Marathi Bible Reading | The Nativity of The Lord |Saturday 25th December 2021 |

ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ

शनिवार २५ डिसेंबर २०२१

  "प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता."


देवाचे प्रेम जगी अवतरले 



 कॅथलिक ख्रिस्तसभेमध्ये ख्रिस्तजन्माची स्मृती म्हणून गोशाळा किंवा गाईचा गोठा तयार करण्याचा प्रघात आहे. ही परंपरा संत फ्रान्सिस असिसीकर ह्याने १२२३ साली सुरू केली. ग्रेसियो नावाच्या एका लहानशा खेड्यानजीक असलेल्या गुहेमध्ये त्याने खरी गाय, उंट, मेंढरे, गाढवे इ. आणून असा देखावा निर्माण केला व त्याद्वारे लोकांना देवाच्या अपार दयेचे व ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. त्याचा उद्देश सुवार्ताप्रसार आणि धर्मप्रसार असा असला तरी ही प्रथा मात्र त्या गावकऱ्यांनी पूर्वापार पाळत ठेवली. असं म्हणतात की, त्यावेळी संत फ्रान्सिस ह्याने पवित्र मिस्सा अर्पण केली व लोकांना चांगले हृदयस्पर्शी प्रवचन दिले. त्या प्रवचनाच्या शेवटी ह्या संताच्या हाती खरोखरच एक जिवंत बालक अवतरल्याचे लोकांनी पाहिले. त्यामुळे गोशाळा उभारण्याच्या प्रथेला आणखी बळकटी मिळाली.
अकराव्या व बाराव्या वर्षी ख्रिस्मस कॅरल किंवा नाताळ गीतांची प्रथाजर्मनीमध्ये उदयास आली. दहाव्या शतकात ख्रिस्मस ट्री सजविण्याची परंपरा सुरू झाली. ख्रिस्ताची हिरवळ व प्रकाश त्यातून प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला जातो. ख्रिस्मस ट्री हे एदेन बागेतील झाड व क्रुसाचे झाड ह्याचे प्रतीक आहे. एका पापाद्वारे मरणाचे तर दुसरे मरणाद्वारे लाभणाऱ्या नवजीवनाचे चिन्ह होय. ख्रिस्मस ट्रीचा अधिक स्पष्टीकरणात्मक उल्लेख १६०५ मध्ये आढळतो. जर्मनी ख्रिस्मस ट्रीचा फारसा प्रसार झाला नाही आणि इंग्लडमध्येही १८४० पर्यंत देखील ह्या परंपरेची नामोनिशाणी नव्हती.

चिंतन : जोपर्यंत आपल्याठायी ख्रिस्ताचा आत्मा वस्ती करीत नाही तोपर्यंत आपल्याला ख्रिस्मसचा खरा आनंद लाभू शकत नाही. अनामिक

✝️

 आज आनंद व जल्लोष करण्याचा दिवस आहे कारण, 'शब्द देही झाला, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. ' योहान शुभवर्तमानकार स्पष्ट करीत आहे  की, 'प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता आणि शब्द देही  झाला. 'प्रारंभी देव केवळ शब्द बोलला आणि सर्व काही निर्माण झाले. नंतर देव अंशाअंशानी संदेष्ट्याद्वारे बोलला, मात्र अत्ता प्रत्यक्ष देव आपल्या सर्वांच्या  भेटीसाठी आला. तो आम्हामध्ये वस्ती करण्यासाठी आला. प्रभू येशू जो शब्द मनुष्य झाला तो आम्हा सर्वांचे तारण व उध्दार करण्यासाठी आला. यशयाने येशूला 'इम्मानुएल', म्हणजेच आम्हाबरोबर देव असे म्हटले आहे. प्रभू येशू आपल्या सर्वांच्या जीवनाशी एकरुप झाला. आपल्या सर्वांच्या सुख-दुःखाशी प्रभू समरस झाला. अशासाठी की आपण त्याच्यासारखे निर्मळ, प्रेमळ व शांती स्वरुप बनावे.
नाताळ गोठ्यातील येशू बाळाला भेटू या. त्याचे आपल्यामधील अस्तित्व  अनुभवण्याचा प्रयत्न करु या. आपल्याला लाभलेला हा अद्वितीय आनंद आपण परस्परांमध्ये वाटू या..


पहिले वाचन यशाय ५२:७-१०
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"अखिल जगात देवाने केलेले तारण दिसेल."

जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभवृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनला म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. तुझ्या जागल्यांचा हा शब्द ऐक, ते एकदम उच्च स्वराने गात आहेत. कारण परमेश्वर सियोनला परत येत आहे हे ते प्रत्यक्ष पाहत आहेत. येरुशलेमच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा. सर्व मिळून गा. कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे. त्याने यरुशलेमला उद्धारले आहे. परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे. साऱ्या सृष्टीला आमच्या देवाने केलेले तारण दिसून येईल.

हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९६:१-३,११-१३
प्रतिसाद :  सर्व दिशांनी देवाचे तारण पाहिले आहे

१) परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याच्या उजव्या हाताने, त्याच्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.

२) परमेश्वराने स्वतः सिद्ध केलेले तारण प्रकट केले आहे. राष्ट्रासमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया व सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.

३) पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे. अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वराने, आनंदाने गा.४ परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा. वीणेवर सुस्वर स्तोत्र वाजवा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा.

दुसरे वाचन इब्री १:१-६

वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 
“परमेश्वर आपल्या पुत्राद्वारे आम्हांबरोबर बोलला आहे."

देव प्राचीन काळी अंशाअंशानी व प्रकाराप्रकारांनी व संदेष्ट्यांच्याद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राच्याद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले; हे त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारसाहक्काने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले :
“तू माझा पुत्र आहेस,
आज मी तुला जन्म दिला आहे ?” आणि पुन्हा “मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल ?" आणि तो पुन्हा श्रेष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो :“देवाचे सर्व दूत त्याला नमन करोत."

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
आमच्यावर पवित्र दिवस उजाडला आहे. राष्ट्रांनो या, प्रभूला नमन करा. कारण आज जगावर महातेज पसरले आहे.
 आलेलुया!

शुभवर्तमान योहान  १:१-१८

वाचक :  योहानलिखित शुभवर्तमानाचा प्रारंभ १:१-१८

“शब्द मनुष्य झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. "

(प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीच नाही. त्याच्याठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्रांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.) देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी श्रद्धा ठेवावी. हो तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. (जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात  होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. आपल्या स्वकीयांकडे तो आला तरी त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा यांपासून झाला नाही, तर देवापासून झाला आणि शब्द मानव झाला, त्याने आम्हांमध्ये वस्ती केली व आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य त्यांनी परिपूर्ण होते.) त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि जाहीररीत्या म्हणतो : जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे कारण ते माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्या विषयी मी सांगितले, तो हाच आहे. कारण नियमशास्त्र मोशेद्वारे देण्यात आले होते. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:'अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे.' अशा शब्दांत यशया संदेष्ट्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचे भाकीत केलेले होते. प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी जेव्हा देवदूत मेंढपाळांना शुभवार्ता देण्यासाठी आला तेव्हा प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले. पुढे मागी लोकांना देखील पूर्व दिशेस एक तारा उगवलेला दिसला. ख्रिस्मसच्या रात्री संपूर्ण जगभर रोषणाई आणि झगमगाट पाहायला मिळतो. ख्रिस्तजन्माचा आणि प्रकाशाचा एवढा जवळचा संबंध कसा काय बरे ? 
१) प्रकाश म्हणजे आनंद : आनंदाचे प्रसंग मनुष्य प्रकाशाच्या झगमगाटात साजरे करीत असतो. म्हणून प्रभूचे तेज पाहिल्यावर घाबरून गेलेल्या मेंढपाळांना देवदूत म्हणतो, 'भिऊ नका. जो मोठा आनंद सर्व जगाला होणार आहे त्याची शुभवार्ता मी तुम्हांला सांगतो.' संतांच्या चेहऱ्यावर स्वर्गीय आनंदाचे तेज झळकत असते. सर्वसामान्य माणूस आनंदी असला की त्याच्याही चेहरा तेजस्वी बनतो. 
२) प्रकाश म्हणजे सुरक्षितता : रात्रीच्या काळोखात माणूस जिथे जायला घाबरतो तिथे तो दिवसा अगदी बिनधास्त फिरू शकतो. कारण अंधारात माणसाला असुरक्षित वाटत असते. येशूविषयी संत योहान म्हणतो, ‘त्याच्याठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो. जी व्यक्ती परमेश्वराच्या प्रकाशात चालते ती रात्रदिवस सुरक्षित असते. 
३) प्रकाश म्हणजे नीतिमत्ता : जगात प्रकाश आला आहे परंतु मनुष्यांनी अंधाराची आवड धरली. कारण त्यांची कृत्ये अंधाराची होती. संत योहान व संत पॉल पापासाठी अंधाराचे प्रतीक वापरतात. माणसाने अंधाराची कामे टाकून देऊन प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी असा संदेश ते देतात. आपण प्रकाशाची लेकरे आहोत, साक्षात् जगाचाप्रकाश आहोत, आपल्या नीतिमान जीवनाद्वारे आपण सर्वत्र परमेश्वराचा प्रकाश पसरायला हवा. आत्मपरीक्षण : माझ्या चेहऱ्यावर स्वर्गीय आनंदाचे तेज झळकते का? माझ्या सहवासात इतरांना सुरक्षित वाटते का? माझ्या जीवनात नीतिमत्तेचा प्रकाश आहे की पापाचा, काळोख आहे ? नाताळ सणाचा प्रकाश सर्वत्र पसरविण्यासाठी मी काय काय करणार आहे ?

प्रार्थना :-  प्रभू येशू, मानव बनून तू आम्हामध्ये वस्ती केली. तुझे अस्तित्व  अनुभवण्यास व तुझ्या परिमळ स्पर्शाने पावन होण्यास आम्हाला कृपा दे, आमेन


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या