकाश दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या