Marathi Bible Reading | Holy Family Feast | Sunday 26th December 2021 |

ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ

नाताळ सप्ताहातील

रविवार २६ डिसेंबर २०२१

  ✝️

 
“येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. "
पवित्र कुटुंबाचा सण


आपल्या मुलांची आईबापा संबंधीची कर्तव्ये आणि परस्पर नाते संबंध कसे असावेत ह्यासंबंधी बेनसीराने पहिल्या वाचनात सुंदर बोध केला आहे. कुटुंबात मुलांनी आईवडीलांचा सन्मान करावा, त्यांच्या आजारपणात त्यांची सुश्रुषा करावी आणि त्यांच्या वृध्दापकाळी त्यांची सेवा करावी म्हणजे त्या मुलांना परमेश्वराचा आशीर्वाद लाभेल. संत पौल दुसऱ्या वाचनात कुटुंबातील परस्परसंबंध कसे असावेत हे स्पष्ट करताना म्हणत आहे, 'करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा, एकमेकांचे सहन करा, आपसात क्षमा करा.'

ख्रिस्तसभा आज येशू बाळ, मरिया आणि योसेफ ह्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे.  बाळाची शारीरिक, बौध्दिक, मानसिक आणि  आध्यात्मिक वाढ कुटुंबातच होत असते. निसर्ग नियमानुसार कुटुंब हे व्यक्तिमत्व विकासाबरोबरच बाळाची व पालकांची सुद्धा कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सुलभतेने पार पाडण्याचे ठिकाण आहे. कुटुंबातच प्रेमाचे, परस्परप्रीतिचे, बंधुत्वनात्याचे आणि आदर सन्मानाचे धडे मिळतात. परस्परांचे भिन्न स्वभाव असतानासुद्धा कुटुंबात शांतीने व सामंजस्याने राहण्यासाठी प्रेरणा मिळते. विशेषत: कुटुंबातच देवाविषयीचे ज्ञान आणि प्रार्थनेचे महत्व समजल्यामुळे कुटुंबातील माणसे ऐक्याने जीवन जगत असतात.
कुटुंब ही ख्रिस्तसभेची प्रतिकृती आहे, म्हणूनच पोप फ्रान्सिस ह्यांच्या  नेतृत्वाखाली झालेल्या कुटुंब विषयक परिषदेत कुटुंबाच्या जडण घडणीवर नव्याने  प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ख्रिस्ती कुटुंबे खऱ्या अर्थाने देवाच्या पवित्र कुटुंबासारखी बनावीत. कुटुंबाद्वारे ख्रिस्ती मुल्ये सर्वत्र पसरावित आणि विशेषरितीने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्याचे कुटुंब हे आद्यस्थानं बनावे म्हणून प्रयत्नशील असावे. आज पवित्र कुटुंबाकडून प्रेरणा घेऊ या आणि संपूर्ण विश्व एक दैवी कुटुंब बनावे म्हणून प्रार्थना करु या.

पहिले वाचन बेनसिरा ३:२-६,१२-१४
वाचक :बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“जो परमेश्वराला भितो तो आईबापाला मान देतो.'

प्रभूने बापाला मुलापेक्षा अधिक सन्मान दिला आहे आणि त्याने मुलाबरोबर आईच्या अधिकाराला महत्त्व दिले आहे. जो आपल्या बापाला मान देतो, तो आपल्या पापांची भरपाई करतो आणि जो आपल्या आईचा सन्मान करतो त्याची तुलना धनदौलत जमवणाऱ्याबरोबर करता येते. जो बापाला मान देतो, त्याला त्याची मुले आनंदित करतील आणि जेव्हा तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल. बापाला मान देणाऱ्याचे आयुष्य दीर्घ होते. जो आईचे समाधान करतो तो परमेश्वराची आज्ञा पाळतो. हे मुला, तुझ्या बापाला त्याच्या म्हातारपणी आधार दे आणि तो जिवंत असेपर्यंत त्याला दुःख देऊ नकोस, त्याची समज कमी झाली तरी त्याला दया दाखव. तुझ्या सामर्थ्यात त्याचा तिरस्कार करू नकोस. बापाला दाखविलेली दया फुकट जाणार नाही. तर तुझ्या पापांच्या भरपाईसाठी तिचा उपयोग होईल.


हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १२८:१-५
प्रतिसाद :  परमेश्वराचे भय धरून चालतो तो धन्य.

१) धन्य तो पुरुष, जो परमेश्वराचे भय धरतो, 
जो त्याच्याच मार्गानी चालतो. 
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.तू सुखी होशील, 
तुझे कल्याण होईल. 

२) तुझ्या घरात तुझी स्त्री जणू काय 
द्राक्षीच्या सफळ वेलीसारखी होईल. 
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपासारखी होतील.

३) पाहा, परमेश्वराचे भय धरणारा पुरुष 
याप्रमाणे आशीर्वाद पावेल. 
परमेश्वर सियोनतून तुला आशीर्वाद देवो. 
आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस 
येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.

दुसरे वाचन कलस्सैकरांस ३:१२-२२

वाचक : पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
"प्रभूठायी कौटुंबिक जीवन."

तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा. प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंत:करणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंत:करणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.
नाताळकाळ पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा. हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. आणाल तर ती खिन्न होतील.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
ख्रिस्ताची शांती तुमच्या हृदयात राज्य करो..
ख्रिस्ताच्या संदेशाला तुम्हांमध्ये स्थान मिळो.
 आलेलुया!

शुभवर्तमान मत्तय   २:१३-१५,१९-१३

वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"इजिप्तमध्ये पवित्र कुटुंब." 

मागी लोक गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, "ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे." मग तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात इजिप्त देशात निघून गेला आणि हेरोदच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी आपल्या पुत्राला इजिप्त देशातून बोलावले आहे." हे जे प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत इजिप्त देशात योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, "ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलच्या देशास जा, कारण जे मुलाचा जीव घ्यायला पाहात होते ते मरून गेले आहेत." तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्त्राएलच्या देशात आला. परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी यहुदियात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जायला घाबरला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालिली प्रांतात गेला व नाझरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला. अशासाठी की, “त्याला नाझरेथकर म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:आपल्या बोटातील बिशप पदाची अंगठी बिशप होनोरियूस ह्यांनी जेव्हा आपल्या वृद्ध माता-पित्यांना दाखवली तेव्हा त्यांना आपल्या कौटुंबिक जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. बिशपांच्या आईने आपल्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर मिश्कील हास्य पसरवित आपल्या बोटातील अंगठी त्यांना दाखवित म्हटले, 'बाळा, माझ्या बोटात ही अंगठी नसती तर तुझ्या बोटात ती अंगठी नसती, बरे का?” त्या वाक्यात कौटुंबिक जीवनाचा गहन अर्थ भरलेला होता. ख्रिस्तसभा आज पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत असताना आपल्यासमोर चार महत्वाचे विचार सादर करते. 
१) वृद्ध माता-पित्यांचा सन्मान : ज्येष्ठ नागरिक असा शब्द वापरून आजकालचे जग वृद्ध व वयस्कर व्यक्तीप्रती आदरभाव व्यक्त करते. वृद्धापकाळात पंचेद्रिये शिथील झालेली असतात. तशीच पचनशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि इच्छाशक्ती अशी अंतर - इंद्रिये मंद झालेली असतात. अशा माता-पित्यांनी आपले उभे आयुष्य वेचून आमचे आयुष्य उभे केलेले आहे. हे आम्ही कदापिही विसरू नये, असे पहिले वाचन सांगते. 
२) परमेश्वराचा सन्मान : स्तोत्र १२८ च्या आधारे पोप फ्रान्सिस ह्यांनी कौटुंबिक जीवनात परमेश्वराचा सन्मान कसा करावा आणि त्याचे कोणते आशीर्वाद मिळतात त्याचे वर्णन केलेले आहे. हे स्तोत्र आजचे प्रतिसाद स्तोत्र आहे. 
३) एकमेकांचा सन्मान : कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रात संत पौल आपण एकमेकांचा सन्मान कसा करावा त्याचे धडे आपल्याला देत आहे. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराला प्रिय आहे म्हणून आपण क्षमा, नम्रता, एकमेकांसाठी प्रार्थना, प्रेम, कामकाज अशी मूल्ये कौटुंबिक जीवनात जोपासावीत असे तो सुचवितो.
४) गुरूजनांचा सन्मानः कुटुंब ही आपली पहिली शाळा असते. आईवडील आपले पहिले शिक्षक असतात. येशू देवळात हरवला तेव्हा गुरूजनांबरोबर चर्चा करीत होता. परंतु त्याला तिथे नेणारे मरिया व जोसेफ हे त्याचे पहिले शिक्षक होते. तो सापडल्यावरही त्यांच्या आज्ञेत राहिला. गुरुजन म्हणून त्याने आपल्या आईवडिलांचा यथोचित सन्मान केला.

आत्मपरीक्षण : मी आदरणीय जीवन जगत आहे का? मी माझ्या कुटुंबातील सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक देत आहे का? माझ्या कुटुंबात परमेश्वराचा सन्मान कशारीतीने केला जातो ?

प्रार्थना :- हे प्रभू येशू, तू आमच्या कुटुंबाचा राजा आहेस. हे पवित्र मरिये आणि संत योसेफ आमच्या कुटुंबात प्रेम, शांती व सौख्य नांदावे म्हणून मध्यस्थी कर, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या